न ऐकलेले 51 मराठी भाषेतील वाक्य व म्हणी ( जुन्या म्हणी )

 1. आयत्या पिठावर रेघा ओढणें – श्रमावांचून मिळालेल्या संपत्तीवर चैन करणें. ह्याच अर्थाची म्हण, “आयत्या बिळावर नागोबा बळी.
 2. आव घालणें – अवसान दाखविणें; अमुक गोष्ट करावयाला आपण समर्थ आहों, असा डौल मिरविणें; धमकदारीचा देखावा करून एकाद्या गोष्टीला उपक्रम करणें.
 3. आढी, किंवा अढी, धरणें – मनांत वैरभाव गुप्तपणें जागृत ठेवणें. रुसवा किंवा प्रतिकूल ग्रह, मनांत धुमसत राहूं देणें.
 4. आंवळा देऊन कोहळा काढणें – एकाद्याला लहान वस्तु देऊन त्याचेंपासून मोठी वस्तु मिळविणें. (त्याला गोड गोड भाषणानें फसवून, किंवा खूष करून). आंवळा हें लहान फळ आहे, आणि कोहळा हें मोठें फळ आहे, यावरून हा वाक्प्रचार निघाला आहे. [“कोहळा” शब्दाबद्दल “बेल” हा शब्दही योजण्यांत येतो].
 5. आहारीं असणें – आटोक्यांत असणें. जिवाविशेष नसणें. [जेवढें अन्न कोणा एकाद्या मनुष्यानें खाल्लें असतां सुखानें पचतें, तेवढ्या अन्नाला त्याचा “आहार” म्हणतात; यावरून जें काम श्रम वाटल्याशिवाय करतां येण्यांसारखें असतें, तें “आहारीं आहे,” असें म्हणतात].
 6. आळा घालणें – मर्यादा, किंवा नियंत्रणा, घालून देणें.
 7. आळशावर गंगा येणें – गंगेच्या उदकाचा कोणाही माणसाला स्पर्श झाला असतां त्या माणसाचा उद्धार होतो. यासाठीं गंगेचें स्नान घडावें, म्हणून सर्व लोक लांबलांबचे प्रवास करावयास सिद्ध होतात. आळशाला देखील आपला उद्धार व्हावा, अशी इच्छा असते; परंतु अंगांत अति आळस असल्यामुळें तो गंगास्नानासाठीं गंगेकडे जात नाहीं. परंतु त्याच्यावर प्रसाद करावयासाठीं गंगाच जर त्याच्याकडे वाहात आली, तर त्याचें मोठें भाग्यच समजलें पाहिजे ! “आळशावर गंगा येणें,” म्हणजे आपल्या कल्याणासाठीं मुळींच खटपट न करणाऱ्या माणसाचें सुदैवानें कल्याण होणें. उदा. मल्हाररावांनीं नोकरीसाठीं अर्जबिर्ज करावयाचे ते कांहींच केले नाहींत. तथापि त्यांच्या गुणांवरून रावसाहेबांनीं त्यांची एका जागीं नेमणूक केली; आळशावर गंगाच आली ती !
 8. इकडचा डोंगर तिकडे करणें – प्रचंड, किंवा फार मोठें, काम करणें.
 9. इंगा फिरणें – इंगा म्हणून चांभारांचें एक हत्यार असतें. तें कातड्यावर जोरानें ठोकून फिरवून तें कातडें मऊ आणि गुळगुळीत करतात. कातड्यावर इंगा फिरला म्हणजे तें टणक, खरखरीत, किंवा राठ, असलें तरी मऊ, गुळगुळीत, व लुसलुशीत होतें. त्याप्रमाणें “एकाद्या माणसावर इंगा फिरणें,” म्हणजे तो दुर्देवाच्या, किंवा समर्थाच्या अवकृपेच्या, तडाख्यांत, सांपडून त्याचा ताठा जाऊन तो नरम होणें.
 10. इतिश्री होणें, (किंवा करणें) – समाप्त होणें, (किंवा करणें). संस्कृत पुस्तकांच्या शेवटीं, किंवा त्यांतील अध्यायांच्या शेवटीं, जे समाप्तिसूचक वाक्य असतें, त्याचे पहिले शब्द “इति श्री” असे असतात. यावरून इतिश्री म्ह० समाप्ति किंवा शेवट असा अर्थ झाला, आणि “इति श्री करणें, (किंवा होणें),” ह्याचा अर्थ नाश करणें, संपविणें, (किंवा नष्ट होणें, संपणें) असा झाला.
