मूठ – या शब्दाचे अर्थ (क) हाताचीं बोटें तळहातावर वळवून टेकिलीं असतां हाताच्या पंजाचा जो आकार होतो तो. (ख) वरच्याप्रमाणें मूठ मिटली असतां तिच्यांत ज्या परिमाणाचा पदार्थ राहूं शकेल तें परिमाण, किंवा मुठींत जितका पदार्थ राहूं शकेल तितका पदार्थ (धान्य वगैरे). उ० भाताच्या रोपांची मूठ, कोथिंबिरीची मूठ, इ० (ग) मंत्रानें भारून शत्रूवर फेकण्यासाठीं हाताच्या मुठींत घेतलेले उडीद वगैरे पदार्थ. (घ) हत्ती, घोडा, वगैरे जनावरांच्या रोजच्या अन्नांतून त्यांच्या रखवालदारास द्यावयाचा जो मुठीच्या परिमाणाचा भाग तो. (ङ) मुठीनें पेरलेले भात. उ० यंदाची मूठ चांगली लागली. (च) घोड्याच्या पायाच्या खुराला लागून जो सांधा असतो तो. [ह्या सांध्याशीं घोड्याचा पाय लहान घेराचा असल्यामुळें येथें बांधलेली दोरी खालीं, किंवा वर, सरकत नाहीं]
- एका मुठीचीं माणसें – एकाच कायद्याखालीं, किंवा हुकमतीखालीं, येणारीं माणसें.
- एका मुठीनें – एकदम, किंवा एकाच हप्त्यानें. उदा. उसने घेतलेले माझे पंचवीस रुपये मला देशील ते एका मुठीनें परत दे; (म्हणजे आज आठ आणे, उद्या एक रुपया, आणखी चार दिवसांनीं बारा आणे, असे पिचीपिची देऊं नको; एकदम सबंध पंचवीस रुपये दे). उदा. त्यानें शंभर रुपये एका मुठीनें उधळले; (म्हणजे एकाच वेळीं, एकाच खेपेला).
- झाकल्या मुठीनें -गुप्तपणें; आपल्याविषयीं कोणास कांहीं मागमूस न लागूं देतां.
- मूठ आवळणें – चिक्कूपणा करणें, किंवा करूं लागणें.
- मूठ दाबणें, चेपणें, किंवा गार करणें – लाचाची रक्कम मुठींत, किंवा हातांत, देणें; लांच देणें. उदा. त्यानें पन्नास रुपयांनीं फौजदाराची मूठ दाबिली, तेव्हां तो सुटला.
- मुठींत असणें -पूर्ण कह्यांत, ताब्यांत, असणें. उदा. नारायणराव पूर्णपणें त्या सावकाराच्या मुठींत आहे. म्हणून तुम्ही नारायणरावास वळविण्यासाठीं त्या सावकाराशीं संधान बांधा.
- मृत मनुष्याला मुठमाती देणें – त्याला पुरणें.