“पोट”

पोट(क) अन्नपचनाचें स्थान; जठर. 
 (ख) आतड्यांच्या खालचा, व कंबरेच्या वरचा, भाग. 
 (ग) गर्भाशय.उ० तुझें ओझें नऊ महिने मीं पोटांत वाहिलें आहे हो !
 (घ) कोणत्याही वस्तूचा फुगीर भाग.उ० गडव्याचें किं० हंड्याचें पोट.
 (ङ) कोणत्याही वस्तूचा आंतला पोकळ भाग; पोकळी.उ० “ज्याच्या पोटीं खर विष, मुखीं आज्य हैय्यंगवीन,
त्या कुंभाचे परि खल.” असें कोण बोले कवी न ? ।
                                        वि० वा० भिडे,–पापात्मा.
 (च) अवकाश किं० आधार,–ज्यांत लहान, किंवा किरकोळ, किंवा कमी महत्त्वाच्या, वस्तूंचा समावेश करतां येतो.उ० तुम्ही आम्हां पैकीं प्रत्येकाला वेगळें वेगळें आमंत्रण करीत बसूं नका; एक नारायणरावांना आमंत्रण केलें, म्हणजे पुरे आहे; त्यांच्या पोटांत आम्हीं येतोच.
  उ० वरप्रस्थान, वाङ्‌निश्चय, इत्यादि हीं सर्व कर्में विवाहाच्या पोटांत येतात; (म्ह० विवाहाच्या विधींत समाविष्ट होतात).
 (छ) मन, अंतःकरण, आशय.उ० नीलकंठराव तुझ्याशीं गोड बोलला म्हणून फसूं नको; त्याच्या पोटांत कपट आहे.
 (ज) पोटांतील हेतु (म्ह० शब्दांनीं बोलून न दाखविलेला हेतु). 
माझें पोट गळ्याशीं लागलें आहे, आतां मला लाडवांचा आग्रह करूं नकामीं खाल्लेलें अन्न अगदीं कंठापर्यंत येऊन पोचलें आहे, आतां इ० 
पोट जाणेंरेच होणें. 
पोट जाळणें(क) पोट भरणें; (निंदेंत, किं० वैतागांत, ह्याचा उपयोग होतो).उ० समर्थांची लाळ घोटूं नको तर काय करूं? हें पोट जाळावयाचें आहे ना ?
 (ख) दुसऱ्याचें नुकसान करून आपला फायदा करून घेणें.उ० ह्या वेळीं मला बढती मिळावयाची, पण त्या शंकररावानें आपलें पोट जाळलें ना ! (म्ह० मला मिळावयाची जागा त्यानें उपटली !)
पोट जिरणेंगर्भशमन होणें.उ० त्या सगुणाबाईचें पोट जिरलें आणि आज तीन वर्षे तिच्या पोटांत सल राहिला आहे.
त्याचें पोट आज सकाळपासून ढाळत आहेत्याला रेच होत आहेत. 
पोट दुखणें(क) अजीर्ण वगैरेंच्या कारणानें पोटांत वेदना होणें. (ह्याच अर्थानें “पोटांत दुखणें,” ह्याचाही उपयोग केला जातो). 
 (ख) मत्सर वाटणें; असह्य होणें; वाईट वाटणें.उ० म्हण–“खरचणाराचें खरचतें आणि कोठावळ्याचें पोट दुखतें !”
पोट पाताळास किंवा रसातळास जाणेंपोटांत फार वेळ अन्न न गेल्या कारणानें पोट खोल जाणें किंवा अगदीं रिकामें असणें. 
त्याच्या पोटाची पत्रावळ झाली आहे किं० त्याचे पोट बखाटीस गेलें आहेजेवणाची वेळ टळून गेल्यामुळें त्याचे पोट खोल गेलें आहे. 
पोट फुगणें(क) अजीर्णादिकांमुळें पोटांत वायु सांठून पोट मोठें होणें. 
 (ख) एकादी गुप्त बातमी कोणाला तरी सांगण्याला संधि न मिळाल्या कारणानें अस्वस्थता वाटणें.उ० काय रे ! ही बातमी कोणाला कळवूं नको म्हणून तुला मीं बजाविलें होतें ना ! मग कां सांगितलीस ? ती गुप्त ठेविली असतीस तर तुझें पोटबीट फुगलें असतें की काय ?
