“अंग”

अंग – या शब्दाचे अर्थ पुढील प्रमाने आहेत. (क) शरीर, देह. उ० मातीत खेळून तुझे सारें अंग मळून गेलें आहे, चार तपेल्या अंगावर ओतून घेऊन स्वच्छ होऊन ये. (ख) शरीराचा कोणताही अवयव, किं० भाग, किं० इंद्रिय. उ० हात, पाय, वगैरे, ही शरीराची अंगें होत. (ग) बाजू, दिशा, तरफ. उ० माझ्या डाव्या अंगाला बसला होता, तो माझा थोरला भाऊ, आणि उजव्या अंगाला बसला होता, तो माझ्या वर्गातील एक मुलगा होता. उ० तुमचें पागोटें मागल्या अंगानें बेडौल दिसतें. (घ) कोणत्याही शास्त्राचा, विषयाचा, कृत्याचा, किं० विधीचा विभाग. या विभागांचे जे पोटविभाग, त्यांना “उपांगें ” म्हणतात. उ० हत्ती, रथ, घोडेस्वार आणि पायदळ, हीं प्राचीन काळीं सैन्याचीं चार अंगें समजलीं जात असत. उ० राजा, मंत्री, मित्रमंडळी, खजीना, देश, सैन्य, आणि किल्ले, हीं राज्याचीं सात अंगें होत. उ० शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, छंद, आणि ज्योतिष, ही वेदाची सहा अंगें होत. (ङ) कर्तृत्व, संबंध उ० त्या मसलतींत गोविंदपंतांचे अंग आहे, ह्यांत शंका नाहीं. (च) गुप्त रीतीची मदत, अनुकूलता, काणा डोळा करून पाहण्याची प्रवृत्ति, किं० आश्रय. उ० गांवांत आलीकडे फार फार चोऱ्या होऊं लागल्या आहेत, आणि चोर तर पकडले जात नाहींत, ह्यावरून चोरांना पोलिसाचें अंग आहे, असें वाटतें. (छ) कर्तृत्वाचे अधिष्ठान, ठिकाण. उ० त्याच्या अंगीं चित्रकलेचा गुण आहे. उ० हा दोष माझ्या अंगीं नाहीं, म्ह० माझ्याठायीं नाहीं. उ० अंगीं असेल तें काम, पदरी पडेल ती दाम, (ज) शरीरांत कांहीं बिघाड झाल्यामुळे आंतील आंतडीं वगैरे स्थानभ्रष्ट होऊन शरीराच्या कांहीं द्वारांनीं बाहेर डोकावूं लागतात, तीं. (झ) कौशल्य, चातुर्य, एकाद्या गोष्टीकडे मनाची विशेष प्रवृत्ति, म्ह० कल. उ० त्याला गाण्याचे अंग आहे. (ञ) मदत करणारा,त्याच्या बाजूने झटपट करणारा माणूस; वशीला. उ० दरबारात अंग असल्यावांचून कार्य सिद्धीस जात नाहीं.

(1) अंग झाकणें, किं० अंग लपविणें- एकाद्या कामाशी आपला कांहीं संबंध आहे, हें लोकांस न कळूं देणें.
(2) अंग झाडणें- नाकबूल करणें; अव्हेरणें.
(3) अंग टाकणें (क) रोडावणे. उ० आई मेल्यापासून त्या मुलानें अंग टाकलें आहे, (म्ह० हें मूल वाळत चाललें आहे). (ख) फार श्रम झाल्यामुळें, किंवा दमल्यामुळें, विश्रांतीसाठीं आडवें होणें. उ० आमच्या रामभाऊंची कचेरी फार लांब आहे. संध्याकाळीं ते घरीं येतांत, तेव्हां घटकाभर झोपाळ्यावर अंग टाकून पडतात, आणि मग हात पाय धुवावयास जातात.
(4) अंगाबाहेर टाकणें – एकादी गोष्ट किंवा कृत्य न पथकरणें; एकाद्या कृत्याशीं असलेला आपला संबंध तोडून टाकणें. उ० महाराजांची भेट घालून देण्यांत सदूभाऊंचा उपयोग होईल, अशी मला फार आशा होती. पण मी त्यांच्यापाशी ही गोष्ट काढतांच ती त्यांनीं अंगाबाहेर टाकली. (म्ह० महाराजांच्या भेटीचा योग घडवून आणण्याचे कामीं मी तुम्हांस मदत करणार नाहीं असें ते म्हणाले.)
