“तोंड”

तोंड(क) अन्न वगैरे द्रव्यें शरीराच्या उपयोगासाठीं ग्रहण करणारें, आणि शब्दोच्चार करणारें, इंद्रिय; मुख. 
 (ख) चेहेरा.उ० गोविंदा आज तीन दिवस तापानें आजारी आहे, पण त्याच्या तोंडावर अद्यापि आजाण्याची कळा दिसूं लागली नाहीं.
 (ग) कोणत्याही वस्तूचा पुढचा भाग, किं० दर्शन. उ० ह्या घराचे तोंड उत्तरेस आहे. 
 (घ) भोंक, छिद्र, वाट, उ० बाटलीचें तोंड.उ० ह्या फोडाला सुईनें तोंड पाड.
     उ० खिंडीच्या तोंडांतच वाघ बसला होता.
  उ० ज्वालामुखीचें तोंड.
 कोणत्या तोंडानें ?तोंड  ह्म० धैर्य किं० उजागरीउ० एका व्यवहारांत पुंडरीकानें मला फसविलें. आतां दुसरा व्हवहार करा असे मला तो कोणच्या तोंडाने म्हणावयास येईल ? (म्ह० त्याला कसे धैर्य होईल ?).
 तोंड आटोपणें किं० आवरणेंभाषण बंद करणें; बोलण्याला आळा घालणें; जपून बोलणें.उ० तोंड आटोप, जास्ती बोललास तर मार खाशील !
तोंड आंबट करणेंअसंतोषाची, किं० निराशेची, मुद्रा धारण करणें.उ० तूं आणलेलें चीट रामाला आवडलें नाहीं. तो मघांपासून आंबट तोंड करून बसला आहे. दुकानदारानें हें चीट बदलून दिलें तर पहा.
तोंड आहे कीं तोबरा आहे ?किती खातोस ? किती बोलतोस ? उ० अरे, शेरभर पोहे संपविलेस ! आणि आणखीही मागत आहेस ! तोंड आहे की तोबरा आहे ? (म्ह० तुझ्या खाण्याला कांही मर्यादा आहे कीं नाहीं ?).
   उ० मघापासून एकसारखा बोलतो आहेस ! तोंड आहे कीं तोबरा आहे ?
तोंड उतरणेंतोंडावरचें तेज नाहींसें होणें. (आपला अन्याय उघडकीला आल्यामुळें, किं० आजारानें, किं० निराशेनें, किं० उपवासामुळें)उ० ह्या येवढ्याशा मुलीला एकादशी कशाला करावयाला लावतां ? ती सकाळपासून नुसत्या रताळ्याच्या चार फोडींवर आहे ! तिचें तोंड पहा अगदी उतरून गेलें आहे !
तोंड उष्टें करणेंअल्पमात्र आहार करणें.उ० मला आगगाडीवर जावयाची घाई झाली, म्हणून मी नुसतें तोंड उष्टें करून उठलों, (म्ह० फार न जैवतां उठलों).
  उ० पोटभरीचे अन्न नाहीं, मग तोंड उष्टें तरी कशाला करूं ?
तोंड करणेंनिर्लज्जपणें बोलणें; उद्धटपणानें बोलणें.उ० तूं खालीं न पाहातां चालत होतास म्हणून तें दूध सांडलें; आतां उगीच कशाला तोंड करतोस ? (म्ह० ठेवणारानें तें तेथें ठेवावयाचें नव्हतें, दूध ठेवण्याची ती जागा नव्हे, वगैरे वायफळ बोलणें कशाला बोलतोस ?)
 तोंड करून बोलणेंनिर्लज्जपणें, किं० आपला लहान दर्जा विसरून, बोलणें.उ० तुझ्या मुलानें पहिल्यानें माझ्या मुलाची खोडी काढली; आतां उगीच तोंड करून बोलूं नकोस !
तोंडाला काळोखी आणणें किं० लावणेंअपकीर्तीला कारण होणें.उ० ह्या बदमाष पोरानें माझ्या तोंडाला काळोखी लावली !
  तोंड काळें करणें निघून जाणें; पळून जाणें.  [ यांत निंदा किं० तिरस्कार गर्भित असतो ].उ० तुला जर माझ्या म्हणण्याप्रमाणें चालावयाचे असेल, तर माझ्या घरीं रहा; नाहीं तर एकदाचे तोंड काळें कर !
   (ह्या शब्दसंहतीत  “तोंड ” हा शब्द वगळला तरी चालतो).
