“डोकें”

डोकें(क) मस्तक, शिर.उ० घाल डोक्याला पागोटें, आणि चल लवकर माझ्याबरोबर !
 (ख) एक व्यक्ति. उ० घारापुरीची लेणीं पाहावयाचीं असलीं, तर दर डोक्याला चार चार आणे फी द्यावी लागते.
  उ० झिजिया कर दर दिंदू डोक्यावर घेतला जात असे.
 (ग) पिढी.उ० ह्या गांवांत माझ्यासकट आमच्या पांच डोया, (म्ह० डोकी), झाल्या, (म्ह० या गांवांत आमचें पांच पिढ्यांचें वास्तव्य आहे).
  उ० देव कराया दोन डोया, किडवळ कराया तीन डोया. (पुढे म्हणीचे प्रकरण पहा).
 
बुद्धि; मति; सारासार विचार करण्याची शक्ति; लक्ष्य; मेंदू.
  उ० गणितांत तात्याचें डोकें अगदी चालत नाहीं.
  उ० मारत्याचें डोकें बिघडलें आहे.
 (इ) कोणत्याही वस्तूचा शिरोभाग.उ० काठीचे डोकें; मुसळाचें डोकें.
डोकें उचलणेंनांवालौकिकास चढणें. 
डोकें उठणें(क) डोकें दुखूं लागणें,उ० तुझी ही चर्पटपंजरी आतां बंद कर, माझें डोकें उठलें !
 (ख) त्रास, उपद्रव, होणें. 
डोकें काढणेंउदयास, किं० वैभवास, चढण्याच्या मार्गाला लागणें.उ० आमच्या वडील चिरंजीवांनीं विद्याबिद्या कधीच सोडून दिली, आणि ते सुखवस्तु होऊन राहिले; मधलेही त्यांच्याच वळणावर जातात कीं काय अशी भीति होती, परंतु अलीकडे त्यांनी डोकें काढिलें आहे !
 डोकें खाजविणें (क) उपद्रव देणें; त्रास देणें.उ० तूं जा येथून ! उगीच माझें डोके खाजवीत बंसू नको !
 (ख) विचार साफ व स्पष्ट करण्यासाठीं डोकें चोळणें.उ० अभ्यास करावयाच्या वेळीं तूं खेळलास ! आतां डोके खाजवून तुला या प्रश्नांचीं उत्तरें कशीं देतां येतील ?
डोकें टेकणें(क) अवलंबून राहणें; भिस्त ठेवणें; आश्रयाची अपेक्षा, किं० इच्छा, बाळगून असणें.उ० तुला मी दोन वेळां नोकरी लावून दिली आणि दोन्ही वेळां तूं ती आपल्या गुणांनीं गमावून घेतलीस. यापुढें तूं माझ्यावर डोकें टेकून बसूं नको
  (ख) हार खाल्ली असें म्हणणें; निराशेनें सोडून देणें;आपला इलाज चालत नाहीं, असें कबूल करणें. 
 (ग) अशक्त होणें; थकणें; खचणें; आजारी पडणें.उ० इतके दिवस त्यांनीं कसें बसें काम केलें, पण मागल्या सोमवारपासून त्यांनीं डोके टेकलें, (‘ म्ह० काम करण्याची त्यांच्या अंगीं ताकद राहिली नाहीं.).
डोकें देणें, डोकें देऊन बसणें(क) लोचटपणा, चिकटपणा, करीत बसणें; निर्लज्जपणानें एकाद्यावर भार घालून बसणें,किं० राहणें,उ०परीक्षेसाठीं तो माझ्या घरीं पाहुणा म्हणून आला; परक्षिा संपून आठ दिवस झालें ! अझून डोकें देऊन बसला आहे !
 (ख) एकाद्याला लुबाडून पुन्हां शांत, बिनदर्द, असणें. 
डोकें फिरणेंवेडें होणें, रागानें वगैरे बेफाम होऊन जाणें.उ० जगाची हरामखोरी पाहून त्याचें डोके फिरून गेलें आहे, (म्ह० तो वेडा झाला आहे).
 डोकें मारणें(क) शिरच्छेद करणें.उ० रामावर कां तुझा राग? त्यानें
काय तुझें डोकें मारलें आहे ?
