अवघड मराठी शब्द व त्यांचे अर्थ | Difficult Marathi Words and their meaning

 • अवदसा – [सं० अवदशा]. (क) निकृष्ट, कष्टमय स्थिति; दुर्दैव. (ख) (लाक्षणिक अर्थानें द्वाड, भांडखोर, कजाग, स्त्री.)
 • अक्षता – कुंकवानें तांबडे केलेले तांदूळ.
 • आव – अवसान, उत्साह, धैर्य.
 • उच्छाद – उपद्रव, सतावणूक, गांजणूक. [क्रियापदें, आणणें, देणें, येणें].
 • कस – [सं० कषाय] सार, पौष्टिक अंश, सत्त्व, सामर्थ्य, शक्ति, जोर.
 • गच्छंती – नाश, पराभव, सामर्थ्यभंग. [संस्कृत:–गम्, गच्छ्, म्ह० जाणें].
 • गंडा – गायनादि कला शिकविणारे लोक शिकणाराच्या मनगटाला दोरा बांधतात, आणि मग शिकविण्याला आरंभ करतात. त्या दोऱ्याला “गंडा” म्हणतात.
 • गमजा – (फारशी गम्‌जह् = नखरेबाजी, छाकटेगिरी), खोड्या, चेष्टा, वेडे वेडे चाळे, चोचले.
 • गळ – विहिरींत पडलेलें भांडें वर काढण्यासाठीं लोखंडाच्या आंकड्यांचें जुडगे दोरीच्या टोंकाला बांधून तें पाण्यांत टाकून दोरीचें दुसरें टोंक हालवितात. तेणेंकरून तें भांडें ह्या आकड्यांत आंडकतें, आणि दोरी वर खेचली, म्हणजे तें वर येतें. ह्या साधनाला “गळ” असें म्हणतात. मासे धरावयासाठीं जो केसासारखा बारीक पोलादी आंकडा असतो, त्यालाही गळ म्हणतात. अनुरूप क्रियापद घालणें, टाकणें, इत्यादी . ह्यापासून पुढील वाक्प्रचार उत्पन्न झालेले आहेत.
 • गोता – संकट, अडचण, नुकसान.
 • घटका – (क) विशिष्टकालपरिमाण; आडीच तास, (ख) घटकेच्या अवधीनें पाण्यांत बुडणारें ताब्याचें पात्र. [घटक मोजण्यासाठीं ज्योतिषी ह्याचा उपयोग करतात].
 • चाळा – एकादी गोष्ट करण्याकडे मनाची विशेष प्रवृत्ति.
 • चीत करणें – पराजित करणें.
 • टांकी – पाथरवटांचें एक हत्यार.
 • टेंभा – मशाल.
 • पदर- (क) धोतराचें, लुगड्याचें, किं० पागोट्याचें, टोक, (ख) नक्षी, वेलबुट्टी, वगैरेंनीं सुशोभित केलेलीं लुगड्याचीं, शालजोडीचीं, वगैरे शेवटें. “(ग) सर. (घ) वाईट जातकुळीचा संबंध. (ङ) लुगडें नेसून लुगड्याचा बहुतेक भाग कंबरेभोंवती गुंडाळल्यावर त्याचा जो थोडासा भाग ऊर किंवा डोकें झाकण्यासाठीं उरविलेला असतो, तो. (च) ताबा, कबजा, देखरेख, स्वामित्व, अधिकार. (छ) साल, पान, त्वचा. (ज) डोळ्याच्या बुबुळावर किंचित् अपारदर्शक असा पातळ थर येतो तो.
 • पेच – कुस्तीच्या खेळांत प्रतिपक्ष्याला पाडण्याच्या ज्या युक्त्या, त्यांना “पेच” असें म्हणतात.
 • बिऱ्हाड – (क) राहावयासाठीं भाड्यानें घेतलेली जागा, घर, इत्यादी . (ख) एकाद्या ठिकाणी राहणें. वसति. वास्तव्य (ग) सामान सुमान, चीजवस्त. (घ) स्पष्टपणें न बोलतां चोरून ठेवलेला मजकूर.
 • ब्रीद – “सं० विरुद म्ह० स्तोत्र, प्रशंसात्मक गाणें, पद इत्यादी . एकाद्या चांगल्या गुणावरून मिळालेलें जें यश, त्याला “ब्रीद” असें म्हणतात, आणि तें यश न जाऊं देणे, याला “ब्रीद पाळणें,” किंवा “राखणें,” किंवा “ब्रीदास जागणें, ” असें म्हणतात.
 • भट्टी –पदार्थाला आच देण्यासाठीं केलेली रचना, किंवा तींत ठेवलेला पदार्थ.
 • भर – व्युत्पत्तिः –संस्कृत भृ := भरणें. “भर” हा शब्द स्त्रीलिंगी आहे. (क) भरतां येईल तितकें सामान; सोसतां येईल इतकें ओझें; करतां येईल तितकें काम. (ख) पोकळ किंवा रिकामी जागा, खड्डा, किंवा उणीव भरून काढण्यासाठीं जें कांहीं भरावयाचें, किंवा घालावयाचें, तें.
 • भीक – (क) भिक्षा, याचना, (ख) याचना करून मिळालेला पदार्थ, (ग) कमताई, उणीव, टंचाई.