तोंड घालणेंमध्यें बोंलणे. उ० ज्यांत त्यांत तोंड घालावयाची तुझी खोडी फार वाईट आहे.
 मध्यें तोंड घालणेंदोन माणसांचें बोलणें चाललें असतां, व त्यांच्या बोलण्याच्या विषयाशीं आपला कांहीं संबंध नसतां, त्यांच्याबरोबर बोलणें. उ० आम्ही आपले घरगुती गोष्टी बोलत आहों, तूं कशाला मध्यें तोड घालतोस ?
 तोंडसुख घेणेंयथेच्छ शिव्या देणें; खरडपट्टी काढणें. 
 तोंड चुकविणें(क) आपल्या हातून कांहीं अपराध घडला असतां कोणी आपणांस रागें भरेल या भीतीनें त्याच्यापासून दूर असणें, किं० त्याच्या नजरेस न पडणें. 
 (ख) पण एकाद्याच्या नजरेस पडलों असतां तो आपणास कांहीं कामबीम सांगेल, आणि तें आपणांस करावें लागेल, या भीतीनें त्याच्या दृष्टीस न पडणें.उ० मी रंगोपंताला भायखळ्यावर पाठविणार आहें, पण आज आठ दिवस ते तोंड चुकवीत आहे !
तोंड टाकणें(क) शिव्यांचा वर्षाव करणें; अद्वातद्वा बोलणें.उ० तुझी जिन्नस तुझ्याच पेटींत सांपडली, तू नोकर माणसांवर उगीच तोंड टाकिलेंस !
 (ख) चावायासाठीं तोंड पुढें करणें. [ घोडा वगैरे संबंधानें या शब्दसंहतीचा उपयोग होतो. ]उ० या घोड्याला तोंड टाकावयाची भारी खोडी आहे, ती घालाविली पाहिजे.
तोंड दाबणें किं० बांधणेंलांच वगैरे भरून एकाद्याचे तोंड बंद करणें. आपली वर्मेकर्मे एकाद्यानें प्रकट करूं नयेत, म्हणून त्याला पैसे देऊन गप्प करणें. 
तोंड दिसणेंनिर्भर्त्सना केलेली लोकांच्या नजरेस येणें, (पण ज्याची निर्भर्त्सना केली, त्याचे वर्तन सुधारण्याची आशा नसणें, किंवा त्याचें वर्तन लोकांच्या नजरेस न येणें).उ० मी तुला रागें भरलों म्हणजे माझें तोंड मात्र दिसेल, पण तूं आपला आहेस तसाच राहाणार !
  उ० बोलणाराचे तोंड दिसतें, करणाराची कृति मात्र कोणाला दिसत नाहीं !
तोंड देणें(क) पारा वगैरे देऊन तोंडाची आंतली त्वचा सुजवून लाळेच्या रूपानें शरीरांतून रोग नाहीसा करणें.उ० वैद्यबोवा म्हणाले, ” मी त्याला तोंड दिलें आहे,” (म्हणजे तोंड सुजाविण्याचें औषध दिलें आहे).
 (ख) सैन्याच्या अग्रभागीं राहून शत्रूवर हल्ला करणें. 
 (ग) प्रतिपक्षी होऊन राहणें; लढावयाला सिद्ध होणें.उ० मराठ्यांच्या सैन्याला तोंड देण्याची औरंगजेबाची छाती होईना !
तोंड धरणें(क) अन्नसेवन करण्याची तोंडाची शक्ति आजार वगैरेंच्या कारणानें नाहींशी होणें.उ० पांडोबाचें तोंड धरलें आहे, त्याला चमच्या चमच्यानें दूध पाजावें लागतें. [ ” धरणे’ अकर्मक ].
 (ख) बोलण्याची शक्ति नाहींशीं करणें.उ० मी शाई सांडली नाहीं असें तू मास्तराला कां नाहीं सांगितलेंस ? तुझे तोंड कोणी धरलें होतें कीं काय ? [ “धरणे ” सकर्मक ].
 (ग) एकाद्याला आपल्या कबजांत किं० तावडींत आणणें.उ० मी त्याचें तोंड धरलें आहे. तो आतां काय करणार? [ “धरणें” सकर्मक ].
तोंड धरून, किं० दाबून, बुक्यांचा मारएकाद्याला विनाकारण बडविणें आणि पुन्हा त्याला कागाळी, किं० तक्रार, करण्याचा मार्गही खुला न ठेवणें. एकाद्याला अन्यायाने वागविणें आणि तो अन्याय तो चव्हाट्यावर आणूं लागला असतां त्याला निर्लज्जपणाने शिक्षा करणें. 