(5) अंग दर्शविणें –एकाद्या कामाशी आपला कांही संबंध आहे, हे प्रकट करणे. उ० या कामीं महाराजांना तुम्ही आपलें अंग न दर्शविलें तर बरें असें मला वाटतें.
(6) अंग दाखविणें- एकाद्या कामीं आपलें कर्तृत्व किंवा चातुर्य गाजविणें.
(7) अंग धरणें – थंडीने अंग दुखणें. उ० तुम्ही अंगणांत निजूं नका; तुमचें अंग धरेल. [येथे “धरणें’ हे अकर्मक क्रियापद आहे.]
(8)अंग धरणें – लठ्ठ होणें. गुटगुटीत होणें. उ० ह्या मुलाला तुम्ही डोंगरे यांचें बालामृत द्या, म्हणजे तें अंग धरील. [ येथें “धरणें” हें सकर्मक क्रियापद.]
(9) अंग घेणें –लठ्ठ होणें.
(10)अंग मरणें – त्वचा बधिर होणें (पक्षघातादिकांमुळें). उ० त्याचें अंग मेलें आहे; त्याच्या उजव्या हाताला चिमटा घेऊन पहा, म्हणजें तुमची खात्री होईल.
(11)अंग मुरडणें – ऐटीनें हातवारे वगैरे करणें. दिमाख दाखविणें. उ० नवी साडी नेसून गोदी पहा कशी अंग मुरडीत आहे ती !
(12) अंग मोडून काम करणें – आपली सारी शक्ति, किं० करामत, खर्च करून एकादें काम करणें.
(13) अंग मोडून येणें – ताप यावयाच्या पूर्वीं गात्रें कसकसणें. उ० माझें अंग मोडून आलें आहे; लवकरच ताप भरेल असें वाटतें.
(14) अंग राखणें किंवा वांचविणें – कुचरपणानें काम करणें; उ० असा अंग राखून काम करूं नको ! बारा आणे मजुरी घेणार ती फुकटची आहे काय ?
(15) अंग सावरणें – (क) तोल संभाळणें; उ० केळ्याच्या सालीवरून माझा पाय घसरला, पण | मी मोठ्या शिताफीनें अंग सावरलें, म्हणून पडलों नाहीं ! (ख) पूर्व स्थितीवर येणें.
(16) अंगाखालीं पडणें – परिपाठाचा होणें.
(17) अंगाचा आंकडा होणें – पेटके वगैरेंच्या कारणानें गात्रें ताठ होणें, किंवा आंखडणें.
(18) अंगाचा आळापिळा करणें – (क) गात्रें पिळवटणें. (ख) एकाद्या कामीं असेल नसेल ती शक्ति खर्चिणें.
(19) अंगाचा खुर्दा होणें , (किं० करणे) – श्रमादिकांनीं अगदी थकून जाणें, (किं० थकविणें); एकसारखे धक्के बसून बसून गात्रें खिळखिळीं होऊन जाणें (किं० खिळखिळीत करणें). उ० खोडाळ्याची वाट किती खराब होती म्हणून सांगूं ! बैलगाडींत बसून माझ्या अंगाचा खुर्दा होऊन गेला ! उ० माझ्यापासून जरा दूर खेळ, मघापासून तूं माझ्या अंगाचा जसा खुर्दा करून सोडला आहेस !
(20) अंगाचा होरपळा होणें – तापानें किं० रागानें, अंग भाजत असणें.
(21) अंगाची चौघडी करणें – अंग चार वेळां दुमडणें, उ० डोंबाऱ्यांच्या कसरतींत लहान लहान पोरें अंगाची चौघडी करतात, ते माझ्याने पाहवत नाहीं !
(22)अंगाची लाही होणें (किं० करणें) – (क) अंग अतिशय तापणें (किं० तापविणें). अंगाचा भडका होणें.(किं० करणें). उ० उन्हाळ्याच्या दिवसांत बासुंदी फार खाली असतां अंगाची लाही होते. उ० आजच्या उन्हानें माझ्या अंगाची लाही करून सोडली आहे. (ख) क्रोधानें क्षुब्ध होणें,(किं० करणें), उ० माझ्या मुलानें तुमचा अपमान केला, हें ऐकून माझ्या अंगाची लाही झाली. उ० अपमानकारक भाषणानें त्याने माझ्या अंगाची लाही करून सोडली.