 (ख) नुकसान करणें. नाश करणें. 
डोकें हालविणें(क) संमति दर्शविण्यासाठीं, किंवा अनुमोदन देण्यासाठीं, मान हालविणें. 
 (ख) वेडाच्या लहरींत, किं० अंगांत आल्यामुळें, डोके जोराने इकडून तिकडे फिरविणें. 
डोक्याचे केस नाहींसे करणें, डोक्यावर केस राहूं न देणेंशिव्या देणें; फजीती करणें; निर्भत्सना करणें; रागें भरणें.उ० आम्हीं श्रीमंतपूजनाचे वेळीं सबंध सुपाऱ्या दिल्या नाहींत म्हणून ह्या लोकांनीं आमच्या डोक्यावर केस राहूं दिला नाहीं.
  टीप-हजामत करणें ह्याचा यौगिक अर्थ डोक्यावरचे केस काढून टाकणें आणि लाक्षाणिक अर्थ फजीती करणें, किं० निर्भत्सणें. यावरून लाक्षणिक अर्थ दाखविण्यासाठीं यौगिक अर्थाची क्रिया ह्या वाक्प्रचारांत योजण्यांत आलेली आहे.
डोक्यावरचें खांद्यावर येणेंचिंता, किं० काळजी, कमी होणें.
 उ० माझ्या मुलाचें लग्न उरकलें. आतां डोक्यावरचें खांद्यावर आलें !
डोक्यानें चालणें  गर्वानें, अभिमानानें, ताठ्यानें वागणें. उ० सासऱ्याची दौलत मिळाल्यापासून रामभाऊ डोक्याने चालूं लागला आहे.
   उ० नारायणरावाला बढती मिळाल्यापासून तो जसा डोक्यानें चालूं लागला आहे !
डोक्यानें चालत येणेंनम्रपणाने येणें; आपल्या आपण येणें.उ० त्या पोराला जेवायाला येण्यासाठीं कशाला इतक्या हाका मारतोस ? अमळ रान चरचरलें म्हणजे पोर डोक्याने चालत येईल ! (म्ह० आपसुक येईल !)
डोक्यावर खापर फोडणेंएकाद्याच्या माथीं दोष लादणें, (तो निरपराधी असतां)उ० तुमचा मुलगा नापास झाला तो आपल्या गुणांनी झाला ! मी शिकविण्यांत कांहीं कसूर केली नाहीं.माझ्या डोक्यावर तुम्ही उगीच खापर फोडूं नका.
डोक्यावर खापर फुटणें एकाद्यावर एकाद्या गोष्टी बद्दल विनाकारण दोष येणें.उ० आमचे व्याही म्हातारे आणि दमेकरी होते. सृष्टिक्रमाप्रमाणेंच त्यांचा अंत झाला;परंतु त्याचें खापर आमच्या मुलीच्या डोक्यावर फुटलें !
एकादें काम डोक्यावर घेणें(क) ते पथकरणें; त्याची जबाबदारी घेणें. उ० दत्तूचें लग्न जुळवून देण्याचें काम तूं कशाला आपल्या डोक्यावर घेतोस ?
 (ख) शाळा, वर्ग, घर, वगैरे डोक्यावर घेणें म्ह० त्यांत अव्यवस्था, गोंधळ, धिंगामस्ती, करणें किंवा चालविणें.उ० मी क्याटलॉग द्यावयाला जरासा आफीसांत गेलों होतों तों पोरांनीं वर्ग डोक्यावर घेतला.
   उ० मी काशीआक्काच्या घरीं दोन चटका बसावयाला गेलें होतें तौं मागें पोरांनी घर डोक्यावर घेतले!
डोक्यावर चढणेंएकाद्याला न जुमानणेंउ० तुम्ही मुलाचे इतके लाड करूं नका. तो डोक्यावर चढेल !
डोक्यावर सूर्य येणेंमध्यन्ह होणें.उ० आतां येथेंच मुक्काम करावा, पोलीस जाणें शक्य नाहीं. हा सूर्य अगदीं डोक्यावर आला आहे पहा ?
डोक्यावर पदर येणेंवैधव्यः येणें. 