पोटाला गांठीं देणेंचिक्कूपणानें किं० दारिद्र्यामुळें पोटाला पुरेसें अन्न न खाणं. पुढें “पोटाला” पाटा बांधणें पहा. टीप–ज्यांना दोन दोन, तीन तीन, दिवस खावयाला कांहीं मिळालेलें नाहीं, असे गरीब लोक पोटाभोंवतीं खरोखरींच दोरी घट्ट बांधून तिला दोन तीन गांठी मारतात; असें केल्यानें पोटाच्या रिकामेपणाच्या वेदना कमी होतात. सद्यःप्रसूत स्त्रीच्या पोटाला अशाच हेतूनें पट्टा घट्ट आवळून बांधतात. 
पोट बाहेर पडणेंभोजनाचा खर्च बाहेर पडणें.उ० ह्या व्यापारांत माझें पोट बाहेर पडून दरमहा निदान दहा रुपये शिलकीस पडतात.
पोट फुटणेंखरोखरीं पोट फुटल्याप्रमाणें पोटाला वेदना होणें.उ० हसतां हसतां आमचीं पोटें फुटलीं !
पोट बुडणेंचरितार्थाचें साधन नाहीसें होणें.उ० यंदा पाऊस चांगला पडला नाहीं. माझें पोट बुडालें; (म्ह० शेतें न पिकल्याकारणानें माझें चरितार्थाचें साधन नाहींसें झालें !)
पोट भरणें(क) चरितार्थ चालविणें.उ० तो कारकुनी करून आपलें पोट भरतो; (म्ह० आपली उपजीविका चालवितो).
 (ख) ज्जास्ती अन्न खाण्याला पोटांत जागा न उरणें.उ० माझें पोट भरलें; आतां जिलब्यांचा आग्रह करूं नका !
पोट सरणेंरेच होणें. 
पोट सुटणें(क) खावयाला, प्यावयाला, यथेच्छ मिळत असल्यानें दोंद येणें. 
 (ख) उदरनिर्वाहाचा खर्च बाहेर पडणें; (म्ह० आपल्या अंगावरून पडणें). 
पोटाचा डमामा किं० नगारा होणेंपोटांत वायु धरल्यामुळें पोट फुगणें. 
पोटाचे पाठीस लागणेंचरितार्थाचीं साधनें मिळण्याकडे सर्व वेळ, शक्ति, लावणेंउ० आम्ही पोटाच्या पाठीस लागलेलीं माणसें, आम्हांला कसचीं काव्ये, आणि कसचीं नाटकें?
पोटांत कालवणें(क) दुःखामुळें अस्वस्थता वाटणें. 
 (ख) दयेनें अस्वस्थता वाटणें. 
 (ग) मळमळण्यामुळें अस्वस्थता वाटणें. 
अपराध पोटांत घालणेंअपराधाबद्दल क्षमा करणें.उ०—
अपराध सर्व माझे घालीं पोटांत, जोड मज दे ही ।
पावे सरी सुरांशीं मर्त्यहि दावुनि दया सहज देही ॥
एकाद्याला पोटीं घालणेंत्याला ममतेनें आपल्या आश्रयाखालीं घेणें.उ०
प्रेरणा न करितां संकटीं । कृपेनें अनाथ घाली पोटीं ।
केला उपकार न बोलें ओठां । तो एक धन्य पुरुष ॥                                                                           मुक्तेश्वर.
पोटांत ठेवणेंगुप्त ठेवणें, कोणाला न कळूं देणें. 
पोटांत पोट चालणेंएकाच्या अन्नांत दुसऱ्याचा समावेश होणें. 
पोटांत शूळ उठणें किं० पोटांत सलणेंमत्सर वाटणें. 
एकाद्याच्या पोटांत शिरून एकादी गुप्त गोष्ट काढणेंगोड गोड बोलून, किं० आपल्याबद्दल दुसऱ्याच्या मनांत विश्वास उत्पन्न करून देऊन, त्याचा गुप्त बेत, किं० विचार, समजून घेणें.उ० आत्मारामपंताला दुसऱ्याच्या पोटांत शिरून त्याचे गुप्त विचार चांगले काढून घेतां येतांत!