तोंड धुऊन या !ही तुमची विनंति मी कदापि मान्य करणार नाहीं !टीप-पुणे शहरीं “नाकझरीवरून तोंड धुवून या,” असेही म्हणण्याची प्रघात आहे.
तोंड निपटणेआजारानें, किं० उपासामुळें, गाल खोल जाणें.उ० आज महिनाभर में मूल तापानें आजारी होतें; त्याचे तोंड पहा कसें निपटले आहे तें ! [‘निपटणे ‘ अकर्मक ].
तोंड पडणें(क) सुरवात होणें.उ० लढाईस तोंड पडलें.
 (ख) छिद्र पडणें.उ० ह्या गळवाला तुम्हीं डिवचूं नका, आपल्या आपण तोंड पडेल तेव्हां पडूं द्या.
तोंड मातीसारखें किं० शेणासारखें होणेंतोंडाची चव नाहींशी होणेंउ० तापामुळें माझे तोंड अगदीं शेणासारखें झालें आहे !
तोंड पसरणें किं० विचकणेंहीनदीनपणानें, केविलवाण्या स्वरानें, याचना करणें. 
तोंड पाघळणेंगुह्य गोष्ट बाहेर पडू देणें.उ० मारवाड्याला चुकविण्यासाठीं मी उद्यां मुकाट्यानें नाशकास जावयाचा बेत केला होता; सर्व तयारी झाली होती; पण आमच्या घरकरणीचें तोंड पाघळलें! तिनें हा बेत गोपिकाबाईंच्या कानांत सांगितला; गोपिकाबाईंनीं चंद्रिकाबाईंच्या कानांत सांगितला; असें होतां होतां त्या मारवाड्यापर्यंत ही खबर जाऊन थडकली; तेव्हां तो माझ्या घरीं येऊन रुपये मागूं लागला!
एकाद्याचें तोंड पाहाणें(क) एकाद्याच्या आश्रयाची, मदतीची, अपेक्षा करून असणें.उ० आम्हीं पडलों गरीब, म्हणून आम्हांला सावकारांचीं तोंडें पाहण्याची पाळी वारंवार येतें.
 (ख) बोलणाराचें भाषण नुसतें ऐकणें, पण त्याणें सांगितलेलें काम करावयास, किंवा केलेला बोध अनुसरावयास, प्रवृत्त न होतां स्वस्थ बसून राहणें.उ० म्हणती, “हाणा, मारा, पाडा, घ्या, काय पाहतां तोंडा ! कोंडा, प्राणव्यसनीं बाळ बुडो, कर्दमीं जसा धोंडा ! ॥ १ ॥
                                                            मोरोपंत.
आपलें तोंड पाहाणेंआपल्या शक्तीचा आजमास करणें.उ० तूं असें करीन म्हणतोस, पण आधीं आपलें तोंड पाहा!
एकाद्याच्या तोंडाकडे बघणें किं० पाहाणेंआपल्या अंगीं जो गुण नाहीं तो गुण ज्याच्या अंगीं आहे, त्याच्याकडे मत्सरानें, किंवा विषादानें, बघत बसणें.उ० मराठी भाषेस आवेश, गांभीर्य, व सरसता, या गुणांकरतां कोणत्याही अन्य भाषेच्या तोंडाकडे बघण्याची खास गरज नाहीं अशी आमची खात्री आहे.                                                                           वि. कृ. चिपळूणकर, –निबंधमाला.
   
तोंड फिरणें(क) तोंडाची चव नाहींशी होणें. अन्नद्वेष उत्पन्न होणें.उ० तापामुळें माझें तोंड फिरलें आहे, (म्ह० मला कोणताच पदार्थ तोंडांत घालावासा वाटत नाहीं).
 (ख) तोंडांतून शिव्यांचा वर्षाव होऊं लागणें.उ० जगोबा रागावला म्हणजे कोणावर त्याचें तोंड फिरेल, ह्याचा नेम नाहीं !
तोंड फिरविणें(क) शिव्यांचा वर्षाव करीत सुटणें.उ० निळोबा भारी तापट आहे; त्याला चिडवूं नका; त्याला राग आला, म्हणजे तो तुमच्यावर देखील तोंड फिरवावयाला कचरणार नाहीं !
 (ख) तोंडाची चव नाहींशी करणें. 
 (ग) रंगांचा फरक दाखविणें, (वितळत असलेल्या धातूसंबंधानें योजतात).उ० ह्या तांब्यानें अद्याप तोंड फिरविलें नाहीं; आणखी पुष्कळ आंच दिली पाहिजे.
