Meaning of word home in Marathi | घर या शब्दाचे अर्थ

घर या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. ते पुढे दिले आहेत. (क) रहावयासाठीं बांधलेली जागा, वाडा, वगैरे, (ख) घरांत राहाणारीं, किंवा एका कुटुंबांतील, माणसें (ग) संसार, प्रपंच.  उदा. त्याला नोकरी लागतांच त्यानें स्वतंत्र घर थाटलें., (घ) एकाद्या व्यवसायांत जुटीनें काम करणारीं माणसें, किंवा मंडळी. (ङ) बीळ, (चिचुंदरी, वगैरेंचें); घरटें (पक्ष्यादिकांचें)., (च) वसतीचें ठिकाण (मालकाच्या इच्छेविरुद्ध मिळविलेलें). बळकाविलेलें ठिकाण. उदा. कांट्यानें माझ्या टाचेंत घर केलें. उदा. ढेकणांनीं ह्या कोपऱ्यांत घरें केलीं. (छ) एकादा पदार्थ शिरकावण्यासाठीं केलेला दरा, किंवा केलेलें भोंक. उदा. ह्या खांबासाठीं जाडी धर कर. उदा. भिंतीला अगोदर घर करून मग खुंटी ठोक. (ज) एकादी वस्तु सुरक्षितपणें ठेवावयासाठीं केलेली जागा.  उदा. माझ्या चष्म्याचें घर चामड्याचें आहे, आणि गिरिधररावांच्या चष्म्याचें घर लाकडाचें आहे.  (झ) पेटींतील कप्पा; खण.  (ञ) सोंगट्यांच्या, किंवा बुद्धिबळांच्या, पटावरील एक एक चौक. उदा. घोडा आडीच घरें चालतो.  (ट) (ज्योतिषांत) कुंडलीच्या कोष्टकांत सूर्य, चंद्र, वगैरे ग्रहांचीं स्थानें. (ठ) घराणें किंवा वंश. उदा. त्यांचें घर कुलीनांचें आहे. उदा. आमच्या घरांत आजपर्यंत कोणाही स्त्रीस वैधव्य आलें नाहीं; साऱ्या स्त्रिया सुवासिनी मेल्या. उदा. त्याच्या घराला पदर आहे, (म्हणजे त्यांच्या वंशांत परजातीची भेसळ झाली आहे).  (ड) उत्पत्तीचें स्थान.  उदा. शरीरांत पित्ताचें घर कोठेसें असतें ? (ढ) उत्पत्तीचें कारण. उदा. वांगें हें खरजेचें घर आहे. उदा. आळस हें दारिद्र्याचें घर होय ! (ण) वादाचें कारण.  (त) ऐपत; एकादें काम करण्याचें सामर्थ्य, किंवा ताकद. उदा. जें कांहीं करणें तें आपलें घर पाहून करावें. (थ) सतारीच्या दोन पडद्यामधील अंतर. (द) शास्त्र, कला, वगैरेंचें मर्म, खुबी, इत्यादि. उदा. तुम्ही गातां खेर, पण तुमच्या हातीं गाण्याचें घर लागलें नाहीं. (ध) अडचणीच्या, पराभवाच्या, वेळीं निसटून जाण्यासाठीं करून ठेविलेली पूर्व योजना.  उदा. ह्याच्या बोलण्यांत घर आहे, किंवा हा घर ठेवून बोलतो, (म्हणजे ह्याच्या बोलण्यांत आडपडदा आहे).  (न) आपण स्वता. उदा. इच्छी परा, तें येई घरा, (म्हणजे जो दुसऱ्याचें अनिष्ट चिंतितो, त्याच्या स्वताच्याच भोगाला तें अनिष्ट येतें).

१) घर उघडणें  – (क) लग्न करून संसार थाटणें.  उ० नारोपंतांनीं आतां घर उघडिलें आहे; ते पूर्वींचें नारोपंत नव्हत बरें कां ? (ख) एकाद्याचें लग्न करून देऊन त्याचा संसार मांडून देणें.  उदा. सदूभाऊंनीं आपली मुलगी त्या गोकर्णभटाच्या मुलास देऊन त्याचें घर उघडिलें.

२) एकाद्याचें घर घेणें किंवा घालणें – त्याच्या घराचा नाश करून सोडणें.

३) घर चालविणें – प्रपंचाची, किंवा संसाराची, जबाबदारी शिरावर घेऊन त्याची व्यवस्था पाहणें.  उदा. घर चालवी तो घराचा वैरी.

४) घर जोडणें – एकाद्या घराण्याशीं मैत्रीचा, किंवा विवाहाचा, संबंध करणें.

५) घर डोईंवर घेणें – घरांत कलकलाट करणें. उदा. चार पोरें एका ठिकाणीं गोळा झालीं, म्हणजे तीं घर जसे डोईवर घेतात ! मास्तर लोक आदित्यवारीं मुलांना सुट्टी कां देतात कोणास ठाऊक बाई !

