“कंबर”

Waist – कंबर

कंबर या शब्दाचा अर्थ कटि. उदा. कंबरेला करगोटा घाला, “तिच्या कंबरेवर मोठी घागर ठरत नाहीं”, “सिंहाची कंबर त्याच्या शरीराच्या मानानें बारीक असते.”

कंबर मोडणें (किंवा मोडून जाणें) – कबरेत अशक्तपणा येणें. उदा. आज विहिरीची मी पन्नास घागर आणिली, माझी कंबर मोडून गेली! 

कंबर खचणें, किंवा बसणें, किंवा मोडणें, किंवा मोडून जाणें – निराश होणें, गलितोत्साह होणें. उदा. माझ्या भावाची परीक्षा नापास झाली असें ऐकून माझी कंबर खचली, “वशिल्याशिवाय येथें कोणतेंही काम होत नाहीं हें ऐकतांच माझी कंबर बसली.”

कंबर ताठणें – आजारामुळें, किंवा अशक्तपणामुळे, कंबर हालविण्याची किंवा वाकविण्याची, ताकद नसणें.

कंबर बांधणें – कोणत्याही कामाला सिद्ध होणें, किंवा तयार राहणें; उत्साह बाळगणें; धैर्य धरणें. उदा. मांडव मांडव म्हणजे काय गोष्ट आहे ! हा मी कंबर बांधून तयार आहे ! अर्ध्या तासाच्या आंत तुमचा मांडव पुरता करून देतों, “यंदा नापास झालास म्हणून काय झाले? कंबर बांध ! पुन्हां अभ्यासाला लाग ! पुढच्या वर्षी तूं खचित पास होशील !”

कंबर धरणें किंवा भरणें – थंडी वगैरे कारणामुळें कंबर दुखत असणें. उदा. आज चार पांच दिवस माझी कंबर धरली आहे.  टीप–ह्या प्रयोगांत “धरणें” हे क्रियापद अकर्मक आहे.

कंबरेचें सोडून डोकीस गुंडाळणें – कंबरेचें धोतर सोडून तें डोक्याला गुंडाळणें; ह्म. लाज सोडणें; निर्लज्जपणाचें वर्तन करणें.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow by Email
error: Content is protected !!