“डोळा”

डोळा(क) रंग, रूप, वगैर जाणण्याचें इंद्रिय; नेत्र, नयन. उ० त्याचे डोळे विशाल आणि पाणीदार आहेत.
 (ख) दृष्टि, नजर.उ० तो वक्ता वेदीवर येतांच सर्व प्रेक्षकांचे डोळे त्याच्याकडे लागले.
 (ग) छिद्र; लहान भोंक.उ० सुईचा किं० दाभणाचा डोळा.
 (घ) मोराच्या पिसाऱ्यावरील डोळ्याच्या आकाराचीं वर्तुळें; चंद्रक. 
 (ङ) डोळ्याच्या आकाराची आकृति. शिताफळ, रामफळ, वगैरेंवरचे खवले. 
 (च) अंकुर फुटण्याची जागा. उ० बटाट्याचा डोळा, उसाचा डोळा.
 (छ) पायाच्या घोट्याजवळ दोन खळगे असतात, त्यांपैकीं प्रत्येक. 
 (ज) गुडघ्याच्या वाटीजवळच्या दोन खळग्यांपैकीं प्रत्येक. 
 (झ) (लाक्षणिक अर्थानें) माहिती सांगणारा; हकीकत कळविणारा; ज्ञानाचा उगम,उ० हेर हे राजाचे डोळे होत.
चार डोळे होणेंएकमेकांस मदत करावयास दोन माणसें जुळणें.उ० तुमचे आणि माझे असे चार डोळे झाले, म्हणजे चुका होण्याची संभव कमी.
डोळा ओळखणेंआशय किं० अभिप्राय जाणणें, समजणें, किं० ताडणें; मनाचा कल जाणणें किं० ओळखणें.उ० त्याचा डोळा ओळखतांच मी आपलें भाषण आटोपतें घेतले.
डोळा चुकविणेंदृष्टीस न पडणें; दृष्टीस न पडूं देणें.उ० ह्या पोराला सुपारीची भारी चटक आहे. माझा डोळा चुकवून त्यानें चंचींतून केव्हांच एक खांड काढून तोंडात टाकलें !
डोळ्यांत प्राण ठेवणेंअमुक एक गोष्ट पाहिल्याबरोबर मरावयास तयार होऊन राहणें.उ० मुलाला भेटावयासाठीं सदाशिवराव डोळ्यांत प्राण ठेवून जसा कांहीं जिवंत राहिला आहे !
डोळाभर झोपबरीचशी झोंप. हुशारी वाटण्याइतकी झोप.उ० काल सारी रात्र मला जागरण झालें, आतां डोळाभर झोंप मिळाली तर बरें वाटेल.
एकाद्यावर डोळे उगारणें किं० वटारणेंउग्र मुद्रेनें त्याच्याकडे पाहणें. 
 डोळे उघडणें(उघडणें सकर्मक) आपली स्थिति, कर्तव्य, हिताहित वगैरेंकडे लक्ष्य देणे. (उघडणे अकर्मक) खरी स्थिति दिसूं लागणें, कळून येणें. 
एकाद्याचा डोळा उघडत नाहीं, किं० उघडेनासा होणेंगर्वानें, किंवा श्रीमंतीच्या मदानें, किं० तिरस्कारयुक्त नजरेनें, पाहणे. उ० सदोबाला ही बढतीची जागा मिळाल्यापासून त्याचा डोळा अगदीं उघडेनासा झाला आहे ! 
 पावसाचा डोळा उघडणेंपाऊस खळणें.उ० आज चार दिवसांत पावसाचा डोळा क्षणभरही उघडला नाहीं.
डोळे उरफाटणें किं० फिरणेंअधिकाराच्या, किं० श्रीमंतांच्या, मदानें, किं० वरिष्ठाची मर्जी आपल्यावर असल्याकारणानें, उन्मत्त होऊन जाणें.उ० गोविंदरावाचे डोळे आलीकडे किती उरफाटले आहेत म्हणून सांगू ?
डोळेगांवचीं कवाडें लागणें अंध होणें. 
डोळे चढणेंउग्र दिसणें.   (अमली पदार्थाच्या सेवनानें, किं० उन्मादानें) 
डोळे चढवून बोलणेंरागानें, किं० मगरुरीनें, बोलणें. 
डोळे जळणेंमत्सरानें बरें न पाहवणें.उ० माझे वैभव पाहून त्याचे डोळे जळत असतात !
डोळे जाणेंअंधता येणें.उ० देवीची फुलें पडून आठव्या वर्षी सुंदररावांचे डोळे गेले.
डोळे झाकणें(क) दुर्लक्ष्य करणें; बेपरवाई दाखविणें.उ० मुलाच्या वर्तनाकडे तुम्ही डोळे झाकले तर पुढें पस्तावाल !
 (ख) काणा डोळा करणें, मनावर न घेणें 
 (ग) मरणें. 
डोळे ताठणेंगर्विष्ठ होणें.उ० मलकाप्पाला पाटलिकी मिळाल्यापासून त्याचे डोळे किती ताठले आहेत म्हणून सांगूं ?
