मिशा – या शब्दाचे अर्थ – (क) पुरुषांच्या वरच्या ओठावरील केशांची पंक्ति. (ख) मांजराच्या, झुरळाच्या, तोंडावरचे लांब लांब केश.
1. एकाद्याच्या मिशा खालावणें – त्याची फजीती होणें, त्याचा नक्षा, तोरा, उतरणें. [येथे “खालावणें” हे अकर्मक क्रियापद].
2. एकाद्याच्या मिशा खालाविणें – त्याची फजीती करणें; त्याचा तोरा कमी करणें.
3. एकाद्याच्या मिशा भादरणें, किंवा मिशी भादरणें, किंवा उतरणें – त्याची बेआबरू, फजीती, करणें.
4. मिशांवर किंवा मिशीवर ताव देणें; मिशा पाजविणें; मिशांना, किंवा मिशीला, पीळ भरणें – तिरस्कारानें, किंवा सूढ घेण्याच्या इराद्यानें, किंवा रागानें, मिशा वळविणें.
5. मिशांना तूप लावणें – डाममौल करणें; नसत्या श्रीमंतीचा आविर्भाव करणें. उ० त्याला वेळेला खावयाच्या अन्नाची मुष्कील आहे, पण मिशांना तूप लावून हिंडतो !
6. मिशी उतरून देईन ! – एकादी गोष्ट ठासून सांगावयाची असतां म्हणतात. उ० मी म्हणतों तें खोटें ठरलें, तर मिशी उतरून देईन !