“शिर” या शब्दांचे अनेक अर्थ आहेत. ते अर्थ पुढे दिले आहेत. (क) डोकें. (ख) कोणत्याही वस्तूचा माथा. उदा. झाडाचें, डोंगराचें, घराचें, वगैरे शिर. (ग) सैन्याची आघाडी. (घ) (घोड्यांची गणति करतांना) व्यक्ति. उदा. घोडा शिर चार; (म्हणजे चार घोडे).
- शिर सुरी तुझ्या हातीं – माझें डोकें तुझ्या ताब्यांत आहे, आणि सुरीही तुझ्याजवळ आहे; आतां मला मारणें, किंवा न मारणें, हें तुझ्या इच्छेवर अवलंबून आहे; मी सर्वथैव तुझ्या तावडींत सांपडलों आहे, मला तारणें, किंवा मारणें हें तुझ्यावर आहे. मीं अपराध केला आहे खरा, आतां क्षमा करणें, किंवा पारिपत्य करणें, तुझ्याकडे आहे.
- शिर हातावर घेणें – धाडसाचें काम करावयास सिद्ध होणें; भीति सोडून देणें. उदा. बाजीरावाबरोबर पांचशें घोडेस्वार शिर हातावर घेऊन पुढें सरसावले ! शिवाजीला स्वराज्यस्थापनेच्या कार्यांत साहाय्य करावयाला तानाजी, एसाजी, बाजी, वगैरे शेकडों मराठे वीर हातावर शिर घेऊन सदा सिद्ध असत.
- शिरातोरा असणें, शिरातुरा असणें – एकाद्यापेक्षां अधिक समर्थ, चतुर, किंवा कर्तबगार, असणें. उदा. रामू चित्रकलेमध्यें माझा शिरातोरा आहे.
- शिरांतोरा किंवा शिरांतुरा, लावणें, किंवा दाखविणें, किंवा मिरविणें – आपलें वर्चस्व दाखविणें, किंवा गाजविणें. उदा. रामभाऊला पाटिलकी मिळाल्यापासून तो भारी शिरांतोरा दाखवूं लागला आहे !
- एकाद्याच्या शिरीं, किंवा शिरावर, असणें – त्याचा रक्षक किंवा त्राता, ह्या नात्यानें त्याच्याजवळ असणें. उदा.आपण शिरीं असतां आम्हांल्या कोणाची भीति?
- शिरावर जागें राहणें किंवा असणें – एकाद्याच्या संरक्षणासाठीं, किंवा कल्याणासाठीं, तत्पर असणें. “उदा. श्रीरामा ! तूं स्वामी अससी माझ्या शिरावरी जागा । आम्हांसि तुझ्या पायांवांचुनि निर्भय नसे दुजी जागा ॥ मोरोपंत, आर्या केकावलि.”