तोंड फुटणें(क) थंडीच्या योगानें तोंडाची बाहेरची त्वचा खरखरीत होणें किंवा भेगाळणें.उ० पुण्याच्या थंडीनें माझें तोंड फुटलें आहे.
 (ख) फजीती उडणें. पत नाहींशी होणें, नाचक्की होणें. 
तोंड बंदावर राखणेंखाण्याला, किं० बोलण्याला, आळा घालणें.उ० तूं आपलें तोंड बंदावर राखिले नाहींस, तर अजीर्णानें आजारी पडशील !
तोंड बाहेर काढणें(क) राजरोसपणें समाजांत हिंडणें.उ० तुरुंगांतून सुटून आल्यावर तुकोबानें आज दोन वर्षांत एकदाही तोंड बाहेर काढलें नाहीं!
 (ख) फिरावयासाठीं, किं० कामकाजासाठीं, घराच्या बाहेर पडणें.उ० पावसाळा सुरू झाल्यापासून मीं दोन महिन्यांत तोंड बाहेर काढलें नाहीं!
तोंड भरून बोलणेंकोणाची भीड, मुरवत, संकोच, न बाळगतां बोलणें. 
तोंड भरून साखर घालणेंएकाद्यानें उत्तम प्रकारें कांहीं कामगिरी केली असतां बक्षिसदाखल तो खाईल तितकी साखर त्याला खाऊं घालणें. 
तोंड माजणें(क) पक्वान्नें खावयाची चटक लागणें.उ० पांडोबाचें तोंड आलीकडे भारी माजलें आहे!
 (ख) शिव्या देण्याची खोडी लागणें.उ० काशीनाथपंताला ती बढतीची जागा मिळाल्यापासून त्याचें तोंड भारी माजलें आहे. (म्ह० तो ज्याला त्याला शिव्या देत असतो).
तोंड येणेंतोंडाच्या आंतल्या त्वचेवर फोड येऊन ती हुळहुळी होणें.उ० आज महिनाभर माझें तोंड आलें आहे; मला तिखट अगदीं चालत नाहीं.
  उ० तुझें तोंड आलें आहे तें सीतोपलाचूर्णानें बरें होईल.
तोंड रंगविणें(क) थोबाडींत मारून एकाद्याचें तोंड लालभडक करून सोडणें.उ० असें भलभलतें मला बोललास तर ऐसें तुझें तोंड रंगवीन कीं ज्याचें नांव तें!
 (ख) विडा खाऊन ओठ तांबडेलाल करून घेणें.उ० गुडघ्यायेवढ्या पोराला असें तोंड रंगविणें शोभत नाहीं!
एकाद्या गोष्टीला तोंड लागणेंतिची सुरवात होणें.उ० समारंभास, लढाईस, तोंड लागलें.
  उ० सुदैवानें एक गोष्ट झाली आहे की तोतया तळकोंकणचा रस्ता सोडून बोरवाटाकडे वळला, त्यामुळें लढाईचें तोंड लागेल तें इकडेच लागेल.                                                                                        न. चिं. केळकर,–तोतयाचें बंड.
तोंड लावणेंसुरवात करणें; बोलावयास प्रारंभ करणें; प्यावयासाठीं एकादें पेय ओठाशीं नेणें. 
तोंड वाईट करणेंनिराशेची मुद्रा धारण करणें. 
तोंड वाईट होणें(क) तोंडावर निराशेची मुद्रा येणें. 
 (ख) तोंडाची चव नाहींशी होणें. 
तोंड वाजविणेंबोलत सुटणें; गलागला बोलणें; निरुपयोगी बोलणें; बोलण्याची मेहेनत करणें. 
तोंड वासणेंनिराशेनें, दुःखानें, तोंड उघडणें; याचना करण्यासाठीं तोंड उघडणें. 
तोंड वासून पडणेंशक्तीच्या क्षीणतेमुळें आ पसरून पडणें. सामर्थ्य, उत्साह, तेज, वगैरे नष्ट झाल्यामुळें लाचार होऊन आ पसरून पडणें.उ० जो खळ म्हणे “पृथेची सांगुनि दासीस कोंडवा सून”।
तो पडला सिंहनिहतमत्तद्विपसाच तोंड वासून ॥
                                                          मोरोपंत−गदापर्व.
तोंड हातावर धरणेंशिव्या देत सुटणें.उ० गिरिधररावानें आतांशा आपलें तोंड जसें कांहीं हातावर धरिलें आहे! (म्ह० ज्याला त्याला तो शिव्या देत असतो!)