डोळे तांबारणेंउग्र नजरेनें पाहाणें.माझ्यावर डोळे तांबारून पांडोबा माझ्याशी बोलत होता.
डोळे थंड होणें, किं० डोळे निवणेंएकादी प्रिय वस्तु पाहून समाधान पावणें, इच्छिलेली वस्तु मिळाल्यानें आनंदित होणें.उ० मुलाचे देान हाताचे चार हात झालेले पाहून शंकररावांचे डोळे थंड झाले !
डोळे निवळणें(क) डोळ्यांचा कांहीं रोग बरा झाल्यानंतर डोळे स्वच्छ, किं० साफ होणें. 
 (ख) ताळ्यावर येणें (कोणत्याही वेडानंतर, किं० नादानंतर, किं० व्यसनानंतर). 
डोळे पठारास जाणें आजार, अशक्तपणा, उपवास, वगैरे कारणांनीं डोळे खोल जाणें. 
डोळे पांढरे करणें(क) डोळे पांढरे होत तोंपर्यंत मारणें, किं० शिक्षा करणें. उ० माझ्या वाटेस जाऊं नको. माझा राग कठिण आहे. मी एकदा मारावयास लागलों, कीं तुझे डोळे पांढरे करून सोडीन !
 (ख) भीतीनें, किं० घाबरल्यामुळें, डोळे पांढरे करणें; घाबरून जाणें भयामुळें गर्भगळित होणें.उ० मला पाहतांच व्यंकूनें डोळें पांढरे केले!
 (ग) मरणाच्या द्वारी येऊन पोंचणें. उ० पांडोबानें डोळे पांढरे केले. आतां मात्राबित्रांचा उपयोग काय व्हावयाचा ?
डोळे पांढरे होणें अतिशय भीतीनें, किं० तीव्र शारीरिक यातनांमुळे, किं० एकादें मोठें संकट प्राप्त झाल्यामुळें, डोळ्याचा वर्ण पांढरा होणें.उ० हातीं कुहाडी घेतलेले दरोडेखोर पाहतांक्षणीं विश्वासरावांचे डोळे पांढरे झाले !
 डोळे पाताळांत जाणेंअशक्तपणानें, किं० आजारामुळें, डोळे खोल जाणें.उ० हें नारायणरावांच्या जिवावरचे दुखणें गेलें; त्यांचे डोळे पहा कसे पाताळांत गेले आहेत ते !
डोळे पाहून वागणें किं० चालणेंएकाद्याच्या मनाचा कल लक्ष्यांत घेऊन वर्तन करणें. उ० रामभाऊ आपल्या वरिष्ठाचे डोळे पाहून वागत असतो, मग त्याला बढती कां नाहीं मिळणार ?
डोळे पिंजारणें, फिंदारणें, किं० फाडणेंएकाद्या मनुष्याकडे डोळे वटारून पाहाणें, किं० उग्र नजर करणें. 
 एकाद्याचे डोळे पुसणेंत्याचें सांत्वन करणें. 
डोळे फाटणें   
 (क) डोळ्याने कांहीं तरी खुणा करणें 
 (ख) गर्वाची, किं० मगरुरीची, नजर करणें. 
डोळे येणें(क) अंधता जाऊन पुन्हां दृष्टि प्राप्त होणें.उ०
शोकें रडतां डोळे जावे, गेले कधीं न यावे गा ! ।
दिसतें कल्याण पुढें, होऊंचि नको अधीन या वेगा ॥
                 मोरोपंत-वनपर्व, अ० १३.
 (ख)डोळ्यांना रोगविशेष होणें.उ०आम्ही बैलगाडीनें, आणि उन्हाळ्याच्या दिवसांत, सासवडास गेलों; हा प्रवास आमच्या धाकट्या मुलास बाधला, आणि त्याचे डोळे आले.
डोळा लवणेंडोळ्याच्या पापणींचें स्फुरण होणें. उ० पुरुषांचा उजवा डोळा, आणि बायकांचा डावा डोळा, लवणें हें शुभसूचक समजतात.
डोळ्यांच्या खाचा होणें, किं० डोळ्यांचे खोबरें होणें, किं० डोळ्यांची भिंत होणें डोळ्यांचा अवलोकनाचा व्यापार बंद होणें. उ० हल्ली तात्यांना एक्याण्णवावें वर्षे आहे, त्यांच्या डोळ्यांच्या खाचा होऊन गेल्या आहेत.
  उ० अरे, असा लोकांना पायाचे धक्के देत देत काय चालला आहेस ! मागें पुढें पाहून चालशील कीं नाहीं ? की तुझ्या डोळ्यांच्या खांचा झाल्या ?
डोळ्यांचें पारणें फिटणेंउत्कंठेनें अपेक्षिलेली वस्तु एकदाची पहावयास मिळणें.उ० नातवंड केव्हां दिसेल, केव्हां दिसेल, म्हणून मोरोपंत आतुर झाले होते; आतां त्यांना एकदाचें नातवंडाचें तोंड दिसलें; आतां त्यांच्या डोळ्यांचें पारणें फिटलें.