(23) अंगाची होळी होणें, (किं० करणें) – तापानें किं० क्रोधानें, अंग अतिशय तापणें, (किं० तापविणें), किं० संतप्त होणें, (किं० करणें).
(24) अंगाचें अंथरूण करणें – स्वताच्या शरीराची, किं० सुखाची, पर्वा न बाळगतां दुसऱ्याची सेवाचाकरी करणें. उ० त्याला नोकरी लावून द्यावी म्हणून मीं अंगाचें अंथरूण केलें, पण तो है उपकार स्मरत नाहीं !
(25) अंगाचें अंथरूण होणें –ताप वगैरे आजारानें अशक्त होऊन अंथरुणाला खिळून राहणें.
(26) अंगाचें कातडे काढून जोडा शिवणें – एकाद्या माणसासाठीं पराकाष्ठेची झीज सोसणें. उ० मी आपल्या अंगाचें कातडें काढून तुझ्या पायांत जोडा शिवून घातला, तरी तुझे उपकार फिटणार नाहींत!
(27) एकाद्याच्या अंगाचे धुडके उडविणें, किं० चकदे काढणें, किं० अंगाचीं चकंदळें काढणें – त्याला खूप मारणें, किं० झोडपणें.
(28) अंगाचा तिळपापड होणें –रागानें बेफाम होणें.
(29) अंगाचें पाणी होणें- एकाद्या कामीं फार कष्ट, वास, पीडा, होणें.
(30) अंगाचें पाणी करणें – या कामी फार मेहनत करणें, कष्ट सोसणें, किं० तसदी घेणें. उ० तुझ्यासाठीं मीं आपल्या अंगाचें पाणी केलें आणि तुला तर त्याचे कांहींच उपकार वाटत नाहींत !
(31)अंगाबाहेर टाकणें, किं० अंगानिराळें करणें –एकादें काम न पथकरणें; एकाद्या कामाशीं असलेला संबंध तोडणें.
(32)अंगानें, अंगीं, किं० अंगें – स्वतः उ० कोणतेंही काम अंगानें केल्यास चांगलें होतें.
(33)अंगाला, (किं० अंगांत) बसणें, किं० अंगाला येणें –अंगाला ठीक, बेताचें होणें, किं० अंगांत घालावयाला पुरेसा मोठा असणें. उ० ही बंडी माझ्या अंगाला चांगलीशी बसत नाहीं. उ० हा अंगरखा माझ्या अंगाला येत नाहीं. (म्ह० मला नीटसा पुरत नाहीं).
(34)अंगाबरोबर होणें, किं० असणें – अंकाला पुरण्याइतका. म्ह० कमी नाही आणि जास्तीही नाही, असा असणे. उ० हा सदरा मला अगदीं अंगाबरोबर होतो, (म्ह० अगदीं ठीक होतो)
(35)अंगावर – स्वतः, म्ह० दुसऱ्याच्या मदतीची, संमतीची, किं० अनुकूलतेची वाट न पाहतां, किं० पर्वा न बाळगतां उ० साऱ्याचे रुपये भी अंगावर भरले.
(36)अंगावर येणें, (किं० कोसळणें), किं० अंगाशीं येणें – एकादें काम फिसकटून त्याबद्दलची अडचण सोसावी लागणें. उ० ती मसलत माझ्या अंगाशीं आली.
(37)अंगावर घेऊन – आपलें असे समजून, प्रेमपूर्वक; जबाबदारी शिरावर वाहून; मनापासून. उ० आम्ही या गांवीं परकी आहों; आपणच हें लग्नाचें कार्य अंगावर घेऊन पार पाडलें पाहिजे !
(38) अंगावर घेणें – पथकरणें. उ० तो लक्ष्मणराव कृतघ्न मनुष्य आहे. त्याचें काम तूं कशाला अंगावर घेतोस ?
(39)एकाद्याच्या अंगावर तुटून पडणें –त्याच्यावर निकरानें हल्ला करणें. उ० लाटणें बोरगांवच्या रानांत ते चोर आमच्या अंगावर तुटून पडले.
(40)अंगावर येणें किं० जाणें – एखाद्यावर हल्ला करावयास धावून येणें किं० जाणें. उ० ते चोर कुऱ्हाडी घेऊन आमच्या अंगावर आले.
(41)अंगावर येणें – एकाद्याला रागें भरू लागणें; एकाद्यावर ताशेरा झाडावयास सरसावणें. उ० मी त्याच्या बुकाला नुसता हात लावला, तों तो माझ्या अंगावर आला!
(42)अंगावर पडणें – (क) अप्रिय, किं० गैरसोयीची किं० महागाईची किं० मनाजोगी नसलेली, जिन्नस पथकरावी लागणें. उ० आंबेमोहोर म्हणन मी हे तांदूळ विकत आणिले. ते निघाले कमोदाचे;कमोद आमच्या यजमानांच्या माणसांना मुळीच चालत नाहींत. त्यामुळें हें पल्लाभर तांदूळ माझ्या अंगावर पडले. (ख) एकाद्याला करावें लागणें, किं० निस्तरावें लागणें, उ० जेवण आटोपतांच सर्व बायका घरोघर निघून गेल्या; तेव्हां उष्टीखरकटीं, शेणपाणी, हीं कामें माझ्या एकटीच्या अंगावर पडलीं. (ग) एकाद्यावर ताशेरा झाडणें.
(43)अंगावर शेकणें – हानिकारक होणें. उ० हा व्यापार तुमच्या अंगावर शेकेल, (म्ह० ह्या व्यापारांत तुम्हांस बूड लागेल). पुढे “समिध शेकणे,” हा वाक्प्रचार पहा.
(44)अंगावरचें मूल – आईच्या अंगावरचें दूध पिण्याइतकें लहान मूल.
(45)अंगावरचें मूल तोडणें – मुलाचें स्तनपान बंद करून त्याला वरचें दूध, किंवा अन्न (भात वगैरे) देऊं लागणें. उ० रामाला अंगावरचा तोडावयाला मला भारी प्रयास पडले.
(46)अंगावरून वारा जाणें –अर्धांगवायूनें आजारी पडणें, पक्षाघाताचा रोग होणें. उ० गजाननभाऊंच्या डाव्या अंगावरून वारा गेला आहे.
(47)अंगाला कुयले लागणें – मत्सराने व्याकुळ होणें, अंगाचा चरफडाट होणें. उ० मला बढती मिळाली, तेव्हां गोंद्याच्या अंगाला कुयले लागले!
(48)अंगास येणें, किं० अंगीं, येणें – नुकसानीची बाब होणें; उ० चिंचेचा व्यापार हरिभाऊंच्या अंगास आला.
(49)अंगास (किं० अंगीं) लागणें – (क) फलद्रूप होणे; लाभप्रद, हितकारक, होणे. उ० तें रोज अर्धा तास व्यायाम केलास, तर हें पितोस तें दूध तुझ्या अंगास लागेल. (ख) एकाद्यावर शाबीत होणें. उ० हा खून मारुत्याच्या अंगीं लागावयाचा नाहीं. (ग) सोसावे लागणें; उ० हें नुकसान उगीचच्या उगीच माझ्या अंगास लागलें.
(50) अंगीं असणें – ठायीं असणें. उ० आल्याच्या अंगीं पित्त शमविण्याचा गुण आहे. उ० त्याच्या अंगी गायनाची कला आहे. उ० त्याच्या अंगीं विनय नाहीं. उ० लोहचुंबकाच्या अंगीं लोखंड आकर्षिण्याचा गुण असतो. उ० अंगीं असेल तो जाणें खाणाखुणा.
(51) अंगीं आणणें – (क) बिंबवून घेणें, साध्य करून घेणें, शिकणें. उ० वक्तशीरपणा अंगीं आणण्याचा प्रयत्न करा. (ख) प्रसंगापुरतें अवलंबिणें. उ० नुसतें शौर्य अंगीं आणून त्यानें मजवर हल्ला केला
(52) अंगाची सावली करणें – आपल्या संरक्षणाखालीं एकाद्याला घेणें. उ० साधु पुरुष आपल्या अंगाची सावली करून दीनाचें रक्षण करतो.