एकाद्यावर तोंड सोडणें किंवा तोंड मोकळें सोडणेंत्याच्यावर शिव्यांचा वर्षाव करणें. त्याला शिव्या देणें, अद्वातद्वा बोलणें.उ० मालिनीबाईनें आपल्या अंगणांत केर लोटला म्हणून बोलाईनें तिच्यावर यथेच्छ तोंड सोडलें!
तोंड वेडाविणेंएकाद्याला वेडावण्यासाठीं त्याच्या पुढें तोंडें वांकडीं करणें. 
तोंड संभाळणेंजपून बोलणें; भलतेसलते शब्द न उच्चारले जावे, अशी काळजी घेणें.उ० वरिष्ठानें अन्याय केला आहे खरा, तथापि त्याच्याशीं तोंड संभाळून बोल, नाहीं तर तो तुजवर दंश धरील!
एकाद्याचें तोंड सुटणेंचराचरा, फडफडा, किं० अद्वातद्वा, बोलण्याची त्याला प्रवृत्ति होणें.उ० आज तुझें भारी तोंड सुटलें आहे रें!
तोंड सोडणें(क) आधाशासारखें खात सुटणें. 
 (ख) अद्वातद्वा बोलत सुटणें. [“तोंड मोकळें सोडणें,” असेंही म्हणतात.]उ० तूं ह्या लग्नांत एकसारखें तोंड मोकळें सोडलें आहेस; तुला दुखणें खास येणार!
तोंड हातीं धरणें(क) अद्वातद्वा बोलणें. 
 (ख) अधाशासारखें खाणें. 
तोंडचा (किं० तोंडींचा) घास देणेंवेळ पडल्यास आपण उपाशीं राहून आपलें अन्न त्याला देण्याला सिद्ध असणें; (म्हणजे त्याला अत्यंत प्रेमानें, किं० मायाळूपणानें, वागविणें).उ० तो मोठा प्रेमळ म्हातारा आहे, तो एकाद्याला तोंडचा घास देखील काढून देईल!
एकाद्याच्या तोंडचा घास काढणें किंवा हिसकावून घेणेंएकाद्याचीं चरितार्थाचीं साधनें नाहींशीं करणें.उ० मला बढती मिळावयाची संधि आली होती, पण त्या गोविंदपंतानें माझ्या तोंडचा घास काढला!
तोंडचे पाणी पळणें, किंवा तोंडावरचें पाणी पळणें (किंवा उडणें)घाबरून जाणें; भयभीत होणें.उ० तों उन्मत्त हत्ती सुटून सैरावैरा धावत आहे, हें ऐकून सर्वांच्या तोंडचे पाणी पळालें.
  उ० माझ्या मुलाची नोकरी गेली हें ऐकतांच माझ्या तोंडचें पाणी पळालें!
तोंडाचा तोफखाना सुटणेंअद्वातद्वा बोलण्याची क्रिया चालणें; शिव्यांचा वर्षाव सुरू होणें.उ० शेजारणीनें आपल्या दारांत केर लोटला असें मथूबाईनें पाहिल्याबरोबर तिच्या तोंडाचा तोफखाना सुटला!
तोंडाचा पट्टा सुटणें  चालणेंचराचरा बोलणें सुरूं होणें; शिव्यांचा वर्षाव होऊं लागणें. 
तोंडाचा पट्टा सोडणें किं० चालविणेंशिव्यांचा भडीमार सुरूं करणें.उ० गोपिकाबाईंवर तिनें चोरीचा आळ घातला, तेव्हां काय विचारतां? गोपिकाबाईनें जो तोंडाचा पट्टा सोडला तो कांहीं पुसूं नये!
तोंडाचा फटकळवडील किंवा प्रतिष्ठित माणसाची भीड न धरतां, किंवा त्याची अदबी न राखतां, जो बोलतो तो. 
तोंडाची गोष्ट नाहीं!नुसतें बोलून असलीं कामें कधीं होत नसतात.उ० वाघ मारणें हीं तोंडाची गोष्ट नव्हें!
तोंडाची वाफ दवडणेंनिरर्थक, निरुपयोगी, निष्फळ, असें भाषण करणें; जें बोलून फायदा नाहीं, जें कोणींही खरें समजणार नाहींत, असें भाषण करणें.उ० तुझ्या उपदेशाप्रमाणें जनार्दन कधीं चालावयाचा नाहीं, मग उगीच तोंडाची वाफ कां दवडतोस?