डोळ्यांत (किं० नेत्रांत) खुपणें, किं० सलणेंपाहून डोळ्यांना वेदना होणें, (मत्सरानें, द्वेषानें, वैरानें, इ०). ४२. – उ०
ब्राह्मण कणसा खुपतो तुमच्या नेत्रीं, नसो, सवें काढा।
युक्तचि मरणाराला हितपरिणामहि न सोसवे काढा ॥
डोळ्यांत जहर उतरणेंदुसऱ्याचें वैभव पाहून मत्सरग्रस्त होणें. 
डोळ्यांत तेल घालूनकाळजीनें, खबरदारीनें. डोळ्यांत तेल घालून जागणें, किं० रात्र काढणें ह्म० आजारी माणसाची काळजी घेण्यासाठीं झोप न घेतां बसून राहणें. 
एकाद्याच्या डोळ्यांत धूळ, किं० माती घालणेंत्याला फसविणें. 
डोळ्यांत पाणी नसणेंलाज न वाटणें. 
 डोळ्यांत पाणी असणेंलाज वाटणें. 
डोळ्यांत बोट घातलें असतां दिसणार नाहीं, इतका अंधार.निबिड काळोख. 
डोळ्यांत भरणें(क) फार फार आवडणें.उ० ही अंगठी माझ्या डोळ्यांत भरली आहे, (म्ह० मला ती फार आवडते).
 (ख) महत्त्वाचा वाटणें. उ० इंग्रज प्रथम हिंदुस्थानांत आले, तेव्हा मुसलमानांचें राज्य होतें. अर्थात् त्या वेळीं इंग्रजांच्या डोळ्यांत मुसलमान तेवढा भरण्यासारखा होता. मराठ्यांकडे त्यांचे लक्ष्य कशाला जाईल ?                                                                 
                                  न. चिं. केळकर. मराठे व इंग्रज.
डोळ्यांत माती पडणेंमत्सर वाटणें. 
डोळ्यांत न मावणें  किं० न समावणेंपाहतांक्षणीं गर्भ गळित न होणें; न भिणें.उ० मी कांहीं तुझ्या डोळ्यांत मावणार नाहीं ! (ह्म० मी तुला भीत नाहीं).
डोळ्यांत वात घालून बसणेंजागत बसणें. 
डोळ्यांत शरम नसणेंनिर्लज्ज असणें. 
डोळ्यांनीं उजाडणेंसारी रात्र जागून काढणें किं० घालविणें. 
डोळे मारणें डोळ्यांच्या खुणांनीं संकेत कळविणें. 
डोळ्यांनीं रात्र किं० दिवस काढणें किं० उगवणेंएकसारखें जागत बसून रात्र, किं० दिवस, घालविणें. 
उघड्या डोळ्यांनींजाणून बुजून; फसगतीनें नव्हे. 
डोळ्यावर धूर येणेंअधिकारानें, किं० संपत्तीनें, फुगून जाणें, किं० उन्मत्त होणें. 
 डोळ्यांवर येणें(क) डोळ्यांत सलणें; असह्य होणें. 
 (ख) उघडकीस येणें. 
एकाद्याच्या डोळ्याशीं डोळा मिळविणें त्याच्याकडे उद्धटपणानें टक लावून पाहात राहणें. 
डोळ्याशीं डोळा लागणें, किं० डोळ्याला डोळा लागणें-थोडीशी झोप येणें. 
डोळा लागणेंथोडीशी झोप येणें, किं० लागणें.उ०
चित्ताज्वरांत माझा रात्रौ नाहींच लागला डोळा।
जायासाठी कंठीं शतवार प्राण जाहले गोळा ॥
                                           मोरो०—बृहद्दशम.
दोहो डोळ्यांची मुरवत राखणेंएकाद्याकडे पहावयाला भिणें किं० कचरणें. 
दोन डोळ्यांची भीडमाणूस समोर उभें आहे तोपर्यंत त्याच्याविषयीं भीति, आदर, किं० प्रेम वाटणें, आणि तें माणूस तेथून दुसरीकडे गेलें की त्याचें स्मरणही नाहीं असें होणें; वरपांगीं भीति, आदर किं० प्रेम. 
रुप्याचे डोळे होणेंअंतकाळ आल्यामुळें डोळें पांढरे, किं० निस्तेज होणें; मरणोन्मुख होणें. 
डोळे ताणून पाहणेंतीक्ष्ण नजरेनें किंवा टवकारून पाहणें. 
डोळ्यांपुढे काजवे येणेंभोंवळ येण्याची भावना होणें. 
डोळ्यांवर कातडें ओढणेंएकाद्या गोष्टींकडे दुर्लक्ष्य करणें; ती पाहिली न पाहिली असें दाखविणें. ती मनावर न घेणें. 
वाघाचा डोळारुपाया. [ भिक्षुकमंडळींत ह्या शब्दाचा प्रचार आहे. भिक्षुकलोकांच्या परिभाषेत वाघाचा डोळा किं० राम म्ह० रुपाया, सीताबाई म्ह० आधेली, चकारी म्ह० चवली, पकारी म्ह० पावली. तत्त्वमसी म्ह० द्रव्यलाभ ]. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow by Email
error: Content is protected !!