 11. इमानास जागणें – (क) इमान नष्ट न होऊं देणें. इमान शाबूत ठेवणें. (ख) पूर्वींचे उपकार कृतज्ञतापूर्वक स्मरून वागणें.
 12. ईर [सं० वीर्य]. ईर – शक्ति, जोर, गुण, उत्कर्ष. “ईर” ह्या शब्दाचें “इरेस” हें एकच विभक्तिरूप योजण्यांत येतें.
 13. इरेस घालणें – आपला बचाव करून घेण्यासाठीं दुसऱ्या कोणास तरी आपल्यापुढें घालणें, किंवा ठेवणें. [बुद्धिबलाच्या डावांत राजाला प्रतिपक्ष्यानें शह दिला, म्हणजे आपलें कांहीं तरी मोहरें राजाच्या बचावासाठीं पुढें सारतात, त्याला “इरेस घालणें” म्हणतात]. उदा. एके प्रसंगीं नाना फडणविसांनीं निजामास इरेस घातलें होतें.
 14. इरेस चढणें – (क) चुरस लागून आपलें वर्चस्व स्थापित करण्यासाठीं पुढें सरसावणें. (ख) आपला पराक्रम, हिंमत, वगैरे दाखविण्यासाठीं कंबर बांधून सिद्ध होणें. [“इरेस, किंवा इरईस, पडणें” ह्याचाही वरींलप्रमाणेंच अर्थ. “इरई” हा “वीरश्री” चा अपभ्रंश].
 15. उकळी फुटणें – मनोविकाराचा जोर, किंवा क्षोभ, अंतःकरणांत एकाएकीं होणें. उदा. जय मिळवून आलेल्या बाजीरावास पाहतांच लोकांना आनंदाची उकळी फुटली. [अग्निसंयोगानें पाण्याला, दुधाला, वगैरे उकळी फुटते, तें रूपक येथें आधारभूत आहे].
 16. उकिरडा फुंकणें – गुरेंढोरें, गाढवें, उकिरड्यावर उष्ट्या पत्रावळी वगैरे चाटीत असतात, आणि त्या वेळीं त्यांच्या नाकपुड्यांतून बाहेर पडणाऱ्या उच्छ्वासाचा पत्रावळींवर जोराचा आघात होऊन फुंकणीच्या वाऱ्याप्रमाणें मोठा आवाज होत असतो. ह्या सादृश्यावरून “उकिरडा फुंकणें,” म्हणजे दारिद्र्यामुळें यःकश्चित् लाभासाठीं भटकणें. उदा. तूं आतां विद्या करीत नाहींस ! मोठेपणीं उकिरडे फुंकणार कीं काय ?
 17. एकाद्याचें उखळ पांढरें होणें – त्याला वैभव प्राप्त होणें.

 1. उखाळ्या पाखाळ्या काढणें – वर्मेंकर्में काढणें. एकाद्याच्या हृदयाला बोचण्यासाठीं त्याच्या लाजिरवाण्या गोष्टी काढून त्या बोलून दाखविणें. उदा. श्रीनिवासराव आणि पितांबरराव हे एकमेकांच्या उखाळ्या पाखाळ्या काढून एकसारखे दोन तास भांडत होते !
 2. उच्छाद येणें – त्रास, उपद्रव होणें. उदा. मुलांच्या धिंगामस्तीनें मला उच्छाद आला आहे.
 3. उच्छाद काढणें – गांजणूक सोसणें. उदा. ह्या मुलांचा उच्छाद मी काढूं तरी किती ?
 4. उजेड पाडणें – प्रकाश पाडणें; मोठें कृत्य करणें. [याची नेहेमीं उपहासानें योजना होते]. उदा. आम्ही तर हात टेकले ! आता तुम्ही काय उजेड पाडतां पाहूं !
 5. उठतां लाथ आणि बसतां बुकी – सदासर्वदा मार. उदा. तुला उठतां लाथ आणि बसतां बुक्की असें पाहिजे. एऱ्हवीं तू ताळ्यावर येणार नाहींस !
 6. उडत्या पांखराचीं पिसें मोजणारा – पांखरूं उडत असतां त्याचीं पिसें मोजणें हें काम अशक्य, किंवा दुर्घट, आहे. तें जो कोणी करूं शकेल, तो हुशारच असला पाहिजे. यावरून “उडत्या पांखराची पिसें मोजणारा,” ह्याचा हुशार, कावेबाज, पाताळयंत्री, माणूस असा अर्थ होतो. [ही शब्दसंहति नेहमीं वाईट अर्थानें योजण्यांत येते].