एकाद्याच्या डोक्यावर बसणें(क) त्याला न जुमानणें.उ० मुलावर वचक बसविण्याचा प्रयत्न करा;  नाहीं तर तीं तुमच्या डोक्यावर बसतील.
 (ख) आपली लायकी नसतां त्याच्या वर जाणें, किं० पुढें सरणें, किं० अगोदर बढती मिळविणें.उ० वरिष्टाची लाळ घोटण्याचें कसब गोविंदरावाच्या अंगीं चांगलें आहें. म्हणून तो माझ्या डोक्यावर बसला.
डोक्यावर बसविणें(क) वाजवीपेक्षां अधिक मान देणें; एकाद्याचें फाजील गौरव करणें.उ० नोकर लोकांना तुम्ही असें डोक्यावर बसवूं लागला तर ते माझी अवज्ञा करतील !
 (ख) एकाद्याला भक्तिभावानें भजणें. 
एकाद्याच्या डोक्यावर मिरे वाटणेंत्याला शिव्या देणें; दोष देणें; त्याच्यावर टपका ठेवणें.उ० आईबाप आधी मुलीचे लाड करतात, तिला चांगलें वळण लावीत नाहींत. पुढे ती मुलगी वाईट रीतीनें वागूं लागली म्हणजे विनाकारण सासूच्या डोक्यावर मिरे वाटतात.
डोक्यावर शेकणेंपरिणाम भोगावा लागणें; नुकसान होणें.उ० फळफळावळीचा व्यापार आजकाल भारी धोक्याचा झाला आहे त्यांत तुम्हीं भांडवल घालूं नका ! तो व्यापार खचित तुमच्या डोक्यावर शेकेल ! [पुढे “समिध शेकणें” हा वाक्प्रचार पहा ].
डोक्यावर हात घेऊन येणेंरिकाम्या हातानें येणें; इष्ट वस्तु न मिळवितां तसेंच येणें.उ० तुला मोदकपात्र आणावयाला मी पाठविलें आणि तूं तर डोक्यावर हात घेऊन परत आलास ! (म्ह० मोदकपात्र न आणतां तसाच आलास)
डोक्यावर हात ठेवणें(क) आशीर्वाद देणें. 
 (ख) फसविणें.उ० तूं त्या लोकांच्या नादीं लागूं नको; ते बदमाष तुझ्या डोक्यावर हात ठेवितील !
 एकाद्याच्या डोक्यावरून हात फिरविणेंत्याला फसविणें. उ० एकनाथपंतांनीं आपली चीजवस्त आपल्या मेहुण्यापाशीं ठेवावयास दिलीं होती. मेहुण्यानें ती सारी बळकावली, आणि एकनाथपंताच्या डोक्यावरून चांगला हात फिरविला !
डोक्यावरून पाणी जाणें (क) परमावधि किं० शिकस्त होणें.उ० हें रानड्यांचें स्थळ तुमच्या मुलीला योग्य आहे. तुमचा खर्च फार होणार नाहीं. पांचशें रूपयांत सारें कार्य उरकेल! डोक्यावरून पाणी गेलें तर आणखी पन्नास रुपये लागतील!
 (ख) असह्य नुकसानी किंवा संकट आल्यानें अगदीं लाचार होणें, किं० निस्त्राण होणें.उ०  आम्हासारख्याला शंभर रुपयांची ठोकर लागणें म्हणजे डोक्यावरून पाणी गेलें म्हणावयाचें !
   [ ज्या मनुष्याला मुळीच पोहता येत नाहीं तो गळ्याइतक्या पाण्यांत उभा राहून जिवंत राहूं शकतो, परंतु डोकें बुडून जाण्याइतक्या खोल पाण्यांत तो पडला असतां तो मरणारच. ह्या उपमेवरून वरील दोन्हीं वाक्प्रचार रूढ झालेले आहेत].
 डोक्यास पाणी लावून ठेवणेंशिक्षा भोगावयास तयार होऊन राहणें. [ न्हावी डोईचे केस तासावयाच्या आधीं डोक्याला पाणी लावतो. हजामत करणे म्ह० फजीती किं० निर्भर्त्सना करणें ]. 
डोक्यांत राख घालणें किं० घालून घेणेंसंतापणें. चरफडणें. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *