“ओटी”

ओटी(क) बेंबीच्या खालची व कंबरेच्या वरचा पोटाचा भाग. 
 (ख) लुगडे किं० धोतर नेसल्यावर त्याचा जो खोळीसारखा भाग होतो तो. उ० त्या मुलीनें आंब्याच्या झाडाखालीं पडलेल्या साऱ्या कैऱ्या आपल्या ओटींत भरल्या.
   (ग) मंगलप्रसंगी तांदूळ, गहूं, हळकुंडें, वगैरे पदार्थ स्त्रीच्या ओटींत घालतात ते. 
ओटी भरणें(क) स्त्रीच्या लुगड्याच्या ओटीत तांदूळ, गहू, नारळ वगैरे पदार्थ यथाविधि घालणें. 
 (ख) एकाद्याच्या आवडत्या नातलगाला औषधें वगैरेंच्या योगानें, बरें करणें; जिव्हाळ्याच्या माणसाला जीवदान देणें.उ० वैद्यबोवा, माझ्या मुलाला बरें करून माझी ओटी भरा.
ओटींत घालणें(क) एकाद्याच्या हवाली करणें.उ० पोरीला मी तुमच्या ओटींत घालीत आहे. तिचा पोटच्या मुलीप्रमाणें संभाळ करा.
 (ख) अपराध, दोष, वगैरे एकाद्याच्या माथीं बसविणें.उ० हा अन्याय तुम्ही उगीचच्या उगीच माझ्या ओटीत घालीत आहां !
  (ग) दत्तक देणें.उ० जनाबाई आपला मुलगा कधींही माझ्या ओटींत घालावयाची नाहीं.
ओटींत देणें किं० घेणेंदत्तक देणें, (किं० घेणें).उ० मी आपल्या मुलाला कोणाच्याही ओटींत देणार नाहीं
भरल्या ओटीनें(आसन्नप्रसव अशा स्त्रीसंबंधानें) मुलासकट. उ० प्रसूत व्हावयास माहेरीं जाऊं निघालेल्या सुनेस सासू म्हणाली, “भरल्या ओटीने परत ये बरें !“

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow by Email
error: Content is protected !!