“मुलाचे पाय पाळण्यांत दिसतात म्हणजे – मूल पुढें, किंवा मोठें झाल्यावर, कोणच्या गुणांचें होईल याची अटकळ अगोदरच करतां येतें.”

पाय या शब्दाचा वापर किती ठिकाणी केला जातो –

(क) घोट्याच्या खालचा तंगडीचा भाग. उदा. नवऱ्या मुलाच्या पायांवर कुंकवाची स्वस्तिकें काढतात. दुसरे उदा. चांभाराला तुझ्या पायाचा मेज दिलास काय?
(ख) सबंध तंगडी, (म्हणजे कंबरेपासून तों पायाच्या बोटापर्यंत सर्व भाग). उदा. तुझे पाय माझ्यापेक्षां लांब आहेत; पळतांना तूं माझ्या पुढें गेलास त्यांत नवल तें काय?
(ग) टेबल, खुर्ची, पलंग, चौरंग, पोळपाट, घडवंची, वगैरेंचे खूर.
(घ) पायाच्या आकृतीची कोणतीही वस्तु.
(ङ) (लाक्षणिक अर्थानें) लक्षण, चिन्ह, रंग. उदा. मुलाचे पाय पाळण्यांत दिसतात. (म्हणजे मूल पुढें, किंवा मोठें झाल्यावर, कोणच्या गुणांचें होईल याची अटकळ अगोदरच करतां येतें.)
(च) (लाक्षणिक अर्थानें) कारण. उदा. भिकेचा पाय, (म्हणजे ज्या वर्तनामुळें पुढें भीक मागावी लागेल, किंवा भीक मागण्याची पाळी येईल, असें वर्तन). दुसरे उदा. घोडजुगारीचा नाद तूं सोडून दे. तो खरोखरीं दारिद्र्याचा पाय आहे!

१. आपले पाय माझ्या घरीं लागावे – आपण माझ्या घरीं भोजनादिकांस येऊन मला धन्य करावें !

२. आपल्या पायांवर धोंडा पाडून, किंवा ओढून, घेणें – आपलें नुकसान आपणच करून घेणें; आपल्या नुकसानीस आपणच कारणीभूत होण. उदा. वरिष्ठाशीं ताठ्यानें वागूं नको, नाहीं तर आपल्या पायांवर धोंडा पाडून घेशील !

३. घोड्याच्या, किंवा हत्तीच्या, पायांनीं येणें, आणि मुंगीच्या पायांनीं जाणें – जलदीनें येणें, आणि सावकाश, धिमेधिमे जाणें, (आजार, संकट, अडचण, वगैरेंसंबंधानें योजतात).

४. मुंगीच्या पायानें येणें आणि हत्तीच्या, किंवा घोड्याच्या, पायांनीं जाणें – सावकाश येणें आणि त्वरेनें निघून जाणें, (संपति, वैभव, वगैरेसंबंधानें योजतात.)

५. चहूं पायांनीं, (दोहों पायांनीं), उतरणें – शिंगरूं, वासरूं, पाडा, वगैरे चार पाय, (किं० दोनच पाय), पुढें करून जन्मणें.

६. जळता पाय जाळणें – एकाद्या कामांत, व्यवहारांत, किं० व्यापारांत, नुकसान होत असतांही तो तसाच पुढें चालूं ठेवणें.

७. त्याच पायीं किंवा पावलीं – ताबडतोब. उदा. हें पत्र श्रीकृष्णरावाला दिल्यावर त्याच पावलीं गणोबाच्या घरीं जा.

८. पाय, किंवा पाऊल, उचलणें – जलदीनें चालणें, घाईनें चालणें. उदा. अगे, मला येथें पाणी पाहिजे आहे, माझा खोळंबा झाला आहे; तूं आपली धिमेंधिमें पाणी घेऊन येत आहेस ! जरा पाऊल, (किंवा पाय), उचल !

९. एकाद्याला पाय उताऱ्यां, किंवा पाय उतरां, आणणें – त्याला नम्र करणें, त्याला तोरा कमी करावयास लावणें. [व्युत्पत्ति:– वरच्या पाहिरीवरील पाऊल खालच्या पाहिरीवर ठेवावयास भाग पाडणें, यावरून नम्र करणें असा अर्थ झाला].

१०. पाय उताऱ्यां, किंवा पाय उतारां, येणें – नम्र होणें; गर्व सोडणें, [व्युत्पत्ति:– वरच्या लेखांकांतील व्युत्पत्तीप्रमाणेंच].

११. पाय काढणें – एकाद्या कामांतून बाहेर पडणें, किंवा त्यांतून आपलें अंग काढून घेणें. एकादे ठिकाण सोडून जाणें, किंवा काम टाकून देणें. दुसरे उदा. उदेभानाच्या शस्त्रानें तानाजी ठार मारला गेला, तेव्हां तानाजीचे शिपाई मावळे तेथून पाय काढण्याच्या बेतांत होते. पण सूर्याजीच्या ताज्या दमाच्या मावळ्यांची त्यांना कुमक मिळतांच ते पुन्हां उत्साहानें लढले, आणि शेवटी सिंहगड त्यांनीं जिंकून घेतला !

१३. पाय घेणें – प्रवृत्ति होणें. उदा. त्या कामाला माझा पाय घेत नाहीं; (म्हणजे तें काम करण्याकडे मला प्रवृत्ति होत नाहीं; तें करावें असें मला वाटत नाहीं). [येथें “घेणें” अकर्मक]

१४. पाय देणें – (क) पायाचा भार घालून चेपणें. उदा. रामा, माझ्या पायांवर जरा पाय दे रे ! दुसरे उदा. माझी पाठ दुखते आहे, पाठीवर पाय देतोस काय ? (ख) तुडविणें; उपद्रव देण्यासाठीं, कुरापत काढण्यासाठीं, एकाद्याला पायानें ताडन करणें.

१५. एकाद्याचे पाय धरणें – त्याच्या पायावर डोकी ठेवून त्याला विनंति करणें, त्याला शरण जाणें; त्याचा आश्रय मागणें. उदा. तुझी नोकरी जाऊं नये अशी तुझी इच्छा असेल तर जाऊन एकदम आपल्या वरिष्ठाचे पाय धर !

१६. त्याचे पाय धरले आहेत – थंडीनें, किंवा दुसऱ्या कांहीं कारणानें, त्याचे पाय दुखत, ठणकत आहेत. [“धरणें” हें अकर्मक].

१७. पाय पसरणें – पूर्णपणें उपभोगणें. उपभोगेच्छेला पुरी वाव देणें.

१८. पाय फासटणें – इच्छेविरुद्ध उठणें; एकादें काम करण्यासाठी कोठें तरी पायानें चालत जाणें, तंगड्या तोडणें. उदा. काडीचाही लाभ होण्याची आशा नसतां इतक्या लांब मी नाहीं पाय फासटींत जाणार !

१९. एकाद्या पदार्थाला पाय फुटणें – (क) तो हळूंच नाहींसा होणें; कोणाच्या नजरेस न पडतां ठेवल्या ठिकाणाहून तो नाहींसा होणें. उदा. मी येथें पांच पेढे ठेविले होते आतां चारच उरले आहेत; एका पेढ्याला पाय फुटले असें दिसतें; (म्हणजे तो कोणी तरी नकळत उचलला असला पाहिजे !) (ख) तो वाढत जाणें किंवा विस्तार पावणें. उदा. तूं पहिल्यानें मला फक्त पोस्टांत पत्र टाकून ये म्हणून सांगितलेंस; आतां म्हणतोस कीं चार आण्यांची तिकिटें आण; तुझ्या कामाला आणखी पाय फुटणार आहेत कीं काय? (म्हणजे तूं मला आणखीही कांहीं कामें सांगणार आहेस कीं काय?)

२०. पाय फुटणें – थंडीच्या योगानें, किंवा जाळवातानें, पाय भेगाळणें. उदा. मला पायमोजे घातल्याशिवाय अगदीं चालवत नाहीं. माझें पाय भारी फुटले आहेत !

२१. पाय फोडणें – विस्तार करणें. उदा. तुमचें बोलणें विषयाला धरून चालवा आणि थोडक्यांत आटोपा; त्याला उगीच पाय फोडूं नका !

२२. पाय लागणें, किंवा पाय भुईशीं लागणें – कायमपणा येणें. उदा. त्या ऑफिसांत माझे एकदा पाय लागूं द्या, म्हणजे हळूं-हळूं मी सारी आपली मंडळी तेथें आणून भरीन !

२३. (एकाद्याचे) पाय मोकळे करणें – त्याला अडचणींतून बाहेर काढणें. उदा. ह्या चिंचेच्या व्यापारांतून माझे पाय एकदा मोकळे करा, म्हणजे मग तुमचीं दुसरीं सतरा कामें असलीं तरी तीं मी करीन.

२४. (आपले) पाय मोकळे करणें – फेरफटका करणें. उदा. आज सकाळपासून तों आतांपर्यंत मी एकसारखा लिहीत आहे; अगदीं कंटाळा येऊन गेला आहे; आतां पाय मोकळे करावयाला सोमेश्वराकडे घटकाभर फिरून येतों.

२५. पाय मोकळा होणें – (क) अडचणींतून बाहेर पडणें. (ख) पायांचा आंखडलेपणा नाहींसा होणें.

२६. पाय मोडणें – (क) पाय अशक्त होणें. (ख) निराशेमुळें गलितधैर्य होणें. उदा. माझा जोडीदार मेल्यापासून माझे पाय मोडले, म्हणजे कांहीं करावयाला मला उत्साह वाटत नाहीं. [ह्या दोन्ही अर्थांनीं, “मोडणें” हें अकर्मक आहे.]

२७. एकाद्याचे पाय मोडणें – त्याच्या कामांत हरकत आणणें; त्याला खचविणें; त्याला एकादें काम न करूं देणें. उदा. गोवर्धनपंताला भेटल्यानें माझें काम खचित होईल, असें मला वाटतें; मी त्याला भेटावयास जातोंच; तुम्ही उगीच माझे पाय मोडूं नका ! (म्हणजे मला खचवूं नका ! जाण्यापासून मला पराङ्मुख करूं नका !)

२८. पाय वाहणें – एकाद्या स्थलीं जाण्याला मनाचा कल होणें. उदा. काल दारूच्या पायीं इतकी तुझी छीः थूः झाली, आणि आज पुन्हां दारूच्या पिठ्याकडे जाण्याला तुझे पाय कसे वाहतात ?

२९. एकाद्याचे पाय शिवणें – त्याच्या पायांना स्पर्श करणें. [शपथ घेतांना हे शब्द उच्चारतात]. उदा. मी तुमचे पाय शिवून सांगतों, कीं तुमच्याविषयीं माझ्या मनांत कपट नाहीं.

३०. पायाची, किंवा तळपायाची, आग मस्तकास जाणें – संतापणें, रागानें जळणें. उदा. तुझें उर्मटपणाचें वर्तन पाहून माझ्या पायाची आग मस्तकास जाते !

३१. पायांतील वाहाण पायांतच बरी, किंवा पायांतच ठेवावी – ही म्हण आहे. हिचा अर्थ हलक्या मनुष्याला फाजील महत्त्व देऊं नये, असा आहे.

३२. आल्या पायांची धूळ माझ्या घरीं झाडावी – माझ्या घरीं आपण यावें. (नम्रपणाचें आमंत्रण).

३३. आपल्या पायांपाशीं मी आलों आहें – मी आपल्याकडे आलों आहें. [नम्रपणा दाखविणारा प्रयोग].

३४. एकाद्याच्या पायां पडणें – (क) त्याच्या पायांवर डोकें ठेवणें; (प्रार्थना; किं० विनंति करण्यासाठीं). (ख) नम्रपणानें विनंति करणें, याचना करणें. “उत्तर म्हणे, “नको गे ! पायां पडतों, बृहन्नडे ! सोड । जोड दिली, दुखवुं नको, केवळ पितृकरतलस्थ हा फोड ॥ मोरोपंत.”

३५. पायापाशीं पाहणें – जवळ जें असेल त्याचाच विचार करणें; आपल्या परिस्थतीचा विचार करणें.

३६. पायांला किंवा पायांत, अढी पडणें – म्हातारपणामुळें एका पायाला दुसरा पाय चालतांना घासणें. उदा. ह्या घोड्याच्या पायाला आढी पडूं लागली. आतां तुम्ही दुसरा घोडा विकत घ्या.

३७. पायाला खुंट्या येणें – एके जागीं फार वेळ बसल्याकारणानें पाय ताठणें.

