वाट | Road, Way, Result, Possibility different meaning

वाट या शब्दाचे अर्थ पुढे दिल्याप्रमाणे आहेत – (क) रस्ता, मार्ग. उदा. खडकीला कोणच्या वाटेनें जावें बरें ? (ख) लाक्षणिक अर्थानें – वर्तनक्रम, पद्धति, परिपाठी. उदा. काशीनाथपंतानें अन्यायाच्या वाटेनें पैसे मिळविले. (ग) परिणाम, गति, निकाल, शेवट. उदा. मी पाटलांकडे फिर्याद दिली आहे. तिची काय वाट होते ती पहावी ! (घ) तऱ्हा, प्रकार, रीति. (ङ) बेंबीच्या खालीं पोटांत वाटीच्या आकाराचा उंचवटा असतो, तो. जड ओझें उचलल्यानें ही वाट सरून, ( म्हणजे स्थानभ्रष्ट होऊन), पोट दुखूं लागतें, किंवा अन्य तऱ्हेनें उपद्रव होतो. (च) संभव, शक्यता. उदा. आज माझ्या घराहून पत्र येण्याची वाट आहे.

१. तिघांच्या तीन वाटा करणें, किंवा चौघांच्या चार वाटा करणें – त्यांची दाणादाण, फाटाफूट, करणें; त्यांच्यांतील ऐक्याचा भंग करणें. “उदा. केला तुवां देखत भर्तृघात, क्षणें तिवाटा रचिल्या तिघांत । वामन,–भरतभाव.”

२. चार वाटा, किंवा दहा वाटा, किंवा बारा वाटा, मोकळ्या – विस्तीर्ण जगांत हिंडावयाची मोकळीक, किंवा परवानगी. उदा. माझ्या सांगण्याप्रमाणें तूं चालत नाहींस, मग माझ्या घरीं तरी कशाला राहतोस ? येथून निघून जाईनास ! तुला दहा वाटा मोकळ्या आहेत !

३. त्याला तिवाटांची माती येत नाहीं, किंवा समजत नाहीं – तो अत्यंत अडाणी आहे.

४. देखली वाट पाहणें किंवा करणें – ज्या वाटेनें कोणी आला असेल, त्याच वाटेनें त्यानें परत जाणें. तो जसा आला तसा जाणें.

५. मधल्या वाटेस येणें – इष्ट वस्तु न मिळवितां येणें, [“जाणें,” “नेणें,” किंवा “आणणें,” हींही क्रियापदें या सरणीच्या अर्थानें योजण्यांत येतात].

६. वाट करणें – (क) रस्ता करणें. उदा. सतरंजीचा कोपरा दुमडून त्या सुताराला वाट करून दे. (ख) (लाक्षाणिक अर्थानें) वर्तनक्रम ठरविणें, किंवा दाखवून देणें. व्यवस्था, मांडणी, वगैरे करणें. (ग) नाहींसा करणें. दूर करणें.

७. एकाद्याची वाट धरणें – त्याच्या गतीला प्रतिबंध करणें.

८. वाट पाहाणें – अपेक्षिणें. उत्कंठेने इच्छिणें. ” उदा. अमेरिकेंतील मोठमोठीं राज्यें बळकावून स्पेन देश धनाढ्य व बलिष्ठ झाला होता. हे लोक फार मदोन्मत्त झाले होते, व त्यांचा पाडाव केव्हां होईल, याची इतर राष्ट्रें सारखी वाट पहात राहिलीं होतीं. प्रोफेसर वै० का० राजवाडे.” उदा. तुझी आई तुझी केव्हांची वाट पहात आहे तरी ! तुला पक्का एक तास उशीर लागला !

९. वाट मारणें – रस्त्यांत लपून बसून मुशाफरांस लुटणें. – उदा. ह्या रस्त्यानें एकट्या दुकट्यानें रात्रीं प्रवास करणें फार धोक्याचें आहे. ह्या टापूंत वाट मारणारे दोन तीन बेरड आहेत !

१०. वाट लागणें – (क) दूर होणें. नष्ट होणें. (ख) विल्हेस लागणें; निकालांत निघणें. (ग) समाप्त होणें. शिल्लक न राहाणें.