६) घर तुटणें – एकाद्या कुटुंबाशीं असलेला मैत्रीचा, नात्याचा, वगैरे संबंध नाहींसा होणें.  

७) दुसऱ्याचें घर दाखविणें – अमक्याच्या घरीं जा, असें सांगून एकाद्यास हाकून देणें किं० दूर करणें. उदा. तो त्रागेवाला माझ्या घराशीं कटकट करीत बसला होता. त्याला मी गोवर्धनपंताचें घर दाखविलें.

८) घर धरणें – (क) घरांतच बसून राहणें; घराच्या बाहेर न पडणें. उदा. तुम्ही आठ आठ दिवस घर धरून काय बसतां ? रोज संध्याकाळीं देवदर्शनाच्या निमित्तानें तरी घराच्या बाहेर पडत जा ! (ख) एकादा आजार पक्का जडणें. उदा. दम्यानें माझ्या शरीरांत घर धरिलें आहे. (ग) चंचलपणा न करतां एकाच ठिकाणावर भिस्त ठेवून राहणें. उदा. कमलाबाई ही एक घर धरून राहणारी बाई आहे. आज साठ्यांच्या घरीं, उद्यां रानड्यांच्या घरीं, परवा लिमयांच्या घरीं, अशी नाचानाची करणारी ती बाई नाहीं. स्वयंपाकाच्या कामाला तिला तुम्हीं निःशंकपणें ठेवून घ्या.

९) एकाद्याचें घर धुणें किं० धुऊन नेणें – दुसऱ्याचें जें असेल नसेल तें सर्व लबाडीनें हिरावून घेणें, आणि त्याला बुडविणें. उदा. तुम्ही कारकुनावर फार भरंवसा टाकून राहूं नका; तो संधि सांपडल्यास तुमचें घर धुऊन न्यावयास कमी करणार नाहीं !

१०) घर नेसविणें – घरावर गवत घालून तें शाकारणें. [कोंकणांत “घर शिवणें” म्हणतात].    

११) लोकांचीं घरें पुजणें – (क) आपलें कर्तव्य न करतां लोकांच्या घरीं त्यांना भेटावयासाठीं जाणें., (ख) आपलें काम करून घेण्यासाठीं लोकांच्या घरीं वारंवार जाणें. 

१२) घर फोडणें – (क) संसार आटोपणें., (ख) कुटुंबांतील माणसांत फूट पाडणें.      

१३) घर बसणें  – घरांतील कर्ता, किंवा मिळविता, पुरुष नाहींसा झाल्यामुळे कुटुंबाला विपन्न दशा प्राप्त होणें.     

१४) घर पहाणें – घराकडे वक्रदृष्टि करणें. उदा. कालानें एकाद्याचें घर पाहिलें, कीं तें बुडालेंच म्हणून समजावें !

१५) एकाद्याचें घर बुडविणें –   त्याच्या घराचा, म्हणजे कुटुंबाचा, विध्वंस करणें.      

१६) घर फिरलें – म्हणजे घराचे वांसे फिरतात.  एकाद्या माणसावर यजमानाची वक्रदृष्टि झाली, म्हणजे त्याचे नोकर चाकर देखील त्या माणसाचा तिरस्कार करूं लागतात.     

१७) घर बुडणें – (क) कुटुंबाची नासाडी, दुर्दशा, होणें, (ख) संतति नसल्याकारणानें कुटुंबाचा लोप होणें.   

१८) घर भंगणें – घराचा नाश होणें; घराचें वैभव, किं० महत्व, नाहींसें होणें.  उदा. बापलेकांत तंटे लागल्यामुळें आठवल्यांचें घर भंगलें.

१९) आपलें घर भरणें – दुसऱ्याच्या पैशाचा हळूं हळूं गुप्त रीतीनें अपहार करून तो आपल्या घरांत आणणें. उदा. मेहुण्याला बुडवून गोवर्धनपंतानें आपलें घर भरलें.

२०) घर भलें कीं आपण भला  – जो लोकांच्या उचापतींत न पडतां मुकाट्यानें आपलें काम करीत असतो असा. जो लोकांकडे उगीचच्या उगीच न जातां आपल्याच घरीं असतो तो.

२१) घर मांडणें किंवा थाटणें – घरामध्यें संसारोपयोगी जिन्नस, किंवा वस्तु, आणून तें नीटनेटकें किं० सोयीचें करणें.

२२) घर म्हणून ठेवणें – नांदत्या घरामध्यें ह्या जिन्नसेचा उपयोग केव्हांना केव्हां तरी होईलं, असें म्हणून ती जिन्नस संग्रहास ठेवणें.    

