“अंत” या शब्दांचे अनेक अर्थ आहेत. ते अर्थ पुढे दिले आहेत. (क) शेवट, मृत्यु, समाप्ति. उ० इ० सन १६८० च्या एप्रिल महिन्याच्या ५ व्या तारखेस, रविवारीं, श्रीशिवाजी महाराजांचा अंत झाला, (म्ह० ते मरण पावले). उदा. “माझा ग्रंथ अद्यापि अंतास गेला नाहीं”. (ख) (व्याकरणांत) शेवटचा स्वर. उदा. ‘घोडा,’ हा शब्द आकारान्त आहे. उ० वेणी हा शब्द ईकारान्त आहे. (ग) काम करण्याची, उपयोगीं पडण्याची, ताकद. उदा. ह्या धोतरांत आतां कांहीं अंत राहिला नाहीं ! तें टाकून देऊन दुसरें घ्या.
- एकाद्याचा अंत पाहणें – त्याला पुरतेपणीं कसास लावणें, त्याचेपासून निघेल तितकें काम काढणें. एकाद्या जनावराचा, माणसाचा, किंवा पदार्थाचा, होईल तितका उपयोग निर्दयपणें, किंवा निःशंकपणें, करून घेणें; त्याची ताकद, जोर, सहनशक्ति, किंवा कर्तृत्वशक्ति, जितकी असेल तितकीचा पूर्णपणें उपयोग करारीपणानें करून घेत राहणें; त्याला छळणें; किंवा गांजणें. उदा. “देवा, आतां माझा अंत पाहूं नको ! सोडीव मला ह्या जाचांतून !
- अंत लागणें – शेवट दिसणें; खोली समजणें, किंवा सांपडणें. उदा. “लोहगडच्या किल्ल्यांत एक गुहा आहे, तींत मलकाप्पा एक मैल खोल गेला, तरी तिचा त्याला अंत लागला नाहीं !”, “ह्या विहिरींतील पाण्याचा अंत अद्यापि कोणासही लागलेला नाहीं”.
- अंताला लागणें – व्यवस्थित स्वरूप पावणें; शेवटास जाणें. उदा. हें कार्य एकदाचें अंताला लागलें !