११. वाट वावरणें – निरर्थक खेप घालणें; व्यर्थ हेलपाटा घालणें.

१२. वाट वाहणें – वाटेवर रहदारी असणें. मुशाफिरांनीं, किंवा प्रवाशांनीं, वाट गजबजलेली असणें. उदा. आळंदीला जातांना तुला सोबतीची कांहीं जरूर नाहीं. रात्रंदिवस ती वाट वाहत असते !

१३. वाट होणें गत होणें. ०चा शेवट होणें. – उदा. माझ्याजवळ एक सुंदर कुलूप होतें, तें आतां कोठें दिसेनासें झालें आहे. त्याची वाट काय झाली कोण जाणें ?

१४. वाटेवर येणें – योग्य पद्धतीप्रमाणें, किंवा समंजसपणानें, बोलूं, किंवा वागूं, लागणें. ताळ्यावर, योग्य मार्गावर, येणें. उदा. असा आडमुठ्यासारखा बोलूं नको. नीट वाटेवर येऊन बोल !

१५. एकाद्याच्या वाटेस जाणें – त्याची खोडी करणें, त्याला राग आणणें, किंवा त्याला चिडवणें. त्याची कुरापत काढणें. ” उदा. माझ्या वाटंस कोणी जाऊं नका; गेलां, तर एकेकाची ऐशी हड्डी नरम करीन कीं ज्याचें नांव तें ! कां दांत घेसि भंगुनि ? जाऊं माझ्या नकोच वाटेस । सौ० सरस्वतीबाई भिडे.”

१६. वाटेस लावणें – (क) हाकलून देणें, निरोप देणें. उदा. पीतांबरराव भिकाऱ्यांना फक्त आदित्यवारीं भिक्षा वाढतो, आणि इतर दिवशी जे भिकारी येतील, त्यांना “आदित्यवारीं या,” असें सांगून वाटेस लावतो. (ख) योग्य मार्गास, किंवा क्रमास, लावणें. उदा. माझ्या तिन्ही मुलांसाठीं नोकऱ्या मिळवून देऊन मीं त्यांना वाटेस लावलें.

१७. वाटेवर पडणें – अल्प श्रमानें, किंवा मुळींच श्रम न करतां, प्राप्त, किंवा साध्य, होण्याजोगें असणें. उदा. नोकऱ्या काय वाटेवर पडल्या आहेत ? त्यांच्यासाठीं किती खेटे घालावे लागतात ते तुम्हांला काय ठाऊक ?

१८. वाट लावणें – (क) आपल्या वाटेंतून काढून टाकणें. उदा. माझ्या अंगावर दोन चोर आले होते, त्यांची मी हां हां म्हणतां वाट लावली ! (ख) विल्हेवाट करणें. उदा. दहा प्रकरणांची मीं तीन तासांत वाट लाविली. (ग) खाऊन टाकणें. मोडून, तोडून, टाकणें. उदा. त्यानें एकट्यानें अच्छेर पोह्यांची वाट लावली. उदा. शारदेच्या हातीं ह्या जिनगरी बाहुल्या दिल्या, कीं ती तीन दिवसांच्या आंत त्यांची वाट लावील !

१९. एकाद्याला वाटाण्याची अक्षत लावणें – त्याची विनंति अमान्य करणें; त्याला नकारात्मक उत्तर देणें; त्याला निराश करणें. [वाटाणें गरगरीत वाटोळे असल्याकारणानें ते कपाळास लाविल्याबरोबर खालीं गळून पडावयाचेच. तेव्हां ही अक्षत लावून न लावून सारचीच ! कपाळाला ओलें कुंकू लावून त्यावर तांदूळ चिकटावतात, ह्या विधीला “अक्षत लावणें,” असें म्हणतात. “वाटाण्याच्या अक्षता लावणें” ह्याचाही “वाटण्याची अक्षत लावणें” ह्याच अर्थानें उपयोग होतो].

२०. वाटोळें होणें, (किंवा करणें) – सर्वस्वीं नाश होणें, (किंवा करणें). व्युत्पत्ति:– वाटोळें = ० शून्य, पूर्ण अभाव. नाश.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow by Email
error: Content is protected !!