तोंडाची वाफ खरचणेंनिरर्थक, निरुपयोगी, निष्फळ, असें भाषण करणें; जें बोलून फायदा नाहीं, जें कोणींही खरें समजणार नाहींत, असें भाषण करणें.उ० तुझ्या उपदेशाप्रमाणें जनार्दन कधीं चालावयाचा नाहीं, मग उगीच तोंडाची वाफ कां खरचतोस?
तोंडाची वाफ गमावणेंनिरर्थक, निरुपयोगी, निष्फळ, असें भाषण करणें; जें बोलून फायदा नाहीं, जें कोणींही खरें समजणार नाहींत, असें भाषण करणें.उ० तुझ्या उपदेशाप्रमाणें जनार्दन कधीं चालावयाचा नाहीं, मग उगीच तोंडाची वाफ कां गमावतोस?
तोंडाची वाफ फुकट घालाविणेंनिरर्थक, निरुपयोगी, निष्फळ, असें भाषण करणें; जें बोलून फायदा नाहीं, जें कोणींही खरें समजणार नाहींत, असें भाषण करणें.उ० तुझ्या उपदेशाप्रमाणें जनार्दन कधीं चालावयाचा नाहीं, मग उगीच तोंडाची वाफ कां फुकट घालवितोस?
तोंडांत खाणेंचपराक सोसावी लागणें.उ० आतां तुझी मस्ती पुरी कर, नाहीं तर तोंडांत खाशील! [येथे “खाणे याचें कर्म “चपराक” हें अध्याहृत असतें].
तोंडांत देणें किं० भडकावणेंचपराक लगावणें. थोबाडींत मारणें. [येथे “चपराक” हें कर्म योजलें किं० अध्याहृत ठेविलें तरी चालतें]. 
तोंडांत मारून घेणेंनुकसानी होऊन बोध मिळविणें. फाजिती झाल्यावर शहाणपणा शिकणें; आपल्या हातून चुकी झाली, किं० आपण मूर्खपणा केला, असें कबूल करणें.उ० तुझें काम कमी करावें म्हणून मी हे सर ओविले, आणि तूं म्हणतेस, कीं मीं तुझी गळेसरी बिघडविली ! मी आपली तोंडांत मारून घेतें कशी ! पुन्हां म्हणून तुझ्या कामाला बोट लावावयाची नाहीं.
त्याच्या तोंडांत तिळभर राहात नाहींतो गुप्त गोष्ट पोटांत ठेवूं शकत नाहीं; गुप्त गोष्ट त्याच्या तोंडांत राहत नाहीं.उ० विनायकरावांच्या जवळ तुम्ही असल्या गोष्टी बोलत जाऊं नका. त्यांच्या तोंडांत तिळभर राहात नाहीं.
त्याच्या तोंडांत तीळ भिजत नाहींगुप्त गोष्ट त्याच्यानें गुप्त ठेववत नाहीं, (म्हणजे तो गुप्त गोष्ट फटदिशीं बोलून जातों). 
तोंडांत तोंड घालणेंप्रेम, मैत्री, दोस्ती, वगैरेच्या भावानें वागणें.उ० आलीकडे ते दोघे जण भारी तोंडांत तोंड घालीत असतात! कोणाला तरी बुडविण्याच्या त्यांच्या खटपटी चालल्या आहेत असें वाटतें !
तोंडांत बोट घालणें किं० घालून राहाणेंआश्चर्यानें चकित होऊन स्तब्ध होणें.उ० रामानें रात्रीचा दिवस करून अभ्यास केला होता, तो नापास झाला, असें ऐकून मी तोंडांत बोट घालून राहिलों !
  उ० त्यानें अर्ध्या तासांत पांच श्लोक पाठ केले, हें पाहून मी तोंडांत बोट घातलें!
तोंडांत माती पडणेंउपास काढावें लागणें; मरणें.उ० त्याच्या तोंडांत माती पडली! (म्ह० तो मेला!)
तोंडांनें पाप भरणेंलोकांचीं पातकें उच्चारणें; लोकांचे दोष तोंडानें बोलून दाखविणें. 
तोंडापरीस जबडा थोर!धन्यापेक्षां चाकराचा दिमाख जास्ती! 
तोंडापुढें!अगदीं जिव्हाग्रीं!उ० ते श्लोक अगदीं माझ्या तोंडापुढें आहेत! (म्ह० हावें तेव्हां मी ते म्हणून दाखवीन!).
  उ० तो श्लोक अगदीं माझ्या तोंडापुढें आहे, पण आतां आठवत नाहीं.
