गोंवऱ्या मसणांत जाणें, गाढवाचा नांगर फिरविणें, गाशा गुंडाळणें, इत्यादी म्हणी

 1. गंगेंत घोडे न्हाणें – मोठें किं० कठिण कृत्य तडीस लागणें. उदा. माझ्या मुलाची परीक्षा उतरून त्याला नोकरी लागली ! एकदाचे गगेंत घोडे न्हाले ! [“गंगेंस घोडे न्हाणें,” असाही प्रयोग आहे].
 2. गचांडी देणें – अर्धचंद्र देणें. उदा. गलेलठ्ठ भिकारी नागोबाच्या दाराशीं गेल्यास तो त्यांना बेलाशक गचांडी देऊन हाकलून काढतो !
 3. गच्छंती होणें – कोणतेंही विशिष्ट काम पुढें चालूं ठेवण्याची शक्ति न उरणें. उदा. ह्या बुंदीच्या लाडवांत माझी गच्छंती झाली; आतां जिलब्या काय खाऊं?
 4. एकाद्याची गच्छंती करणें – त्याचा नाश करणें.
 5. गच्छंती करणें – सुळुकदिशी निघून जाणें; नजर चुकवून पळून जाणें.
 6. गट किंवा गट्ट करणें – खाऊन टाकणें; गिळून टाकणें. उदा. त्या माकडानें हां हां म्हणतां अच्छेर दाणे गट्ट केले ! [गिळतांना जों आवाज होतो, त्याचा अनुकरणवाचक शब्द ‘गट्’ हा आहे].
 7. गडप करणें – नाहींसा करणें; लपविणें; खाऊन टाकणें.
 8. एकाद्याला गंडा बांधणें – त्याला शिष्य करणें; त्याला आपल्या मंडळींत अंतर्भूत करून घेणें.
 9. एकाद्याला गंडा घालणे – त्याला फसविणें. उदा. ह्या दुकानदारानें मला तीन आण्याला गंडा घातला !
 10. एकाद्याची गडी फू करणें – त्याची मैत्री, किं० सहवास, सोडून देणें. [एका मुलाचें दुसऱ्याशीं भांडण झालें, म्हणजे तो त्याला “तूझी गडी फू !” असें म्हणून त्याच्याशीं तिऱ्हाईतपणाच्या नात्यानें, किं० शत्रुत्वानें, वागूं लागतो. मोठ्या माणसांच्या संबंधानें ही संब्दसंहति विनोदानें योजण्यांत येते. “गडी” याचेबद्दल “गट्टी” असाही शब्द योजला जातो].
 11. गणेशटोपी घालणें – मुलें खेळतांना एकाच्या डोक्यावर चिरगुट टाकून त्याला कांहीं दिसणार नाहीं असें करतात, आणि मग धोतराचा तोबा त्याच्या पाठीवर मारतात. तोबा कोणी मारला, हें त्या अंध केलेल्या मुलानें ओळखलें, म्हणजे त्याच्यावरचें चोरपण जातें. चिरगूट बांधून एकाद्याला अंध करणें, याला “गणेशटोपी घालणें” म्हणतात. ह्यावरून “एकाद्याला गणेशटोपी घालणें,” म्हणजे त्याला फसविणें. [“एकाद्याला टोपी घालणें” असाही वरील अर्थानें प्रयोग होतो].
 12. गंध नसणें – अल्प प्रमाणांत देखील नसणें. उदा. वासुदेवाला ज्योतिषाचा गंधही नाहीं. दुसरे उदा. माझ्या मनांत लबाडीचा गंधही नाहीं. [गंध म्हणजे वास].
 13. गप्पा, किंवा गफ्फा, छाटणें, मारणें, ठोकणें, तासणें, किंवा झोकणें – इकडच्या तिकडच्या गोष्टी करीत बसणें. उदा. तू आणि रामा असे दोघे जण अभ्यासाला म्हणून बसतां, पण तुम्ही खरोखरीं अभ्यास करतां, कीं गप्पा छाटीत बसतां ?
 14. गमजा करणें – वेडे वेडे चाळे करणें; उच्छृंखलपणानें वागणें. “उदा. गमजा करितां, मनिं उमजांना, हें सुख न पुढें पडेल वजा । – रामजोशी.”
 15. एकाद्याच्या गमजा न चालूं देणें – त्याच्या चेष्टांना, वात्रटपणाला, किंवा त्रासदायक कृत्यांना, मोकळीक, किंवा अवसर, न देणें; त्याच्या उद्दामपणाला प्रतिबंध करणें.
 16. गयावया करणें – दीनपणानें क्षमा भाकणें. उदा. त्या गड्याला गूळ चोरतांना मीं प्रत्यक्ष पाहिलें. मी त्याला पोलिसाच्या हवालीं करणार होतों. पण तो फारच गयावया करूं लागला, म्हणून त्याला मीं सोडून दिलें.
 17. गर्भगळित होणें – अत्यंत भीतिग्रस्त होणें. [भयानें गर्भिणी स्त्रियांचा गर्भ गळून पडतो, यावरून हा अर्थ झाला. हा शब्द “गलितगर्भ” ह्या संस्कृत शुद्ध बहुव्रीहि समासाचें परिवृत्त अपभ्रष्ट रूप नव्हे. तें मराठीच गर्भ गळीत होणें, ह्याचें रूप असून गळीत हा शब्द गर्भ ह्याला चिकटून लिहिण्याचा परिपाठ रूढ झाला आहे. उदा. रानांत वाघ पाहतांच मी गर्भगळित झालों !
 18. एकाद्याच्या गोंवऱ्या मसणांत जाणें – त्याच्या आयुष्याची मर्यादा अगदीं थोडी राहिलेली असणें; त्याचा मृत्युकाळ अगदीं जवळ येऊन ठेपलेला असणें. उदा. तुझ्या गोंवऱ्या मसणांत गेल्या आहेत. आतां तूं मोठे मोठे बेत कशाला करतोस ?
 19. गळ टाकून पाहाणें – आजमास काढण्यासाठीं कांहीं खुबीदार, प्रश्न विचारणें, मोहजाळ पसरणें, संभाषणाचा ओघ विशिष्ट दिशेनें वळविणें, इत्यादि.
 20. गळ घालणें- आग्रह करणें. उदा. “माझी मुलगी तुम्ही आपल्या रामाला करून घ्या,” म्हणून गोपिकाबाईंनीं मला भारी गळ घातली; पण ती मुलगी दमेकरीण, म्हणून मीं ती पथकरली नाहीं. “उदा. तुम्ही आपलें मत मलाच द्या, अशी नरसिंगरावांनीं मला भारी गळ घातली.
  टीप:–मुलगी गळीं लागली आहे, तुम्ही आपलें मत मला द्या म्हणून नरसिंगराव माझ्या गळीं पडले, हे वाक्प्रचार गळा, (म्ह० कंठ), ह्यापासून झालेले आहेत, हें विद्यार्थ्यानें लक्ष्यांत बाळगावें.”
 21. गांठ पडणें – भेट होणें.
 22. गाडी सुटणें – पाठ म्हणण्याची, किंवा बोलण्याची, क्रिया वेगानें होऊं लागणें. (आगगाडीचें रूपक येथें गर्भित आहे).
 23. गाढवाचा नांगर फिरविणें – जमीनदोस्त करणें. [पूर्वींच्या काळीं गुन्हेगाराला शिक्षा करण्याचा एक प्रकार असा असे, कीं त्याला त्याच्या घरांतून हाकलून काढून, तें घर पाडून आणि खणून टाकून, त्या जमीनीवरून गाढव जुंपलेला नांगर फिरवून शेतजमीनीसारखी ती जमीन करीत. अशी शिक्षा फार मोठ्या गुन्ह्याला दिली जात असे].
 24. एकाद्याच्या गादीला पाय लावणें – त्याचा अपमान करणें. [गुरूची गादीं आपल्यांत पूज्य मानिली जाते. तिला पाय लावणें, किंवा तिच्यावर बसणें, हें पातक होय].
 25. गांवाला जाणें – जवळ नसणें; दूर गेलेला असणें; ह्यावरून “माझें हात कांहीं गांवाला गेले नाहींत !” म्हणजे रट्टा चढविण्याची वेळ आली, तर माझे हात रट्टा चढविल्याशिवाय स्वस्थ राहणार नाहींत, रट्टा चढवितीलच ! “उदा. काय म्हणे, थोबाडींत मारीन ! मार पाहूं कशी थोबाडींत मारतोस ती ! माझे हात कांहीं गांवाला गेले नाहींत ! अशाच अर्थानें “तरवार गांवाला जाणें,” ह्याचा पुढील आर्येंत उपयोग केला आहे. खचशील कौवरा ! तूं, कीं बहु चढला तुझा मद सिगेला । लंघावया पहासी; गांवाला काय रे ! मदसि गेला ? ॥ मोरो०–उ०–अ० १३. [“माझे हात कांहीं केळीं खावयाला गेले नाहींत !” ह्याचाही अर्थ “हात गांवाला गेले नाहींत,” ह्याप्रमाणेंच समजावा].”
 26. त्या गांवचा नसणें – ह्या कामाशीं आपला कांहीं संबंध नाहीं, असें दाखविणें. उदा. गोंद्या मोठा बिलंदर आहे. तो कांहीं तरी खोड्या करतो, आणि मग साळसूदपणा दाखवितो. जसा कांहीं तो त्या गांवचाच नव्हे !
 27. एकाद्याच्या गांवीं नसणें – (क) त्याच्या खिजगणतींत नसणें, (ख) त्याच्या ध्यानीं मनींही नसणें. उदा. मी त्याला इतका वेळ बोध केला, पण तो त्याच्या गांवींही नाहीं ! (म्हणजे त्यानें तिकडे अगदीं दुर्लक्ष्य केलें, आणि तो त्या बोधाच्या उलट वर्तन करीत आहे).
 28. गाशा गुंडाळणें – एकाद्या ठिकाणाहून निघून जाण्याच्या उद्देशानें आपल्या जिनसांपानसांची आवराआवर करणें, किंवा ती करून निघून जाणें. उदा. भटजीबोवांनीं आमच्यापुढें बरेंच लांबलचक रडगाणें चालविलें होतें; पण आमच्या येथें त्यांना थारा मिळणार नाहीं, असा त्यांना रंग दिसतांच त्यांनीं गाशा गुंडाळला!
 29. गाळण उडणें किंवा होणें – घाबरगुंडी वळणें. धैर्य गळून जाणें. उदा. हातांत कुऱ्हाडी घेतलेले तीन चोर पाहतांच सकवारबाईची गाळण उडाली ! दुसरे उदा. एकामागून एक अशा अनेक अडचणी आल्या, तेव्हां माझी गाळण उडाली, (म्हणजे माझा सारा धीर गळून गेला).
 30. एकाद्याला गुंगारा देणें – त्याला फसवून, किंवा त्याची नजर चुकवून, पळून जाणें. उदा. मी घनश्यामाला हें पत्र टपालांत टाकावयाला देणार आहें म्हणून त्याला जरा वेळ थांबावयाला सांगितलें होतें. पण तो मला गुंगारा देऊन गेला ! (म्हणजे माझी नजर चुकवून निघून गेला !)
 31. गुण उधळणें किंवा पाघळणें – दुर्गुण प्रकट करणें. उदा. केशव आतां सुधारला असेल, अशा समजुतीवर मीं त्याला मामलतदार कचेरींत नोकरी लावून दिली. पण एका महिन्याच्या आंत त्यानें गुण उधळले ! तेव्हां त्याला शिरस्तेदारांनीं राजीनामा देऊन निघून जावयास लाविलें !