 7. उदक, किंवा पाणी, सोडणें – “ब्राह्मणाला दान करते वेळीं द्यावयाच्या वस्तूवर यजमान उदक, म्हणजे पाणी, सोडतो. यावरून “एकाद्या वस्तूवर उदक सोडणें,” ह्याचे पुढील दोन अर्थ झाले. (क) ती देऊन टाकणें; तिच्यावर आपली मालकी नाहीं असें म्हणणें. (ख) तिच्याबद्दल हळहळ वाटून न घेणें.”
 8. उधे उधे करणें – “उधे, उधे” हा शब्द “उदय, उदय” ह्याचा अपभ्रंश आहे. उदय ! उदय !! म्हणजे उदय होओ ! जयजयकार असो ! वैभव दिसो ! भरभराट होओ ! “उदय”ह्या शब्दाचें अपभ्रष्ट रूप उदे, किंवा उधे, असें आहे. देवीचे भक्त तिच्या पुढें, दंडवत घालतांना, किंवा भिक्षा मागतांना, “उदे उदे” किंवा “उधे उधे” हा शब्द उच्चारतात. ह्या चालीवरून उधे उधे करणें ह्म० फार फार स्तुति करणें, असा अर्थ पुढें रूढ झाला. एकाद्या पदार्थाची, किंवा माणसाची, उधे उधे करणें ह्म० त्याचे फाजील गोडवे गाणें, किंवा त्याला नसतें महत्त्व देणें. उधे उधे ह्याचा पुलिंगी आणि स्त्रीलिंगीही प्रयोग होतो.
 9. उंबरें फोडून केंबरें काढणें – उंबराच्या फळांत जे क्षुद्र जंतु असतात, त्यांना “केंबरे” म्हणतात. मोठ्या कामाची नासाडी करून जेव्हां कोणी लहान काम करतो, तेव्हां “त्यानें उंबरें फोडून केंबरें काढलीं,” असें म्हणतात.
 10. उंबरघांट – उंबरा हाच कोणी घांट. पर्वताचा घांट ओलांडणें हें फार कठिण असतें. त्याप्रमाणें घराचा उंबरा ओलांडून बाहेर निघणें हें महा कर्म कठिण असतें. कारण, घरांतून विद्या, नोकरी, धंदा, वगैरेंसाठीं बाहेरगांवीं पडणें प्रत्येकाच्या जिवावर येतें. तेव्हां तो म्हणतो, “हा उंबरघांट ओलांडणें म्हणजे महा कर्म कठिण आहे !”
 11. ऊत येणें – कढी, दूध, खीर, वगैरे पदार्थ चुलीवर ठेविले, म्हणजे ते उतूं जातात, म्हणजे त्यांतील पाण्याचा अंश फेस आणि वाफ ह्यांच्या रूपानें बाहेर पडतो. हा अंश भांड्यांत राहूं शकत नाहीं. यावरून “ऊत येणें” म्हणजे आंत न राहण्याइतकें पुष्कळ होणें, किंवा संख्या अथवा परिमाण वाढून अतिरेक होणें. उदा. हल्लीं व्याख्यानांना, प्रहसनांना, मारामाऱ्यांना, ऊत आला आहे. दूसरे उदा. यंदा आंब्यांना ऊत आला आहे.
 12. ऊहापोह करणें – “चर्चा करणें. ऊह = तर्क; अपोह = उलटा तर्क. “एकाद्या विषयाचा ऊहापोह करणें,” म्हणजे त्याच्यासंबंधीं सर्व बाजूंनीं तर्कवितर्क करणें, किंवा त्याची पुरती शहानिशा करणें.”
 13. एक नाहीं कीं दोन नाहीं – मुळींच कांहीं उत्तर नाहीं. उदा. “तुला कोणी मारलें?” म्हणून मी त्याला दहा वेळां विचारिलें. पण तो आपला स्वस्थ उभा ! एक नाहीं कीं दोन नाहीं !
 14. एका नावेंत असणें – एकाच परिस्थितींत असणें. हें एका इंग्रजी संप्रदायाचें मराठी भाषांतर आहे, असें कोणीं समजतात. परंतु आमच्या मतें “एकाच नावेंत असणें,” हा अस्सल मराठी संप्रदाय आहे. तो मोलस्वर्थच्या कोशांत दिला आहे, त्याची पहिली आवृत्ति १८३१ सालीं, आणि दुसरी १८५७ सालीं छापली गेली होती.