तोंडापुरता गोड किं० तोंडावर गोडखोटें प्रेम दाखविणारा.उ० काकोबा तोंडापुरता गोड आहे, पण मोठा कपटी आहे; त्याच्याशीं जपून वागावें!
तोंडाला पानें पुसणेंफसविणें [शब्दशः–पक्वानें सारीं आपण खाऊन उष्ट्या पत्रावळी दुसऱ्याच्या तोंडाला पुसणें].उ० पांडोबाच्या कामावर देखरेख करावयाला चार माणसें होतीं; पण त्यानें सर्वांच्या तोंडाला पानें पुसून आपला डाव साधला!
त्याच्या तोंडाला फाटा फुटलातो मन मानेल तें बोलूं लागला! 
तोंडावर(क) डोळ्यादेखंत! पाहतां पाहातां! भीड, मुरवत, किं० संकोच, न बाळगतां; न कचरतां; निर्लज्जपणानें, धीटाईनें.उ० मी कसचा त्याला भितों आहे? मी त्याच्या तोंडावर “तूं लुच्या आहेस” असें म्हणेन!
 (ख) पूर्णपणें पाठ, किं० मुखोद्गत.उ० बारा ज्योतिर्लिंगांचीं नांवें अगदीं माझ्या तोंडावर आहेत.
तोंडाशी तोंड देणेंबरोबरींच्या नात्यानें एकाद्याशीं बोलणें, किं० वागणें, किं० व्यवहार करणें. 
एकाद्याच्या तोंडावर थुंकणेंत्याची निर्भर्त्सना करणें किंवा छीथू करणें.उ० म्हाताऱ्या आईला तूं लोकांच्या घरीं स्वयंपाकीबाईंप्रमाणें राहण्याची वेळ आणलीस, तर लोक तुझ्या तोंडावर थुंकतील!
एकाद्याच्या तोंडावरून हात फिरविणेंयाला फसविणें. 
तोंडास तोंड देणेंआपला हलका दर्जा विसरून जाऊन एकाद्याशीं बरोबरीच्या नात्यानें बोलणें. शेफरटपणानें बोलणें. [ह्याच अर्थानें “तोंडाशीं तोंड देणें,” ह्या शब्दसंहतीचाही उपयोग करतात]. 
तोंडाला काजळी लावणेंबेआबरू करणें; नाचक्की किं० नापत करणें. [ह्याच अर्थानें “तोंडाला काळोखी आणणें, किं० लावणें,” असेंही म्हणतात].उ० सुनेनें माझ्या तोंडाला काळोखी आणली!
तोंडाला कुत्रें बांधणेंताळतंत्र सोडून बोलणें, अद्वातद्वा बोलणें; शिव्या देणें.उ० रामड्यानें तर जसें तोंडाला कुत्रेंच बांधलें आहे!
त्याच्या तोंडावरचा जार अझून वाळला नाहींअद्यापि तो लहान, बालदशेंत, आहे. त्याला अनुभव नाहीं, त्याला जगाची माहिती नाहीं. [जार म्ह० मूल जन्मल्यावर त्याच्या ओठावर आणि तोंडावर जो विकट, बुळबुळीत, साका असतो तो]. 
तोंडास खीळ घालणें(क) बोलणें बंद करणें; अगदीं न बोलण्याचा निश्चय करणें. 
 (ख) खाणें बंद करणें. ज्यास्ती न खाण्याचा निश्चय करणें. 
तोंडास येईल तें बोलणेंआपलें बोलणें योग्य आहे कीं अयोग्य आहे, शाहाण्यासारखें आहे कीं मूर्खासारखें आहे, याचा विचार न करितां बोलणें.उ० रामभाऊला चिडवूं नका, कारण तो चिडला म्हणजे तोंडास येईल तें बोलतो!
तोंडास बसणें, किं० तोंडीं बसणें, किं० तोंडाला लागणेंस्पष्ट बिनचुक, भरभर, म्हणतां येणें.उ० तो श्लोक दहा वेळां पुस्तकांत पाहून म्हण, म्हणजे तो तुझ्या तोंडाला लागेल.
  उ० कवि एकदा प्रसिद्ध झाला, म्हणजे त्याच्या ग्रंथाची चहा होऊन त्यांच्या अनेक प्रति झाल्या व हरदासांच्या वगैरे तोंडीं त्याची कविता बसली, म्हणजे त्याचें काव्य बुडविणें हें एका राजा खेरीज दुसऱ्या कोणासहीं शक्य नाही.