२३) घर वसविणें – मुलाबाळांनीं घर भरून घराचा भयाणपणा नाहींसा करणें. उदा. माझी बायको मेली म्हणून मीं मुलाचें लग्न करून दिलें. म्हटलें कीं सून तरी घर वसवील.

२४) घर सांकड आणि बाईल माकड – घर भिकार आणि बायको कुरूप; (असें असलें म्हणजे भीति नाहीं).  

२५) घराचा पायगुण तसा – घरांतील माणसांची चालचलणूक असेल त्याप्रमाणें.      

२६) घराचा वांसा ओढणें – एकाद्या मोठ्या कामांतून जरूरीचें साधन नाहींसें करणें. उदा. आमच्या मंडळींतून पाटीलबोवांनीं रामभाऊंस फितविलें, आतां आम्ही काय करूं शकूं ? त्यांनीं घराचा वांसाच ओढला !

२७) घरांत विचारा किं० दाखवा इत्यादी – माझ्या पत्नीला, विचारा, दाखवा, इत्यादी. “घरांत” ह्याच्या उलट “बाहेर”, “बाहेर”, म्हणजे पतीला, किंवा यजमानाला. (पुढें क्रियाविशेषणें ह्या प्रकरणांत “तिकडे,” हा शब्द पहा).   

२८) घरांत समजणें – घरांतल्या घरांत समजूत पाडून घेणें; आपला तंटा चवाट्यावर न आणणें.    

२९) घरावर काठ्या, घालणें, किं० गोवरी ठेवणें, किं० निखारा ठेवणें – एकाद्या कुटुंबाची बदनामी, किं० नाश, करणें.    

३०) घरावर कुत्रें चढविणें – घरामध्यें कलागती लावून देणें, किंवा तंटे उत्पन्न करणें. 

३१) घरावर गवत रुजणें – घर ओसाड होणें.   

३२) घरास कांटी लावणें – घर ओसाड, उध्वस्त करणें. घरास कांटी लागणें ह्म० घर ओसाड होणें.     

३३) एकाद्याच्या घरास हाड बांधणें, किंवा घरावर टाहाळा टाकणें – त्याला जातीच्या बाहेर टाकणें, त्याला वाळींत टाकणें.  मळा, शेत, वगैरे घरीं करणें घरांतील सर्व माणसांनीं स्वकष्टानें त्याची लागवड, किंवा मशागत करणें; खंडानें किंवा अर्धेलीनें न देणें.

३४) घरीं बसणें – उद्योगधंदा नसल्यामुळें, किंवा सोडून दिल्यामुळें, रिकामें असणें.      

३५) आपघर कीं बापघर – नवऱ्याचें घर किंवा बापाचें घर स्त्रीला योग्य; दुसऱ्याच्या घरीं तिनें राहणें योग्य नाहीं.   

३६) दिलें घर कीं उपजलें घर – ज्या घरीं स्त्री दिली असेल, तें, (म्हणजे स्त्रीच्या नवऱ्याचें घर), किंवा ती ज्या घरीं जन्मली असेल तें (म्हणजे तिच्या बापाचें घर), हीं दोनच घरें काय तीं स्त्रीला राहावयास योग्य होत.   

३७) खाल्ल्या घरचे वांसे मोजणें – कृतघ्न होणें.

३८) बडा घर पोकळ वांसा- दिसावयाला भपकेदार, पण असावयाला नादान.

३९) घर ना दार आणि देवळीं बिऱ्हाड – जो एकटा आहे, ज्याला बायको, मुलें वगैंरे नाहींत, अशा मनुष्यासंबंधानें हे शब्द योजतात. 

४०) घरासारखा पाहुणा होतो, पाहुण्यासारखें घर होत नाहीं – एकादा नवीन माणूस समाजांत आला, म्हणजे तो समाजाची चालरीती उचलतो, समाज त्याची चालरीती उचलीत नाहीं. 

४१) घरीं दारीं सारखाच – सर्व ठिकाणीं सारखाच वाईट. जसा स्वताच्या घरीं उपद्रवकारक, तसाच लोकांच्याही घरीं उपद्रवकारक.     

४२) घरोघरीं एकच परी, किंवा घरोघरीं मातीच्या चुली – जिकडे-तिकडे एकच प्रकार !     

४३) आपलें घर बारा कोसांवरून दिसतें – आपलीं कामेधामें वगैरे आपणास कळतात, किंवा उत्तम प्रकारें ठाऊक असतात.

४४) घर करणें – (क) बिऱ्हाड करणें. राहावयाला जागा घेऊन तींत जेवणखाण वगैरे करूं लागणें. उदा. चार महिने मी खाणावळींत जेवीत असे; आतां घर केलें आहे. (ख) एकाद्याला त्रास होईल अशा ठिकाणीं वास्तव्य करून राहणें.  उदा. कांट्यानें माझ्या टांचेंत आज सहा महिने घर केलें आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow by Email
error: Content is protected !!