“जीभ”

जीभ(क) प्राण्यांच्या तोंडांतील अवयवविशेष; ज्याच्या योगानें खाद्य पदार्थाची रुचि समजते, व खाद्य पदार्थ चर्वणासाठीं दातांमध्यें किंवा दाढांमध्यें ढकलितां येतो; मानवी प्राण्यांत हा अवयव बोलण्याचेंही एक इंद्रिय असतो. जिव्हा. 
 (ख) जिभेच्या आकाराचा अवयव, किं० भाग, किं० कोणताही पदार्थ. 
 (ग) अग्नीची ज्वाळा.टीप- “जीभ” ह्या शब्दाचे बहुतेक वाक्प्रचार “जिव्हा’ ह्या शब्दाशीं मिळतेच आहेत. विद्यार्थ्यानें ३९ आणि ४० हे लेखांक बरोबर वाचावे.
जीभ चावलीशीं करून बोलणें  संकोचवृत्तीने बोलणें; नियंत्रितपणें बोलणें. 
जीभ जड होणेंउच्चार करावयाला जीभ असमर्थ होणें.उ० करवंदें खाऊन माझी जीभ जड झाली आहे.
  उ० मुलांनीं विडा खाऊं नये, विड्यानें जीभ जड होते.
जीभ जड असणें (क) स्पष्ट उच्चार करावयास जीभ असमर्थ असणें.
 उ० तात्याची जीभ जराशी जड आहे.
  (ख) लवकर पाठ करावयाला असमर्थ असणें.उ० त्याची जीभ जड आहे. (म्ह० त्याला लवकर पाठ होत नाहीं).
जीभ झडणेंजीभ गळून पडणें.उ० मी कांहीं खोटे बोलत असेन तर माझी जीभ झडेल !
 जीभ नरकांत घालणेंखोटें बोलणें; दिलेले वचन न पुरविणें; बोललेली गोष्ट नाकबूल जाणें. 
जीभ पाघळणें अनियंत्रितपणे बोलून जाणें; स्वच्छंदानें बोलणें.उ०. हा माझा बेत माझ्या मनांत कोणाला कळवावयाचा नव्हता, पण माझ्या दोस्ताची जीभ पाघळलीना ! तेथें मी काय करूं ?
जीभ मोकळी सोडणें(क) मन मानेल तें खाणें. 
 (ख) स्वच्छंदानें, अनियंत्रितपणें, बोलणें. 
जीभ वळवळणेंबोलावयाला तयार होणें, किं० उत्सुक होणें. बोंलण्याची उत्कट इच्छा होणें. उ० ह्या मुलाची जीभ वळवळूं लागली आहे, तें लवकर बोलूं लागेल असा रंग दिसतो.
जीभ विटाळणें जीभ अपवित्र होणें; (भलतेंच बोलल्यामुळें किं०. भलतेच खाल्यामुळें, किं० नालायख मनुष्याची शिफारस केल्यामुळें, किं० निष्फळ रदबदली केल्यामुळें). 
जीभ सोकवणें किं० लालचावणेंजीभ चटावणें; खाण्याला उत्सुक असणें.उ० रोज रोज पेढे खायाला तुझी जीभ लालचावली आहे !
 जिभा काढणेंएकादा पदार्थ खावयासाठीं आशाळभुताप्रमाणें मागणें.उ० पेढ्यासाठीं अशा जिभा कशाला काढतोस ? कधीं पेढे खाल्ले नाहींस कीं काय ?
  टीप – एका मनुष्यास जीभ एकच असते, परंतु वाक्प्रचाराने  “जिभा काढणें, ” अशी अनेकवचनी शब्दसंहति ग्राह्य म्हणून ठरविली आहे, विद्यार्थ्याने लक्ष्यांत बाळगावें. मागें ले०२२ पहा.
जिभेचे फुटाणे फुटणेंमुखांतून वक्तृत्वपूर्ण भाषण निघणें.उ० माधवराव कुंटे बोलूं लागले म्हणजे त्यांच्या जिभेचे जसे फुटाणे फुटत असत !
जिभेला चिमटा घेणेंएकादी रुचकर वस्तु खाण्यापासून, किंवा एकादी समयोचित गोष्ट बोलण्यापासून, जिभला निवृत्त करणें.उ० रामभाऊची लबाडी चार मंडळींत सांगण्याच्या मी अगदी बेतांत होतों, पण तो लहान तोंडी मोठा घास होईल, अशा भयानें मी आपल्या जिभेस चिमटा घेतला !
   उ० बासुंदी आणखी दोन पात्रें देखील मी खाल्ली असती, परंतु मी आजारी आहे ही गोष्ट मनांत आणून मी जिभेला चिमटा घेतला.
 जिभेला आडवा वेढा नसणेंमन मानेल तसें बोलणारी जीभ असणें. उ० गोपाळरावाच्या जिभेला आडवा वेढा नाहीं, (म्ह० स्थल, काळ, वगैरेंचा विचार न करतां तो हावें तें बोलतो).
 जिभेचा लोळा होणेंअति उष्ण, किं० तिखट, किं० गार, पदार्थ तोंडांत घातल्यामुळें जीभ हालविण्याची शक्ति एकदम नाहींशी होणें. 
जिभेला टाका देऊन एकादें खाद्य दुसऱ्यासाठीं राखून ठेवणेंआपली इच्छा आवरून धरून दुसऱ्याला खावयासाठीं एकादी वस्तु राखून ठेवणें.उ० हें पिठलें अतिस्वकर झालें होतें, तें सारें देखील मीं एकट्यानें खाऊन टाकिलें असतें; पण मी जिभेला टाका देऊन तें तुझ्यासाठी ठेविलें.
 जिभेला हाड नसणेंजिभेला नियंत्रणा नसणें. खोटे बोलणें हें ज्याच्या खिजगणतींत नाहीं, अशा मनुष्याविषयीं बोलतांना म्हणतात, “ती हावें तें बोलेल ! त्याच्या जिभेला हाड नाहीं !“ 
जीभ लांब करून बोलणेंस्थल, काल, वगैरे मनांत न आणतां, किं उर्मटपणानें, बोलणें. 
जीभ लांब होणेंमन मानेल तसें, खोटेनाटें, पाजीपणाचें, किंवा मूर्खासारखें, बोलण्याकडे प्रवृत्ति होणें.उ० आलीकडे कासोबा घंट्याळ्याची जीभ फार लांब झाली आहे !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow by Email
error: Content is protected !!