 • भीड – (क) भितरेपणा, भीति, संकोच, मनाचा कोंवळेपणा, (ख) विनंती, आग्रह, (ग) लाज, वचक. ह्याच्यापुढें येणारीं क्रियापदें घर, राख, ठेव, सूट, चेप, मर, घाल, खर्च, इत्यादी .
 • माग – (संस्कृत मार्ग) रस्ता, वाट.
 • वर्दळ – (क) घर्षण. झिजविण्याची क्रिया. रहदारी, (ख) उपद्रव. त्रास, धिंगामस्ती, धांगडधिंगा.
 • वाचा – (क) भाषण, बोलणें, (ख) भाषण करण्याचें इंद्रिय, किं० सामर्थ्य, (ग) आकाशवाणी.
 • शंख – (क) समुद्रांत राहणारा एक प्राणी, (ख) त्या प्राण्याचें घर, (ज्यांत तो राहतो). देवावर पाणी घालण्याकडे किंवा युद्धांत रणवाद्य म्हणून वाजविण्याकडे, व अन्य प्रसंगीं, त्याचा उपयोग केला जातो, (ग) बोटावर ज्या शंखाकृति रेषा असतात त्या, (घ) मूर्ख, अडाणी, माणूस, (ङ) नवनिधींपैकीं एक निधि, (च) गालाचे हाड, (छ) एक संख्या, (ज) अभाव, पूज्य.
 • शेण – गायी, म्हशी, वगैरे जनावरांची विष्ठा.
 • शोभा – तेज. संमान. लाक्षणिक अर्थानें:–फजीती, बेआबरू, खरडपट्टी, अपमान.
 • सत्त्व – (क) सत्त्व, रजस् आणि तमस् हे मायेचे जे तीन गुण, त्यांतील पहिला. ह्या गुणाच्या उत्कर्षानें शांति, क्षमा, दया, इत्यादि गुणांची वृद्धि होते, (ख) अस्तित्व, (ग) पदार्थाचा कस, म्हणजे सारभूत अंश, (घ) ज्या गुणावरून एकाद्या माणसाची प्रसिद्धि झालेली असते, तो त्याच्या अंगचा गुण.
 • समाचार – हकीगत, वृतांत. एकाद्याच्या हालहवालीची खबर, किंवा बातमी.
 • सर – बरोबरी; तुल्यता.
 • सूत – कापूस, वगैरेंचा धागा किंवा दोरा.
 • हार – (क) नुकसान; हानि. [अनुरूप क्रियापद येणें, लागणें, किं० बसणें], (ख) पराभव. अंगावर डाव लागणें.
 • शेंडी – “(क) डोक्याची हजामत करवून, किंवा जावळ करवून, मध्यें जो केशांचा झुबका राखून ठेवलेला असतो तो; हिंदुत्वाची खूण, (ख) मोर, कोंबडा, वगैरेंच्या माथ्यावरील मांसल तुरा, (ग) शेंडें नक्षत्राचें शेंपूट, (घ) घोड्याच्या दोन कानांच्या दरम्यान कपाळावर लोंबणारे केश, (ङ) तेल्याची घाणा, उसाचा चरक, वगैरेंच्या लाटावरील फळी, किंवा तक्ता.
 • मुंडी – (क) डोकें (तिरस्कारव्यंजक), (ख) संन्यासी. (संन्याशाचे सर्व डोक्यावरचे केश भादरलेले असतात यावरून हा तिरस्कारव्यंजक शब्द प्रचारांत आलेला आहे).
 • मन – (क) सुखदुःखादिकांचें ज्ञान करून देणारें इंद्रिय, (ख) संकल्पादिरूप मनाची वृत्ति, (ग) सदसद्विवेकबुद्धि.
 • बगल – (क) खाक; खांद्याखालचा भाग, (ख) आंगरखा, बंडी, वगैरेंच्या बाहीला जो चौकोनी तुकडा शिवलेला असतो तो. बायकांच्या चोळीला असाच तुकडा असतो तो त्रिकोणाकृति असतो, आणि त्याला कोर असें म्हणतात. (कोर स्त्रीलिंगी), (ग) लंगड्या मनुष्याची कुबडी, (घ) बाजू.
 • पाऊल – (क) पायाच्या घोट्याखालचा भाग, (ख) पायाच्या घोट्याखालच्या भागाची ठेवण, ढब, किंवा आकारमान, (ग) पायाचा तळवा, (घ) पायाच्या तळव्याचा जमीनीवर उठलेला ठसा, किंवा आकृति, (ङ) चालण्याचा वेग. (च) पायाच्या लांबीइतकी लांबी, (छ) चालण्याची तऱ्हा किंवा ढब; विशिष्ट प्रकारची चाल, (ज) चालतांना जमीनीवरील दोन पावलांमधील अंतर.
 • शिकंदर – म्यासिडोनियाचा “सिकंदर” म्हणून एक पराक्रमी राजा होऊन गेला. शिकंदर, अल्सिकंदर, असकंदर, व अलेक्झांडर, ही त्याच शब्दाची भिन्न भिन्न रूपें होत. (लाक्षणिक अर्थानें “शिकंदर” ह्याचा अर्थ गांवचा पुंड, वात्रट, द्वाड, माणूस, असा होतो. शिकंदर नशीब म्हणजे मोठ्या संकटांतून निभावून, किंवा बचावून नेणारें जें नशीब, किंवा दैव, तें.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow by Email
error: Content is protected !!