                          विष्णुशास्त्री चिपळूणकर,—निबंधमाला.
एकाद्याच्या तोंडास लागणें किं० तोंडीं लागणेंत्याच्याबरोबर वादविवाद करणें.उ० तूं पराचा कावळा करण्यांत पटाईत आहेस. तुझ्या तोंडाला कोणी लागावें?
तोंडासारखें बोलणेंखुशामतीपणानें बोलणें; स्तुति करण्याकरितां बोलणेंउ० मी तुमच्या तोंडासारखें बोलतों आहे, असें समजूं नका! मी खरें सांगतों, कीं तुमचें कालचें व्याख्यान अत्यंत उत्कृष्ट झालें!
तोंडीं तृण धरणेंशरण आलों असें कबूल करणें; मी आपला आज्ञांकित सेवक आहे असें म्हणणें. [“दांतीं तृण धरणें,” असाही प्रयोग करतात]. 
तोंडीं देणेंदहांच्या वतीनें मागणी, किं० विनंति, करावयास, वरिष्ठाच्या पुढें त्यांच्यापैकीं एकाला उभें करणें.उ० मला तोंडीं देऊं नका; वरिष्ठाचे पुढें मी उभा राहिलों, कीं माझे पाय लटलटा कापतात: दुसऱ्या कोणाला तरी पुढें करा.
तोंडीं येणेंअगदीं परिपक्व स्थितीस येऊन उपभोगाला योग्य होणें. 
तोंडीं लागणें(क) रोखठोक जबाब देणें.उ० तो माझ्या तोंडीं लागला; (म्ह० मला रोखठोक जबाब देऊं लागला, किं० माझ्याशीं उद्धटपणें बोलूं लागला).
 (ख) युद्धाच्या किं० मारामारीच्या आघाडीस असणें.उ० त्या मारारीच्या तोंडीं लागूं नको! दूर उभा राहून पहा! (म्ह० फार पुढें जाऊं नको).
 (ग) आवडूं लागणें.उ० त्याच्या तोंडीं आंबेमोहोराचा भात लागला त्याला आतां कमोद आवडणार नाहीं.
तोंडीं लावणें(क) विसारादाखल पैसे देणें.उ० गाडीवाला म्हणाला, “धनीसाहेब आम्हांला तोंडीं लावायला आठ बारा आणे कांहीं तरी द्या!”
 (ख) रुचि पालटविणें.उ० आज तोंडीं लावावयाला भाजीबिजी कांहीं केली नाहींस काय?
तोंडें मागितली किंमतदुकानदारानें सांगितलेली किंमत; ह्याच्या उलट, गिऱ्हाईकानें ओढाताण करून उतरविलेली किंमत.उ० लुगड्याला तुम्हीं तोंडें मागितली किंमत मीं दिली; मग मला जुन्या घडीचें लुगडें तुम्हीं कां दिलें?
एकाद्याच्या पुढें तोंडें वांकडीं करणेंत्याला वेडावणें, किंवा टिवल्याबावल्या दाखविणें. 
लहान तोंडीं मोठा घांस घेणेंआपला लहान दर्जा न ओळखता एकादी गोष्ट करणें; आपल्याच्यानें होण्याजोगें नाहीं असें काम करावयास सिद्ध होणें. आपणाला न शोभेल अशी गोष्ट बोलणें किंवा करणें! 
एकाद्याच्या तोंडाला हात लावणेंत्याचें मूर्खपणाचें भाषण बंद करणें.उ० तुझ्या तोंडाला कोणीं हात लावावा? (म्ह० तुझें हें अविचारीपणाचें बोलणें कोणाला थांबवितां येईल?)
तुझ्या तोंडांत साखर पडो!आनंददायक खबर सांगितल्याबद्दल तुझें तोंड गोड होओ! शाबास!! 
त्याच्या तोंडावरची माशी उठत नाहींतो बावळट आहे! 
तोंडघशीं पाडणेंजमिनीवर तोंड घासेल अशा रीतीनें पाडणें. [ह्या वाक्प्रचाराचा लाक्षणिक रीत्याही पुढीलप्रमाणें अर्थ होतो. एकाद्या गोष्टीच्या भरंवशावर कांहीं कृत्य करावयास उद्युक्त होणें, आणि तो भरंवसा अस्थानीं आहे, असें आढळून आल्यावर फसगत होऊन फजिती पावणें! “तोंडघशीं पाडणें,” अशा प्रयोजक भेदींही वरील दोन्ही अर्थ होतात]. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow by Email
error: Content is protected !!