पोटावर मारणें, पोटावर पाय देणें, पोटाआड येणेंदुसऱ्याच्या उपजीविकेच्या साधनें नाहींशीं करणें.उ० मी येथें एक चहाकाफीचें दुकान काढिलें आहे. तें चांगलें चालत आहे. आतां अगदीं माझ्या दुकानाशेजारीं तूंही चहाकाफीचें दुसरें दुकान काढणें, म्हणजे माझ्या पोटाआड येणें होईल. यासाठीं तूं पलीकडच्या आळीला दुकान काढ, म्हणजे तें दोघांनाहीं बरें !
एकाद्याच्या पाठीवर पाहिजे तर मारावें, पोटावर मारूं नयेत्यानें कांहीं अपराध केला असतां त्याचीं चरितार्थाचीं साधनें बुडवूं नयेत, त्याला देहदंड खुशाल करावा. 
पोटावारी नोकरी करणेंफक्त जेवण हा मोबदला घेऊन नोकरी करणें. 
पोटाशीं, पोटशीं, पोटिशीं, पोटेशीं, असणेंगरोदर असणें. 
एकाद्याला पोटाशीं धरणेंत्याच्यावर प्रेम करणें.उ० लक्ष्मणरावाला तूं उगीच पोटाशीं धरिलें आहेस, तो केव्हां तुझ्यावर उलटेल ह्याचा नेम नाहीं !
पोटाला तडस लागणें किं० पोट तडीस लागणेंफार जेवल्यामुळें अस्वस्थता वाटणें. 
एकाद्याच्या पोटींजनक किंवा जननी ह्या नात्यानें; पिता किंवा माता ह्या नात्यानें त्याला किं० तिला.उ० त्यांच्या (किं० तिच्या) पोटीं संतान नव्हतें.
  उ० शिवाजीसारख्या महापुरुषाच्या पोटीं संभाजीसारखा दुर्वृत्त व कर्तव्यपराङमुख पुत्र निपजला, ही राष्ट्राच्या मोठ्या दुर्दैवाची गोष्ट असून ती मोठ्या आपातास कारण झाली.
                                                      गो० स० सरदेसाई.
गोंवर वगैरे रोग पोटींतो लवकर बरा न होण्याच्या स्थितीला जाणें. 
पोट धरून किंवा धरधरून हसणेंमोठमोठ्यानें हसणें. [टीप–फार फार, किंवा मोठमोठ्यानें, हसलें असतां पोट दुखूं लागतें, यासाठीं तें हातानें दाबून, म्हणजे चेपून, धरावें लागतें.] 
पोट मोठें करणेंदया दाखविणें. 
पोटाचें दुःख सोसणें किंवा काढणेंभुकेची वेदना सोसणें. 
त्याच्या पोटांत कावळे कोकलूं, ओरडूं, तोडूं किंवा टोचूं लागले आहेतत्याला अतिशय भूक लागली आहे. 
त्याच्या पोटांत कोंबडीं चरूं लागलीं आहेतत्याला फार भूक लागली आहे. 
पोटांत पाय शिरणेंखचून जाणें; भ्रांत होणें.उ० सदोबाच्या मरणाची खबर ऐकिल्यापासून माझे पायच जणों पोटांत शिरलें आहेत ! (म्ह० दुःखानें मी अगदीं भांबावून गेलों आहे).
त्याच्या पोटांत ब्रह्मराक्षस उठला आहे !त्याला अतोनात खा खा सुटली आहे ! 
पोटाला पाटा बांधणेंभुकेच्या वेदना बंद करण्यासाठीं धोतरानें पोट बांधणें. 
पोटाला बिब्बे घालणेंउपास काढणें. 
ज्याचें पोट दुखेल तो ओंवा मागेलज्याला एकाद्या गोष्टीमुळें त्रास होत असेल, तो तिच्याबद्दल कांहीं तजवीज किंवा उपाय करीलच. 
एकाद्याच्या पोटीं येणेंत्याच्यापासून मुलगा, किं० मुलगी, ह्या नात्यानें जन्मणें.उ० असला द्वाड पोरगा माझ्या पोटीं नसता आला तर बरें होतें !
  उ० ऐकुनि अमात्य बोले, “चंद्रासम पुत्र आपुल्या पोटीं ।
येईल सत्य राया ! माझी वाणी म्हणूं नको खोटी ॥”
                                                                   गं० रा० मोगरे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow by Email
error: Content is protected !!