मनगट – (क) हाताच्या पंज्याचा बाहूशीं जो सांधा तो. (ख) घोडा, गाढव, वगैर जनावरांचीं मूठ; (म्हणजे खुराजवळचा सांधा). (ग) (शक्ति, सामर्थ्य, वगैरेचें अधिष्ठान, ह्या दृष्टीनें) अंग. उ० तुझ्या मनगटांत जोर असला तर घे हें काम अंगावर स्वतः! (म्हणजे तुझे ठायीं किंवा अंगीं).
एकाद्याचें मनगट धरणें – एकाद्या अपराधांत त्याला पकडणें; त्याचेवर गुन्हा शाबीद करणें; तो एकादें वाईट कृत्य करीत असतां त्याला ऐन समयी पकडणें.
एकाद्याच्या मनगटावर गोणी पडणें, किंवा येणें– एकाद्या कामाची जबाबदारी त्याच्यावर पडणें; त्या कामाचें ओझें त्याच्यावर येऊन पडणें.
तुझ्या मनगटावर कोणीं गोणी दिली आहे ? – तूं ह्या कामाचा भार आपल्या शिरावर आहे असें कां समजतोस?
मनगटावर केस येणें – एकादें काम करावयाला असमर्थ असणें.
त्याच्या मनगटावर तेल घातलें पाहिजे – त्याच्या आळसाबद्दल त्याला रागें भरलें पाहिजे.
मनगटासारखें मनगट पाहून कन्या द्यावी – कन्येला अंगापिंडानें अनुरूप वर पाहून त्याच्याशीं तिचें लग्न जुळवून द्यावें.
एकाद्याच्या मनगटाशीं मनगट घासणें – त्याच्याशीं बरोबरीच्या नात्यानें वागणें.