“घोडा” शब्दाचे अनेक अर्थ | Different contextual meanings of word “Horse” in Marathi

घोड्यावर बसणें याचा नेमका अर्थ काय ? (Ghodyawar basne mhanje kay ?)

घोडा या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. (क) प्राणिविशेष; अश्व. उदाहरण घोडा आपला दाणा वाढवून खातो; (म्हणजे घोड्यानें चांगलें काम केलें तर यजमान आपण होऊन त्याला जास्ती दाणा खाऊं घालतो. नोकराचें काम पसंत पडलें, तर यजमान आपण होऊन त्याचा पगार वाढवितो). (ख) बुद्धिबळाच्या (Chess) खेळांतील एक मोहरें. उदाहरण घोडा आडीच घरें चालतो. (ग) बंदुकींत ठिणगी पाडण्याचें एक साधन. (घ) दोन पायांत काठी घालून मुलें खेळतांना धावतात, तेव्हां त्या काठीला “घोडा” म्हणतात. (छ) मूर्ख, अज्ञान, बिनअकली, मुलगा. (च) वस्त्रें वगैरे ठेवण्यासाठीं जी काठी बांधलेली, किंवा टांगलेली, असते ती. (छ) नदीवर (River), किंवा समुद्रावर (Sea), मनुष्य स्नानासाठीं (Bathing) गेला असतां वस्त्रें ठेवण्यासाठीं जी काठी वाळवंटांत उभी रोवतात ती. (ज) दोन पायांचा घोडा, म्हणजे (विनोदी भाषणांत) चालावयाच्या उपयोगाच्या दोन तंगड्या. उदाहरण आम्हाला घोडाबिडा कांहीं नको आमचा दोन पायांचा घोडा आम्हाला हावें तेथें वाहून नेईंल ! (झ) पाळणा टांगावयाची जी चौकट, किंवा रचनाविशेष, ती. घोडीपाळण्याचा आधार. (ञ) जिच्या टोकाला दुबेळकें आहे, अशी काठी; (पालखी, मेणा, वगैरे ठेवण्याच्या उपयोगाची). (ट) मूल रांगतांना दोन हात व दोन गुडघे जमिनीवर टेकून जी शरीराची मांडणी करतें ती. (अनुरूप क्रियापद, “करणें”). (ठ) हरदासाचा मृदंग ठेवण्याची घडवंची. (ड) नारळाचें (Coconut) साल काढण्यासाठीं जो उभा खांब पुरलेला असतो आणि ज्याच्या टोकाला सुरी बसविलेली असते, तो. (ढ) लाटेचा उंच भाग. (ण) घोडेस्वार (Horse Rider) (लाक्षणिक अर्थानें). उदाहरण दौलतरावाजवळ ह्या वेळीं पांचशें घोडा होता, (म्हणजे घोडेस्वार होते).

  1. घोडा उभा करणें किंवा थांबविणें – घाई न करणें.
  2. घोडा काढणें – घरांत बांधून ठेविलेला घोडा फिरावयासाठीं, किंवा फिरवावयासाठीं, बाहेर नेणें.
  3. घोडा हाकणें – पळून जाणें; निघून जाणें. उदाहरण तूं येथून घोडा हाक, (म्हणजे निघून जा). उदाहरण पंतोजीबावांस पाहतांच त्या पोरानें घोडा हाकला !
  4. कागदी घोडे नाचविणें – प्रत्यक्ष व्यवहारांत फायदा, लाभ, किंवा सोय, हीं कांहीं नसून नुसत्या कागदोपत्रीं मात्र डौलाच्या आणि वैभवाच्या गोष्टी लिहिणें; [घोड्यांच्या आकाराचे कागदाचे तुकडे कातरून ते दिव्यापुढें धरले, म्हणजे भिंतीवर त्यांच्या सावल्या घोड्यांच्या आकाराच्या पडतात. हा मुलांचा खेळ आहे. हे कागदी घोडे कितींही नाचविले, तरी त्यापासून फल कांहीं नाहीं. यावरून “कागदी घोडे नाचविणें,” ह्याचा वरीलप्रमाणें अर्थ होतो].
  5. एकाद्याच्या घोड्यापुढें धांवणें – त्याची कष्टाची सेवाचाकरी करणें. त्याची ओंगळ खुशामत करणें.
  6. घोड्यावर बसणें – दारू पिऊन झिंगणें.
  7. घोड्यावर बसून येणें – घाईनें येणें; आवेशानें येणें; आपली आज्ञा लोकांनीं ताबडतोब पाळावी, किंवा आपली इच्छा लोकांनीं तत्काळ पुरवावी, अशा मूर्ख इराद्यानें येणें.
  8. घोडा मैदान जवळच आहे ! – ज्याची परीक्षा करावयाची तो पदार्थ, आणि परीक्षा करावयास लागणारी सामुग्री, हीं दोन्हीं येथें आहेत ! कोरडी बढाई कशाला पाहिजे ? किंवा उगीच तर्क कशाला पाहिजेत ? [पुढें सांप्रदायिक वाक्यें ह्या प्रकरणांत पहा].
  9. सर घोड्या पाणी खोल ! किं० सर घोड्या पाणी पी ! – अरे घोड्या, मागें हट. कारण, येणें पाणी खोल आहे. अरे घोड्या, मागें सरक, आणि जेथें आहेस, तेथलेंच पाणी पी. (धोक्यांत शिरण्यापूर्वीं नीट विचार करा, असा कोणास उपदेश करावयाचा असतां ह्या वाक्याचा उपयोग करतात).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow by Email
error: Content is protected !!