(53) अंगीं जिरणें – एकादी खोडी. व्यसन, लकब, जडणें. उ० रामभाऊला वेडावून दाखवितां दाखवितां बोबडे बोलण्याची खोडी शिवरामाच्या अंगीं जिरली.
(54) अंगीं ताठा भरणें – मगरूरी येणें; उ० विष्णूपंताला हेडक्लार्क्‌ची जागा मिळाल्यापासून त्याच्या अंगीं भारी ताठा भरला आहे.
(55) अंग तुटणें – रोड होणें. उ० आई मेल्यापासून तें मूल फार फार अंगीं तुटलें
(56) अंगा नसणें – अवगत नसणें; उ० म्हशीचें दूध काढणें माझ्या अंगीं नाहीं.
(57) अंगीं फुटणें – लठ्ठ होणें; जाडी होणें. उ० माणकोबानें मलईचा खुराक सुरूं केल्यापासून तो खूप अंगीं फुटला आहे.
(58) अंगीं भिनणें – जडणें उ० नाऱ्याची संगति लागल्यापासून गोंद्याच्या अंगीं टवाळकी भिनली.
(59) अंगीमाशीं भरणें, किं० अंगीं भरणें – लठ्ठ, गुटगुटीत होणें, उ० द्वारकानाथ तालीम करूं लागल्यापासून अंगींमाशीं भरत चालला आहे.
(60) अंगीं (किं० अंगाला) मिरच्या लागणें, (किं० झोंबणें) – चरफडाट होणें. उ० दुकानदारानें मला कापड स्वस्त्या दरानें दिलें, म्हणून तुझ्या अंगीं कां मिरच्या झोंबल्या? उ० हेडमास्तरनें माझें काम दोन तास कमी केलें, म्हणून इतरांच्या अंगाला मिरच्या लागल्या.
(61) अंगीं मुरणें – पुरतेपणीं न फुटणें, उगवणें, पिकणें किं० बाहेर पडणें, पुरतेपणी बरा न होणें. उ० तुमच्या बाबूला केळें खायला द्या, म्हणजे कांजिण्या त्याच्या अंगीं मुरणार नाहींत. उ० योग्य उपचार न झाल्या कारणानें त्या मुलीच्या अंगीं ताप मुरला. आपल्या अंगीं, अगें, किं० अंगानें स्वतः आपल्या अंगीं बिऱ्हाड देणें दुर्व्यसनाला आपल्या ठायीं थारा देणें. उ० मगरूरीला आपल्या अंगीं बिऱ्हाड देऊं नको.
(62) एका अंगावर असणें किं० होणें – एका बाजूस राहाणें

(63) अंग वोढविणें – स्वतःला पुढें लोटणें उ० आपुलंच अंग तुम्हीं वोढविलें । त्याचे निवारिलें महादुःख ॥
(64)अंग काढणे किं० अंग काढून घेणे –एकाद्या कामाशीं असलेला आपला संबंध तोडणें; एकाद्या कामांतून बाहेर पडणें. उ० नारायणरावांची मसलत परिणामीं हितकर नसल्यामुळे तिच्यांतून मीं आपलें अंग काढून घेतलें.
(65)अंग घालणें- मदत करणे उ० आमच्या कामांत तूं अंग घातल्यानें आमची फार सोय होईल (म्ह० आम्हाला तू मदत केलीस तर, इत्यादि).
(66)अंग चोरणें – (क) कुचरपणानें काम करणें. उ० तो मजूर मला आवडत नाहीं, कारण तो नेहेमीं अंग चोरून काम करीत असतो. (ख) कसला तरी तडाखा चुकविण्यासाठी शरीराचा विशिष्ट भाग आकुंचित करणे किंवा दूर सारणे; उ० मीं त्या माकडाच्या बरगड्यांवर नेम धरून धोंडा मारला, पण त्यानें आपली जागा न सोडतां अंग चोरून धोंड्याचा मार चुकविला. (ग) शरीर किंवा शरीराचा कोणताही भाग आकुंचित करणें. उ० पिंजऱ्याचे दार अर्धवट उघडें राहिलें होतें, त्याच्या फटींतून पोपट अंग चोरून बाहेर पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow by Email
error: Content is protected !!