अंगाई करणें, अग्निकाष्ठें भक्षण करणें, अटकेस झेंडा मिरविणें किंवा लावणें, एकाद्याचीं अंडींपिल्लीं बाहेर काढणें

१. अंगाई करणें – मुलाला निजवितांना आया जें गाणें म्हणतात, त्याच्या आरंभीं ‘अंगाई’ हा शब्द आहे; यावरून ‘अंगाई करणें’ म्हणजे निजणें किंवा निजविणें. मोठ्या माणसांच्या संबंधानें हा वाक्प्रचार विनोदानें योजण्यांत येतो.

२. अग्निकाष्ठें भक्षण करणें – अग्नींत प्रवेश करणें; स्वतःस जाळून घेणें. उदा. छत्रपति शिवाजी महाराजांची एक बायको मोहित्यांची कन्या पुतळाबाई, हिनें पतिदहनसमयीं अग्निकाष्ठें भक्षण केलीं.

३. अटकेस झेंडा मिरविणें, किंवा लावणें – सिंधु नदीच्या एका फाट्याचें नांव अटक असें आहे. ही नदी हिंदुस्तान आणि अफगाणिस्तान यांच्या सरहद्दीवर आहे. मऱ्हाठे वीरांची महत्त्वाकांक्षा अटकेपर्यंत राज्य काबीज करून तेथें आपले झेंडे, (म्ह० स्वामित्वाचीं निशाणें), उभारण्याची होती. यावरून “अटकेस झेंडा लावणें,” वगैरे शब्दसंहतींचा उपयोग शतकृत्य करणें, लोकोत्तर असें कांहीं तरी कृत्य करणें, ह्या अर्थानें होतो. [ह्या उपयोगांत निंदा गर्भित असतें].

४. एकाद्याचीं अंडींपिल्लीं बाहेर काढणें – काळजीपूर्वक लपवून ठेवलेलीं त्याचीं रहस्यें, किंवा लाजिरवाण्या गुप्त गोष्टी, उघडकीस आणणें. [पक्षी आपलीं अंडीं आणि पिलें आपल्या घरट्यांत खोल लपवून ठेवतात].

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow by Email
error: Content is protected !!