 15. एका पायावर तयार असणें – एकादी गोष्ट करावयाला अत्यंत उत्सुक असणें. उदा. माझी मुलगी फिरायाला जावयाला एका पायावर तयार असतें. दूसरे उदा. मारामारी करावयाला सटवाजी सदा एका पायावर तयार असतो !
 16. एकूण क्षेत्रफळ सारखेंच – एकाद्या खोलीची लांबी ६ फूट आणि रुंदी ४ फूट असली, तर तिचें क्षेत्रफळ २४ चौरस फूट होतें. तिची लांबी वाढवून ८ केली, आणि रुंदी कमी करून ३ केली, तरी तिचें क्षेत्रफळ चोवीस चौरस फूट होते. यावरून एकूण क्षेत्रफळ एकच, किंवा सारखेंच, किंवा तेंच, ह्याचा अर्थ परिणाम किंवा फळ एकच, दोन्ही गोष्टी सारख्याच, किंवा एकूण एकच असा झाला. उदा. जिलबीच्याबद्दल तुम्ही पुरणपोळी केली तरी क्षेत्रफळ तेंच. कारण, जिलबी तळावयाला जितकें तूप खर्च होणार, तितकेंच पुरणपोळीला वरून वाढावयाला लागणार !
 17. ओचा ठो करतां न येणें – मुळींच कांहीं न येणें. मुलाच्या विद्येला सुरवांत करतांना त्याला “ओनामासिधं,” (“ओम् नमः सिद्धम्” याचा अपभ्रंश शिकवितात). “ओनामासिधं” याचें पहिलें अक्षर “ओ” हें आहे. तेही ज्याला येत नाहीं, तो ठोंब्याच असावयाचा. “ठो” हें अक्षर “ओ” शीं यमक साधण्यासाठींच केवळ योजलेलें आहे.
 18. ओम्‌फस् होणें – निष्फळ होणें. लयास जाणें. उदा. आम्ही आदित्यवारीं अंबरनाथास वनभोजनासाठीं जाणार होतो; परंतु आदित्यवार उजाडतो, तों अशी खबर आली, कीं त्या गांवीं पटकीचा उपद्रव आहे. तेव्हां आमचें जाणें रहित होऊन सारेंच ओम्‌फस् झालें !
 19. ओ म्हणतां ठो येईना – अगदीं कांहीं येईना! अगदीच मतिमंद !
 20. औषधाला नसणें – औषधाला पदार्थ घ्यावयाचा, तो अगदीं अल्प प्रमाणांत घ्यावयाचा असतो. तेवढाही पदार्थ नसणें, म्हणजे मुळींच नसणें.
 21. कच्छपीं लागणें – आपलें कार्य साधण्यासाठीं दुसऱ्याच्या कासोट्या प्रमाणें त्याच्या मागोमाग जाणें; स्वकार्यास्तव एकाद्याच्या मागें लागणें; त्याची पाठ पुरविणें. उदा. रामराव कापडवाला आलीकडे गोवर्धनपंतांच्या कच्छपीं लागला आहे ! आपल्या दुकानांतील कापड त्यांनीं खरेदी करीत जावें, हाच त्याचा उद्देश दिसतो. [कच्छ म्हणजे कासोटा, त्याचें “कच्छप” हें विनोदी किंवा आडमुठें रूप].
 22. कडी करणें – चढाओढ करून श्रेष्ठत्व मिळविणें. सरशी करणें. वरताण करणें. “उदा. हर्षकाळीं हिंदू व बौद्ध असे दोन्ही धर्माचे लोक आपआपल्या मंदिरांतील मूर्तींच्या विलक्षण सामर्थ्यांबद्दल नानाप्रकारच्या भोळ्या कल्पना करण्यांत एकमेकांवर कडी करीत होते. चिं० वि० वैद्य, मध्ययुगीन भारत.”
 23. कडेलोट – पूर्वींच्या काळीं कोणाला अतिमोठा, किंवा परमावधीचा, देहदंड करावयाचा असतां त्याला कड्यावरून खालीं लोटीत असत. ह्याला “कडेलोट करणें,” असें म्हणत. यावरून “एकाद्या गोष्टीचा कडेलोट होणें, म्हणजे तिचा परमावधि होणें. उदा. आम्ही मुलीच्या लग्नासाठीं कडेलोट म्हणजे पांचशें रुपये खर्च करूं ! दूसरे उदा. प्रथम गोपिकाबाईचा नवरा मेला. त्याच्या पाठोपाठ तिचा एकुलता एक मुलगा मेला ! तिच्या दुःखाचा कडेलोट झाला !
