ऊर | छाती, वक्षःस्थळ. | |
ऊर काढून चालणें | ऐटीनें किं० बेपर्वाईनें चालणें किं० वागणें. | |
ऊर दडपणें | (भीतीनें, आश्चर्यानें, वगैरे) स्तब्ध किं० ग्रस्त होणें. | |
ऊर दबणें, ऊर बसणें, ऊर फाटणें, ऊर उलटणें | आश्चर्यचकित होणें; भीतिग्रस्त होणें; घाबरणें; गांगरणें. | |
ऊर दाटणें किं० ऊर भरणें | (क) छातींत बांध बसणें. | |
(ख) दुःख, प्रेम, वगैरे भावनांनीं अंतःकरण आक्रान्त होऊन जाणें. | ||
ऊर फोडणें किं० ऊर फोडून घेणें | फार श्रम करणें. | उ० तूं हेकट मनुष्य आहेस ! तुझ्यापुढें ऊर फोडणें व्यर्थ ।। |
एकाद्याचें ऊर फोडणें | त्याच्याकडून फार काम करून घेऊन त्याला त्रास देणें, किं० सतावणें. | उ० ह्या घोड्याला दामटून तुम्ही त्याचें ऊर फोडलें ! |
उर बडविणें | दुःखानें, किं० आश्चर्यानें, छातीवर हातांनीं ताडन करणें. | |
उराला (किं॰ छातीला) हात लावून, किं० उरावर (किं॰ छातीवर) हात ठेवून | भरंवशानें, निश्चयानें, खात्रीपूर्वक; न कचरतां, न डगमगतां. | उ० या आर्येंचा अर्थ मला समजला आहे, असें मी छातीला हात लावून तुम्हाला सांगतों ! |
उरापोटावर उचलणें | मोठ्या कष्टानें किं० श्रमानें उचलणें | तें तांदुळाचें पोतें भारी जड होंते, परंतु रामानें तें उरापोटावर उचलून कसे तरी एकदाचे घडवंचीवर ठेवून दिलें ! |
एकाद्याच्या उरावर असणें | (क) अगदीं करावयास पाहिजे असें काम त्याच्या शिरावर असणें. | उ० तुमच्याबरोबर पत्ते खेळावयाला मला वेळ नाहीं. माझ्या उरावर हीं पांच समीकरणें सोडवून मास्तराला दाखवावयाचीं अशी आहेत ना ? |
(ख) त्याच्यावर अंमल करणारा, किं० अधिकार चालवणारा मनुष्य असणें. | उ० कचेरींत उशीरां जाऊन कसें चालेल ? आमच्या उरावर तो साहेब आहेना ? (म्ह० आम्हांला रागें भरणारा इ०). | |
(ग) भारभूत झालेला असणें. | उ० दहा रुपयांत माझा संसार कसा भागेल ? माझ्या उरावर भाचा आहेना ? (म्ह० त्याला पोसण्याची जबाबदारी माझ्या शिरावर आहेना ?) | |
उरावर घेणें | एकादें कठिण काम करण्याचा पथकर घेणें, कि० तें करावयास निघणें. | |
एकाद्याच्या उरावर धोंडा ठेवणें, किं० देणें | त्याला अवघड काम करावयास सांगणें. [‘ धोंड ‘ असा स्त्रीलिंगी शब्दही येथें योजण्यांत येतो.] | |
एकाद्याच्या उरावर बसणें | (क) करावयाला पाहिजेच असे त्याच्याकडे, किंवा त्याच्या वांट्याला कांहीं काम येणें. | |
(ख) त्याला कैचींत धरणें. त्याच्यावर जबरदस्ती करणें. | उ० त्या मजूराच्या उरावर बसून मी हें काम त्याच्याकडून एका दिवसांत करवून घेतलें. | |
उराशीं धरणें | (माणसासंबंधानें)- | |
(क) त्याला नम्रपणाने विनविणें, किं० प्रार्थिणें. | ||
(ख) त्याला प्रेमानें कवटाळणें. | ||
(वस्तूसंबंधानें)- | ||
ती संभाळून ठेवणें; तिची जोपासना करणें; ती शाबूत ठेवणें; तिचा भंग न होऊं देणें. | ||
उरीं डोंगर घेणें | (क) महत्त्वाचें किं० कठिण काम पथकरणें. | |
(ख) फार परिश्रम करणें. | ||
उरीं पोट करणें | फार परिश्रमानें किं० कष्टानें करणें. | |
उरीं पोट धरणें | नम्रपणानें विनवणी करणें; दादा बाबा करणें. | |
उरीं फुटणें किं० भरणें | जिवाविशेष श्रम केल्यामुळें छाती दुखूं कि० ठणकूं लागणें; अतिशय थकून जाणें. |