“हात पाय” | Hand and foot

“हात पाय” या दोन शब्दापासुन सुरु होणारे वाक्य व त्यांचे अर्थ पुढे दिल आहेत.

 1. हात पाय गळणें – (क) खचून जाणें, नाउमेद होणें, धीर सोडणें. उदा. अरे, तूं एकदाच नापास झालास आणि तुझे हात पाय गळाले ? आश्चर्य आहे ! उमेद बाळग. यंदा नाहीं तर पुढच्या वर्षीं पास होशील ! (ख) अशक्त होणें. आज पांच सहा महिने पांडोबा मलेरियानें आजारी आहे. त्याचे हात पाय अगदीं गळून गेले आहेत. एकाद्यावर हात पाय चोळणें त्याचेवर रागानें चरफडणें.
 2. हात पाय पसरणें – (क) एकाद्या कामांत आळस करणें. (ख) एकादें काम आपल्या हातून होत नाहीं असें म्हणणें. सबबी सांगणें. (ग) ठरलेल्या मर्यादेच्या, किंवा पल्ल्याच्या, बाहेर जाणें; विस्तार पावणें. (घ) मरणाच्या वेळीं हात पाय ताणणें.
 3. हात पाय पांघरून, किंवा पोटाळून, बसणें – आळशासारखें बसणें.
 4. हातीं पायीं अन्न येणें – खाल्लेलें अन्न जडसें वाटणें. उदा. आजचें जिलबीचें जेवण माझ्या हातीं पायीं आलें आहे !
 5. हात पाय फुटणें – (क) थंडीमुळें हाता पायांना भेगा, चिरा, पडणें. (ख) लबाड्यांत, लुच्चेगिऱ्यांत, तरबेज होणें. उदा. आलीकडे आमच्या नोकराला हात पाय फुटले आहेत ! (ग) खर्चलें जाणें, उधळपट्टी सुरूं होणें. उदा. त्या दौलतीला आलीकडे हात पाय फुटूं लागले आहेत !
 6. हात पाय मोकळे करणें, (किंवा होणें) – चालून, किंवा फेरफटका करून, हात पाय सैल, किंवा साफ, किंवा हलके करणें, (किंवा होणें). उदा. दुपारचें जेवण झाल्यापासून तों आतांपर्यंत मी मांडी घालून जमाखर्च लिहितों आहें. आतां देवदर्शनास जातों, म्हणजे जरासे हात पाय मोकळे होतील.
 7. एकाद्याचे हात पाय मोडणें – (क) त्याला बलहीन, किंवा सामर्थ्यहीन, करून टाकणें; निःसत्त्व करणें; त्याला हरकत करणें. (ख) ताप यावयाच्या अगोदरचा अशक्तपणा, (किंवा निरंगळी), येणें. याच अर्थानें “हात पाय मोडून येणें,” किंवा “अंग मोडून येणें,” याचाही उपयोग होतो.
 8. हात पाय सोडणें – मरणकाळच्या यातनांमुळें हात पाय ताणणें, किंवा ताठ करणें.
 9. हात पाय गाळणें – (क) निराश, नाउमेद होणें. (ख) अशक्त होणें, रोड होणें.
 10. हात पाय गुंडाळणें – (क) अंतकाळच्या वेदनेमुळें हातपाय आखडणें. उदा. त्यानें आपले हात पाय गुंडाळले. उदा. त्याचे हातपाय गुंडाळण्यात आले आहेत. (ख) हरकत करणें; अडथळा करणें. उदा. मी त्याचे हात पाय अगदीं गुंडाळून टाकिले आहेत, त्याला आतां कांहीं देखील उपद्रव करतां येणार नाहीं !
 11. हात पाय चोळणें – सूढ घेण्याची प्रतिज्ञा करणें. उदा. रामभाऊंच्यावर हात पाय चोळून तो म्हणाला, इ०
 12. हात पाय झाडणें – (क) अंतकाळच्या वेदनांमुळें हात पाय इतस्ततः हासडणें. (ख) बचावासाठीं, सुटकेसाठीं, हातां पायांचा उपयोग करणें.
 13. हात पाय ताणणें – आरामानें, सुखानें, किंवा कांहीं काळजी नसल्यामुळें, हात पाय पसरून पडणें.
 14. हात पाय आखडणें –अंतकाळच्या वेदनांमुळें, किंवा संतापानें, हात पाय इतस्ततः हासडणें.
 15. हात पाय हालविणें – उद्योग, प्रयत्न, परिश्रम, मेहनत, खटपट, करणे. उदा. लोक तुझ्याबद्दल किती त्रास सोसतील ? तूं स्वतः कांहीं तरी हात पाय हालविशील कीं नाहीं ?
 16. हाता पायांचा चौरंग होणें – पेटके वगैरेंच्या योगानें हात पाय आखडणें.
 17. हाता पायांच्या फुंकण्या होणें- आजार वगैरेंच्यामुळें अत्यंत रोड होणें.
 18. हातां पायां पडणें, किंवा हातीं पायीं पडणें- गयावया करणें; नम्रपणें प्रार्थना करणें. नम्र होणें; शरण येणें; दया भाकणें; काकळुतीनें विनविणें. उदा. तो मारवाडी माझ्यावर फिर्याद करावयाला तयार झाला होता, पण मी त्याच्या हातीं पायीं पडलों, तेव्हां त्यानें मला आणखी एका महिन्याची मुदत दिली.
 19. हातीं पायीं उतरणें, सुटणें, किंवा मोकळी होणें- प्रसुतीच्या धोक्यांतून निभावणें. उदा. गोपिकाबाई हातीं पायीं सुटली, (म्ह० कांहीं त्रास न होतां प्रसूत झाली). (घोडी, ह्मैस, किंवा गाय, इ० संबंधानेही ह्या वाक्प्रचार योजला जातो.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow by Email
error: Content is protected !!