Proverb and adages starting with kha | ख पासून सुरुवात होणाऱ्या म्हणी

 1. खडा टाकून ठाव पाहाणें – पाण्याची खोली ठोकळ मानानें ठरवावयाची असतां पाण्यांत खडा टाकतात; म्हणजे आवाज, बुडबुडे पाण्याच्या पृष्ठभागावरचीं वर्तुळें, वगैरेंवरून पाण्याची खोली समजते. त्याप्रमाणें एकाद्या माणसाला एकादा साधासा दिसणारा, परंतु खुबीदार, प्रश्न विचारावयाचा, किंवा सहजपणाच्या आविर्भावानें त्याच्यापुढें एकादें विधान करावयाचें, आणि त्यावर त्याचे जे उद्गार निघतात, त्यांवरून त्याच्या मनाचा कल जाणावयाचा, ह्याला “खडा टाकून ठाव पहाणें,” असें म्हणतात. [वरील वाक्यांत “ठाव” हा शब्द न घातला तरी तोच अर्थ होतो].
 2. एखाद्याला खडे, धूळ, किंवा माती, चारणें, किंवा खावयास लावणें – त्याची धूळधाण करणें, त्याला हाल अपेष्टा भोगावयाला लावणें; त्याचा सत्यानाश करणें.
 3. एकाद्याच्या नांवानें खडे फोडणें – (क) त्याला व्यर्थ दोष देणें; त्याच्या वर उगाच टपका ठेवणें. (ख) त्याला शिव्याशाप देणें.
 4. खड्यासारखा बाहेर पडणें – निरुपयोगी ठरून वगळला जाणें. खपण्याजोगा नाहीं असें स्पष्टपणें ठरणें. उदा. लांचखाऊ मंडळींतून तो खड्यासारखा बाहेर पडला. [“खड्यासारखा निवडून पडणें,” ह्याचाही वरील अर्थानें उपयोग होतो].
 5. एकाद्याची खरड किंवा खरडपट्टी काढणें – त्याची तासडपट्टी काढणें; त्याचा दोष, किंवा अपराध, दाखवून त्याची निर्भर्त्सना करणें; त्याच्यावर ताशेरा झाडणें.
 6. खरपूस ताकीद करणें – न विसरली जाईल अशी ताकीद देणें. निक्षून बजावणें, किं० सांगणें.
 7. खरपूस समाचार घेणें – यथायोग्य पारिपत्य करणें.
 8. खसखस पिकणें – खस् खस् असा आवाज करून एका, किंवा अनेक, माणसांनीं रंगेलपणानें हसत सुटणें.
 9. खळखळ करणें – एकाद्या गोष्टीविषयीं नाखुषी दाखवून ती न करण्याचा हट्ट घेणें; एकादी गोष्ट करावयाला भारी आढेवेढे घेणें. उदा० सदू एरंडेल घ्यावयाला भारी खळखळ करतो.
 10. खाऊन ढेकर देणें – दुसऱ्याच्या वस्तूचा अपहार करून ती आपलीशी करून टाकणें.
 11. खाखा सुटणें – एकसारखें खात असावें, अशी प्रवृत्ति होणें; क्षुधा अतोनात प्रदीप्त होणें; हांव सुटणें.
 12. खाजवून खरूज काढणें – बळेंच कुरापत काढून भांडण उपस्थित करणें.
 13. खातेंपोतें बरोबर असणें – आदा आणि खर्च हीं सारखींच असणें; जितका आदा तितकाच खर्च अशी स्थिति असणें; जितकें आपणांस लोकांकडून येणें, तितकेंच आपण लोकांचें देणें असणें.
 14. एकाद्याच्या डोक्यावर, किंवा माथ्यावर, खापर फोडणें – त्याच्या माथीं उगीच दोष लादणें; त्याच्यावर विनाकारण टपका ठेवणें. “एकाद्याच्या डोक्यावर खापर फुटणें,” म्हणजे त्याच्याकडे निष्कारण दोष येणें. “उदा. विजापूर व गोवळकोंडा येथील दिल्लीरखानाचीं कारस्थानें फसलीं, व दक्षिणेंत मोंगलांचें प्राबल्य उत्तरोतर कमी झालें, ह्या सर्व नुकसानीचें खापर बादशहानें दिल्लीरखानाच्या डोक्यावर फोडलें. – गो० स० सरदेसाई.”
 15. खाल्या घरचे वांसे मोजणें – कृतघ्नपणा करणें; आपल्या आश्रय, दात्याचें नुकसान झालें किंवा त्याला दारिद्र्य आलें, तर आपला काय फायदा होईल, हा विचार करीत बसणें.
 16. एकाद्याच्या पदरास खार लावणें – त्याला नुकसान सोसावें लागेल, किं० झीज सोसावी लागेल, असें करणें.
 17. खुंटी पिरगाळणें – दुसऱ्या कोणी आपल्या योजनेच्या, किं० आरंभिलेल्या कार्याच्या, विरुद्ध कांहीं खटपट केली असतां ती सफल होऊं नये, म्हणून अगोदरच आपण सावधगिरीनें तजवीज करून ठेवणें. [वीणेच्या तारा सुस्वर वाजावयासाठीं त्या तारा बेतानें ताणाव्या लागतात. हें ताणण्याचें काम खुंट्यांनीं केलें जातें; यावरून ही शब्दसंहति उत्पन्न झाली आहे].
 18. खो देणें किंवा घालणें – “खोखो,” हा मुलांचा खेळ आहे. त्यांत एक धावणारा मुलगा असतो. त्याच्या मनांत ज्याला उठवावयाचें असेल, त्याला तो “खो” असा शब्द उच्चारून उठवितो, आणि आपण त्याच्या जागीं बसतो. मग हा उठविलेला गडी धावावयास लागतो. यावरून “एकाद्याला खो देणें” म्हणजे अधिकारापासून त्याला भ्रष्ट करण्याची खटपट करणें. खो घालणें म्हणजे एकाद्याच्या सुरळीतपणें चाललेल्या कामांत विघ्न आणणें. खो येणें, मिळणें इत्यादी क्रियापदांनीं अकर्मक अर्थ होतो.
 19. खोड ठेवणें – बारीक नजरेनें पाहून दोष काढणें. उदा. त्या मुलीमध्यें खोड ठेवावयाला कांहीं जागा नाहीं. तिला तुम्ही बेलाशक सून करून घ्या.
 20. एकाद्याची खोड मोडणें किं० जिरविणें – (क) त्याच्या अपराधाबद्दल इतकी कडक शिक्षा करणें, कीं पुन्हां तसला अपराध तो करणार नाहीं. (ख) त्याची वाईट संवय घालविणें.
 21. खोदून खोदून विचारणें – एकाद्याच्याकडून कांहीं वृत्तांत, किंवा गुप्त गोष्ट, काढण्यासाठीं अनेक तऱ्हांनीं त्याला बारकाईनें आग्रहाचे किं० डावपेंचाचे प्रश्न विचारणें. “उदा. तरी पण झोंप लागण्याचे पूर्वीं राहवेना, म्हणून मला पुनः पुनः खोदून खोदून विचारलें, कीं तूं काय बोललीस तें नीट सांग. श्री० रमाबाई रानडे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow by Email
error: Content is protected !!