 24. एकाद्याची कणीक तिंबणें – त्याला झोडपणें, किंवा खूप मार देणें. [पोळ्या करावयाच्या अगोदर कणीक मुठींनीं खूप मळावी आणि तिंबावी लागते, तसें एकाद्याचें अंग खूप मळणें].
 25. कढी पातळ होणें – आजारानें, किंवा भीतीनें, जर्जर होणें. [कढींत पाणी फार झाल्यास ती बेचव होते, हें रुपक येथें आधारभूत आहे].
 26. कण्या टाकून कोंबडीं झुंजविणें – आपला पैसा वगैरे खर्चून दोघांत कलागत उत्पन्न करून देऊन ते भांडूं लागले असतां त्यांची गंमत पाहाणें. [“कण्या” बद्दल “दाणे,” असाही शब्द योजतात].
 27. एकाद्याचा कपाळमोक्ष करणें – त्याला खूप झोडपणें. त्याचा नाश करणें. [चितेवर प्रेत ठेविले म्हणजे दगडानें त्याच्या कपाळावर आघात करतात. ह्या चालीवरून वरील वाक्प्रचाराची उत्पत्ति आहे].
 28. कलम करणें – छाटून टाकणें उदा. माझ्या हिशेबांत एक चुकीं निघाली, तर मी आपला हात कलम करून देईन ! दूसरे उदा. चोरी करील त्याचा हात कलम करावयाची कित्येक देशांत चाल आहे.
 29. कल्पान्त करणें – ब्रह्मदेवाच्या एका दिवसास “कल्प” असें म्हणतात. ह्या दिवसाचा जो अंत, म्हणजे शेवट, तो कल्पान्त. कल्पान्ताचे समयीं पृथ्वी, आप्, तेज, वगैरे पंच महाभूतांचा भयंकर क्षोभ होऊन जगाचा नाश होतो. ह्यावरून “कल्पान्त करणें,” ह्याचा उपयोग मोठा क्षोभ करणें, भयंकर आकांत किंवा कल्लोळ करणें, ह्या अर्थानें केला जातो. उदा. आमच्या मुलांना रोज दहा वाजतां जेवणाची सवय आहे. काल आमच्या येथें श्राद्धविधि व्हावयाचा होता, म्हणून जेवणाला बारा वाजले, तेव्हां मुलांनीं जो कल्पान्त केला, तो सांगतां सोय नाहीं !
 30. कसाला लागणें, टिकणें, किं० उतरणें – कस लाविला असतां उत्तम ठरणें; परीक्षा केली असतां उत्कृष्ट असा आढळून येणें. “उ० कसास लागे भट आहवांत, नीति प्रतिज्ञापरिपालनांत । सभेंत विद्वान्, विपदेत मित्र, दारिद्र्य आल्यासमयीं चरित्र ॥ वि० वा० भिडे, सूक्तिसुधा.”
 31. कसपटाप्रमाणें मानणें – कसपट म्हणजे लाकूड, गवत, वगैरेंचें कुसळ; त्याचे प्रमाणें मानणें, म्हणजे क्षुल्लक, कुचकिमतीचा, भिकार, मानणें.
 32. कसूर करणें – टंगळमंगळ करणें; दुर्लक्ष्य करणें. “उदा. [आपले दोन पुत्र संभाजी व राजाराम] ह्यांस त्या वेळच्या समजुतीप्रमाणें योग्य शिक्षण देण्यांत शिवाजीनें कसूर केली नाहीं. गो० स० सरदेसाई.”
 33. कळ लावणें – दोघांत भांडण उपस्थित व्हावें म्हणून एकापाशीं दुसऱ्याची कांहीं तरी चाहाडी करणें; [कळ = कलि = भांडण].
 34. कळस होणें – देऊळ वगैरे इमारतींवर कळस ठेविला, म्हणजे बांधकामाची पूर्णता झाली, किंवा तें बांधकाम व्हावयाचें तितकें उंच झालें, असें होतें. त्याप्रमाणें “एकाद्या गोष्टीचा कळस होणें,” म्हणजे ती पूर्ण वैभवास चढणें, किं० तिचा जोर, तीव्रता, विस्तार, वगैरेंची पूर्ण वाढ होणें. [ही शब्दसंहति चांगल्या व वाईट अर्थानें योजण्यांत येतें]. उदा. मऱ्हाठ्यांचा राज्याचा कळस; दुःखाचा कळस; वात्रटपणाचा कळस इत्यादी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *