अवदसा आठवणें – निकृष्ट स्थिति, दारिद्र्य, अवनति, किंवा दुःख, प्राप्त होईल, असें वर्तन करण्याची प्रवृत्ति, किंवा इच्छा होणें. उदा. तूं मुळीं देखील अभ्यास करीत नाहींस ! तुला अवदसा आठवली आहे !
अवाक्षर न बोलणें किंवा काढणें – अक्षरसुद्धां तोंडावाटें न काढणें. उदा. तुला मी चतुःशृंगीला नेईन, म्हणून एकदा सांगितलें; आतां त्यासंबंधानें अवाक्षर बोलूं नको !
अव्यापारेषु व्यापार करणें – नसतां उद्योग करणें; ज्या उद्योगापासून स्वतःस फायदा होण्यासारखा नाहीं, वेळेनुसार नुकसान होण्याचा संभव आहे, असा उद्योग करणें.
अळंटळं करणें – आपणास जें करावयाचें काम असेल, त्यांत चुकवाचुकव, किंवा आळस करणें; तें लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न करणें; तें मन लावून न करणें.
अक्षत देणें – लग्न, मुंज, वगैरेंच्या समारंभास ज्यांना बोलवायाचें असेल, त्यांच्या घरीं जाऊन त्यांना कुंकवानें तांबडे केलेले तांदूळ देऊन आमंत्रण करतात. ह्या तांदुळांना “अक्षता” म्हणतात, व ह्या प्रकाराला “अक्षत देणें,” असें म्हणतात. “अक्षत” हें “अक्षता,” ह्याचें मराठी रूप.
अक्षता पडणें – विवाहांचे वेळीं वधू व वर ह्यांच्या मस्तकांवर “शुभमंगल सावधान !” असे शब्द उपाध्यायांना उच्चारले, म्हणजे अक्षता टाकतात. ह्यावरून “त्याच्या, किंवा तिच्या, डोक्यावर अक्षता पडल्या,’ म्हणजे “त्याचें, किंवा तिचें, लग्न झालें” असा अर्थ.
आ करणें –(क) तोंड उघडणें. तोंड वासणें. “किंवा तूं जेचिं देवकीला भेटसि तैसाच भेट आतेला आम्हांहुनि तूंचि अधिक्य, धृत सोडुनि कोण शिष्टाई.” (ख) एकाद्या वस्तूचा स्वीकार करावया.
त्याला आकाश पाताळ एक झालें आहे – तो गर्वानें अतिशय फुगून गेला आहे.
आकाश पाताळ एक होणें – अतिजोराचा पाऊस पडत असणें. [पाऊस जोरानें पडत असला, म्हणजे पृथ्वीचा पृष्ठभाग त्याचे वरील घरें झाडें वगैरे दिसत नाहीतशीं होऊन जिकडे तिकडे आभाळच असल्याप्रमाणें देखावा दिसतो].
आकाश पातळ एक करणें –(क) क्षोभ किंवा कल्लोळ करणें; खूप जोरानें आणि मोठ्यामोठ्याने ओरडून एकाद्याला रागें भरणें. (ख) भुकेमुळें अतोनात रडणे (मुलासंबंधानें).
आकाशाला घेरा घालणें – प्रचंड पराक्रम, किंवा अवाढव्य काम, करणें; अशक्य म्हणून समजलेलें काम करणें. किंवा हें काम तूं पार पाडलेस, तर तूं आकाशाला घेरा घातलास, असें आम्हीं समजूं!
आभाळाला, किंवा आकाशाला, गवसणीं घालणें – अशक्य गोष्ट, किंवा आपल्या शक्तीच्या बाहेरची गोष्ट, करावयाला उद्युक्त होणें.
आस्मान, किंवा आकाश, ठेंगणें होणें – गर्वानें फार फुगून जाणें, गर्वानें आकाशापेक्षांही जणों जास्ती उंच होणें.
आखाड्यांत उतरणें – पहिलवान लोकांची कुस्ती खेळावयाची जी जागा त्याला “आखाडा” असें म्हणतात. यावरून “आखाड्यांत उतरून कुस्ती खेळावयास, दोन हात करावयास, किंवा वाद विवाद करण्यास तयार होणें, असा अर्थ होतो.
आग लावणे, किंवा आग लावून देणें – (क) पेटविणें. (ख) दोन माणसांत कलह उपस्थित करणें; त्यांच्यांत कलागत लावणें. उदा. चोरट्यांनीं तो गांव लुटला, आणि मग त्याला आग लावून दिलीं.
आगींत तेल ओतणें – भांडण, किंवा राग, जास्ती विकोपास जाईल, असें करणें.
आडवें होणें – झोंप घेण्याच्या उद्देशानें आंथरुणावर पडणें. उदा. दुपारचें जेवण झाल्यावर मी जरा आडवा होईन, आणि नंतर तुझें काम हातीं घेईन.
आडून गोळी मारणें – लढाईचे वेळीं शिपाई लोक झाडें, टेकड्या, धोंडे, मातीचीं डिखळें, वगैरेंच्या आड लपून शत्रूच्या सैन्यावर बंदुका झाडतात; त्याप्रमाणें समाजांत कांहीं दुष्ट लोक स्वतां पुढाकार न घेतां, दुसऱ्याला पुढें करून एकाद्याचें नुकसान करतात. त्यांच्या ह्या करणीला “आडून गोळी मारणें,” असें म्हणतात.
आपण मेल्यावांचून स्वर्ग दिसत नाहीं – आपण अंगानें कष्ट सोसल्याशिवाय सुखस्थिति प्राप्त होत नाहीं. आपण स्वतां अंगमेहनत केल्याशिवाय काम मनाप्रमाणें होत नाहीं. दुसऱ्यावर विश्वास टाकल्यास काम होतेंच, असें नाहीं.
एकाद्यावर आभाळ कोसळणें – त्याला पराकाष्टेची विपत्ति प्राप्त होणें; त्याच्यावर फार मोठा अनर्थ गुदरणें.
आभाळ फाटणें, किंवा कोसळणें – फार मोठा अनर्थ ओढवणें. उदा. बाई, रडूं नका ! झाल्या गोष्टीला इलाज नाहीं ! आभाळ फाटलें त्याला ठिगळ कोण देणार ! [फार पाऊस पडूं लागल्यास ‘आज काय आभाळच फाटलें आहे कीं काय कोण जाणे,’ असेंही म्हणतात].