कंठ. | (क) गळा; छातीच्या वरचा आणि हनुवटीच्या खालचा भाग; डोकें आणि धड यांना जोडणारा शरीराचा भाग | उ० सर्वांगीं सुंदर उटि शेंदुराची । कंठीं झळके माळ मुक्ताफळांची ॥ रामदास. |
(ख) घसा. | उ० दुःखामुळें त्याच्या कंठांतून शब्द निघेना. | |
(ग) आवाजी (गायनांत); उच्चाराचा प्रकार, | उ० त्या स्त्रीचा कंठ मधुर आहे. | |
(घ) प्रौढ, खणखणीत उच्चार. | उ० त्या मुलाचा कंठ नुकताच फुटला. (म्हणजे त्याचा पोरकट किं० कोंवळा आवाज जाऊन आतां त्याला भारदस्त आवाज आला आहे.) | |
(ङ) राघूच्या किं० खबूतराच्या गळ्यावरील परांचे वर्तुल. ह्या पक्ष्यांचा आवाज स्फुट, किं० मधुरतर झाला, म्हणजे हें वर्तुल काळ्या रंगाचें असतें. | ||
कंठ दाटणें किं० दाटून येणें; किं० सद्गदित होणें | प्रेमातिशयामुळें घसा भरून येणें. असें झालें असतां शब्दोच्चार, किंवा स्पष्ट शब्दोच्चार, होऊं शकत नाहीं. | |
कंठ फुटणें | (क) शब्दोच्चार प्रौढ, किं० खणखणीत होणें. | |
(ख) घशांतून पिंजका आवाज निघूं लागणें. | उ० फार उंच स्वरांत गाऊं नको; कंठ फुटला तर अगदीं रंगाचा भंग होऊन जाईल. | |
कंठीं प्राण उरणें | आसन्नमरण होणें. | उ० मला वाटतें जनार्दनपंतांच्या कंठीं प्राण उरला आहे ! आतां त्याला मात्राबित्रा देऊन कांहीं उपयोग होईल असें दिसत नाहीं ! |
कंठीं प्राण धरणें | एखादी इच्छा, किंवा आशा, सफळ झाल्यावर मरावें अशा इराद्यानें जीव धरून राहणें. | उ० मरावयाचे आधीं मुलाची भेट व्हावी, अशी त्या म्हाताऱ्याची फार इच्छा होती. तो येऊन भेटे तोपर्यंत म्हाताऱ्याने कंठीं प्राण धरून ठेवला होता; मुलगा भेटल्याबरोबर त्यानें प्राण सोडला! |
कंठीं प्राण येणें | भयानें घाबरगुंडीं वळणें; तीव्र दुःखानें किं० भुकेनें व्याकुळ होणें. | उ० मी रानांतून फिरत असतां त्या पिंपळापाशी जातों तों त्याच्या बुंधाशीं वाघ बसलेला मीं पाहिला; तेव्हां माझ्या कंठीं प्राण आले. |
उ० तुझें मूल केव्हांचें रडत आहे तरी ? दुधावांचून त्याचे प्राण कंठीं आले आहेत ! त्याला एकदम प्यायाला घे. | ||
कंठ मोकळा करून रडणें | ओकसाबोकशी रडणें. | उ० मोकळा करूनि कंठ तेधवा । आठवूनि मनिं जानकीधवा । ते रडे, भरतही तसा रडे । जोंवरी नयन होति कोरडे ॥ वामन-भरतभाव |