३८. एकाद्याच्या पायांवर कुत्रीं मांजरें घालणें – फार फार प्रार्थना करून त्याला कांहीं काम करावयास उठविणें.

३९. पायांवर पाय टाकून निजणें – चैनींत निजून राहणें.

४०. एकाद्याच्या पायांवर पाय देणें – त्याच्या पाठोपाठ जाणें, किंवा चालणें, किंवा करणें.

४१. त्याच्या पायांवर भोंवरा, (किंवा भिंगरी) आहे, किंवा भोंवरा पडला आहे – तो सदासर्वदा भटकत असतो; तो घरांत मुळींच ठरत नाहीं.

४२. एकाद्याच्या पायाशीं पाय बांधून बसणें – त्याची पिच्छा पुरवून काहीं मागणी मागणें.

४३. त्याच्या पायास वाहाण बांधलेली आहे – तो सदा भटक्या मारीत असतो.

४४. पायीं – पायानें. उदा. मी पायींच कुरल्यास गेलों.

४५. एकाद्याच्या पायीं – त्याच्यामुळें. उदा. तुझ्या पायीं मला ही अद्दल घडली., दुसरे उदा. तुमच्या पायीं मी सर्वस्वी बुडालों, किंवा आपलें सर्वस्व बुडविलें. तिसरे उदा. तुझ्या विद्येच्या पायीं माझे पांच हजार रुपये खर्च झाले.

४६. भरल्या पायांचा – मळलेले पाय ज्याचे आहेत असा. उदा. तूं शेतांतून आला आहेस, तर भरल्या पायांचा जाजमावर चालूं नको.

४७. भरल्या पायीं – बाहेरून चालून आल्यावर पाय न धुतां. उदा. भरल्या पायीं बाळंतिणीच्या खोलींत जाऊं नये. “भरल्या पायीं जाऊं नये” ह्याच्याबद्दल “पायीं भरलें जाऊं नये,” असेंही म्हणतात. मागला पाय पुढें न ठेवूं किंवा घालूं देणें त्यानें आपली मागणी पुरविल्याशिवाय त्याला पुढें पाऊल टाकूं न देणें. उदा. संध्याकाळीं माझें मूल खळीस आलें. मी विहिरीचें पाणी भरीत होतें; त्यानें माझा मागला पाय पुढें घालूं दिला नाहीं. त्याला जेव्हां पाजलें, तेव्हां तें गप्प राहिलें !

४८. मागला पाय पुढें न ठेवणें – एकाद्याजवळ मागितलेली वस्तु त्यानें दिल्याशिवाय, किंवा त्याला केलेली विनंति त्यानें मान्य केल्याशिवाय, त्याला सोडावयाचें नाहीं-त्याच्यापासून दूर जावयाचें नाहीं-असा निश्चय करून असणें. मागला पाय पुढें नाहीं आणि पुढला पाय मागें नाहीं, अशा नेटानें तो होता तो एका जागीं करारीपणानें ठाव धरून राहिला होता; तो केसभरही हालला नाहीं. उदा. दहा चोरटे माझ्यावर तुटून पडले, पण मी मागला पाय पुढें नाहीं आणि पुढला पाय मागें नाहीं, अशा करारीपणानें उभा राहिलों होतों.

४९. मागल्या पायीं परत येणें – निरोप पोंचविल्यानंतर, किंवा एकाद्या ठिकाणीं काम करावयास जाऊन ते झाल्यानंतर, वेळ न गमांवतां, परत येणें. उदा. हें पत्र तूं रामभाऊंना नेऊन दे, आणि मागल्या पायीं परत ये.

५० .तूं आपल्या पायापाशीं किंवा पायाखालीं काय जळत आहे तें पहा – तूं आपल्या परिस्थितींतील जो दोष, किंवा उणेंपणा आहे, त्याचेकडे दुर्लक्ष्य करून असूं नको. उदा. अमक्याचा मुलगा ओंवळ्यानें जेवतो, आणि तमक्याच्या मुलानें केंस राखिले आहेत, वगैरे निंदा कशाला करतां ! तुमच्या पायापाशीं काय जळतें आहे तें अगोदर पहा ! (म्हणजे खुद्द तुमच्या स्वतःच्या मुलाचे काय ढंग आहेत ते पहा !)

Follow by Email
error: Content is protected !!