 32. एकादी वस्तु गुलदस्तांत ठेवणें – “ती अगदीं लपवून ठेवणें; तिचा सुगावा, किंवा मागमूस, कोणाला लागूं न देणें. वाटोळ्या गंजिफांचा डाव खेळतांना तिघां खेळणारांपैकीं ज्याला मागल्या डावांत कांहीं पानें देणें झालें असेल, तो पुढच्या डावाच्या वाटणीच्या वेळीं तितकीं पानें न बघतां, आणि येतील त्या क्रमानें जशीच्या तशींच दस्तांच्या रूपानें जमीनीवर पालथी ठेवीत जातो. ह्या पालथ्या ठेवलेल्या पानांना “गुलदस्त” असें म्हणतात. गुलदस्तांत कांहीं विशेष उपयोगाचीं पानें आपणाला मिळतील असा त्याचा समज असतो. गुल म्ह० फूल, उत्कृष्ट वस्तु. दस्त म्ह० हात. गुलदस्त म्ह० मूल्यवान् आणि गुप्त वस्तूंचा हातानें केलला संचय. एकादी वस्तु गुलदस्तांत ठेवणें म्ह० ती मूल्यवान् म्हणून ती योग्य समय येईपर्यंत गुप्त ठेवून आयत्या वेळीं बाहेर काढणें.”
 33. गुळ खोबरें देणें – लहान मुलांना गुळ खोबऱ्याची लालूच दाखविली, म्हणजे तीं आपल्याला वळतात, किंवा आपलें काम करावयाला सिद्ध होतात. यावरून “एकाद्याला गुळ खोबरें देणें,” म्ह० त्याला आपल्या कामासाठीं लांच देणें, फसविणें, असे अर्थ झाले. गुळ खोबऱ्यावरील मुलांची भक्ति पुढील आर्येंत वर्णिंली आहे. “गुळखोबरें विलोकुनि भलत्याहि जनास बाळक वळावा । सत्य प्रेमचि दावुनि सुज्ञें तो विश्वपाळ कवळावा ॥ मोरोपंत,–भारत, उद्योगपर्व.”
 34. एकाद्याचे पुढें गोंडा घोळणें – त्याची खुशामत करणें; त्यांची थुंकी झेलावयाला तत्पर राहणें.
 35. एकाद्याला गोत्यांत आणणें, घालणें, किंवा टाकणें – त्याला संकटांत, पेचांत, घालणें किंवा लोटणें.
 36. एकद्याला दहा रुपयांच्या गोत्यांत आणणें – दहा रुपये खर्चावयाची त्याचेवर पाळी आणणें; त्याची दहा रुपयांची नुकसांनी करणें.
 37. गोंधळ घालणें – १. गोंधळ म्हणजे एक प्रकारचें कीर्तन, लग्न, मुंज, वगैरे कांहीं मंगल कार्य समाप्त झाल्यावर गोंधळ्यांकडून देवीच्या नांवानें गोंधळ घालविण्याचा कित्येक कुटुंबांत रिवाज आहे. हा गोंधळ हरदासांच्या कीर्तनाप्रमाणें असतो. हरदास जसें कीर्तनांत एकादें आख्यान लावून त्याचें स्पष्टीकरण करतात, त्याप्रमाणें गोंधळांत गोंधळी एकादें आख्यान सांगतात; [अनुरूप क्रियापद “घालणे”]. ह्या कीर्तनाच्या प्रसंगीं फारशीं टापटीप आणि व्यवस्था नसते ह्यावरून “गोंधळ” ह्या शब्दाचे पुढें दिलेले आणखी अर्थ निघून रूढ झाले. २. अव्यवस्था, घोटाळा, गडबड, अंदाधुंदी. [ह्या अर्थानें अनुरूप क्रियापदें मांडणें, करणें, माजविणें, उडविणें इत्यादी; होणें, माजणें, उडणें, इत्यादी]. ३. मनाचा संभ्रातपणा; काय करावें हें न सुचणें; भ्रांतिष्टपणा. [अनुरूप क्रियापद होणें. उडणें, इत्यादी].
 38. गोळा होणें – (क) एकत्र जुळणें; गर्दी करणें. “उदा. चिंताज्वरांत माझा रात्रीं नाहींच लागला डोळा । जायासाठीं कंठीं शतवार प्राण जाहले गोळा ॥, – मोरोपंत.” (ख) गात्रें शक्तिहीन, निरुत्साह, होऊन चलनवलनादि व्यापारास असमर्थ होणें. उदा. झोपेनें ह्या मुलाचा गोळा होऊन गेला आहे !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *