पाठ | (क) छातीच्या आणि पोटाच्या मागचा शरीराचा भाग; (मानेपासून ती कंबरेपर्यंत). | |
(ख) कोणत्याही वस्तूची मागली बाजू. | उ० आरशाची पाठ; पुस्तकाची पाठ; तसबिरीची पाठ. | |
(ग) आश्रय, टेका, मदत, साहाय्य; (अनुरूप क्रियापद ‘देणें’). | ||
(घ) पृष्ठभाग, पातळी. | उ० पृथ्वीची पाठ; समुद्राची पाठ. | |
(ङ) बाहेरचें आच्छादन; साल; कवच. | ||
पाठीवर मारावें, पण पोटावर मारूं नये | कोणी अपराध केला असतां त्याला बेलाशक शिक्षा करावी, परंतु त्याची कायमची नुकसानी होईल, असें कांहीं करूं नये; त्याचीं चरितार्थाचीं साधनें बुडवूं नयेत. | |
आपली पाठ आपणास दिसत नाहीं | एकादी गोष्ट अगदीं आपल्या शेजारीं घडत असते, पण आपणास तिची गंधवार्ता नसते. | |
पाठचें भावंड | मागून झालेलें भांवड. | उ० रामाच्या पाठचीं तिन्हीं भावंडें मेलीं. |
पोटचा द्यावा, पण पाठचा देऊं नये | प्रत्यक्ष आपलें मूलही सोडावें, पण आश्रयास आलेल्या माणसास सोडूं नये. [येथें “पाठचा” ह्याचा उपयोग “धाकटा भाऊ” ह्या अर्थानेंही करतात]. | |
एकाद्याची पाठ उघडी पडणें | त्याच्या पाठचें भावंड मरणें. | |
पाठ उचलणें | सावरणें; पुन्हां वैभवास चढणें; गमावलेली शक्ति, सामर्थ्य, तेज, पुन्हां मिळविणें. | |
पाठ भुईस लागणें | चीत होणें; एकाद्या संकटाखालीं दडपून जाणें; वैभव किं० सामर्थ्य गमावणें. | |
पाठ कापणें | पाठ थरथर कापूं लागणें. | उ० कुऱ्हाड हातीं घेऊन आलेल्या त्या भामट्यास पाहतांच माझी पाठ कापूं लागली! |
एकाद्याची पाठ घेणें किं० पुरविणें | (क) त्याचा पिच्छा पुरविणें; एकाद्या गोष्टीबद्दल एकाद्यावर ओझें घालून राहणें. अमुक एक वस्तु मला द्या म्हणून एखाद्यास सतावीत असणें. | उ० माझ्या मुलींनें जिनगरी बाहुलीबद्दल आज आठ दिवस माझी पाठ घेतली आहे; (म्ह० बाहुली घेऊन द्या म्हणून ती मला तगादा लावीत आहे). |
(ख) एकाद्याच्या पाठोपाठ जाणें, किंवा त्याचा पाठलाग करणें. | उ० त्या चोरांनीं दोन कोश आमची पाठ घेतली; (म्ह० ते आमच्या मागोमाग येत होते). | |
पाठ चोरणें | (क) कांहीं काम करतांना कुचरपणा करणें. | |
(ख) आपल्या पाठीवर फार सामान, किं० ओझें, लादलें जाऊं नये, म्हणून तें चुकविण्याचा किं० झुगारून देण्याचा प्रयत्न करणें; (बैल, घोडा, गाढव, वगैरे संबंधानें). | ||
त्यानें अमक्याची पाठ झाकली | तो अमक्याच्या पाठीमागून झाला, किं० जन्मला. | |
पाठ टाकणें | विश्रांतीसाठीं अंग आडवें करणें (जमिनीवर किं० बिछान्यावर). | उ० मी अगदीं दमून गेलों होतों, म्हणून जरा वेळ झोंपळ्यावर पाठ टाकली. |
पाठ थापटणें किं० थोपटणें | उत्तेजनार्थ पाठीवर प्रेमानें हात मारणें. वाहवा करणें. | उ० मी त्याच्या तर्फेनें भांडलों, म्हणून त्यानें माझी पाठ थोपटली. |
पाठ दाखविणें | पळून जाणें; कर्तबगारी न दाखवितां भित्रेपणानें निघून जाणें. | उ० ह्या लढाईंत आम्ही मारूं, किं० मरूं; शत्रूला पाठ म्हणून दाखविणार नाहीं ! |
पाठ देणें | (क) एकाद्याला एकाद्या (चांगल्या, किं० वाईट) कामीं मदत करणें. | उ० तूं मला पाठ दिलीस, तर हें काम तडीस जाईल ! |
(ख) एकाद्याची विनंति ऐकिली न ऐकिली, अशा रीतीनें वागणे. | उ० त्यानें माझ्या शब्दाला पाठ दिली. | |
(ग) एकाद्या वस्तूचा परित्याग करून जाणें. | ||
पाठ धरणें | एकाद्याच्या मागून जाऊन त्याला पकडणें. | उ० तो चोर निसटून जात होता, पण मी त्याची पाठ धरली. |
पाठ पोट सारखें होणें | उपासानें, किं० आजारानें, अत्यंत रोड होणें. | उ० पहा त्याची पाठपोट सारखा झाली आहे! |
एकाद्याची पाठ फोडून निघणें | त्याच्या मागून त्याची बहीण, किं० भाऊ, जन्मणें. | उ० अंबी माझी पाठ फोडून निघाली; (म्ह० माझी बहीण अंबी माझ्यानंतर जन्मास आली!) |
पाठ भुईस लागणें | द्रव्याकडून, किं० शक्तीकडून, खालावणें. | उ० माझी पाठ अगदीं भुईस लागलीं आहे; (म्ह० मजजवळ पैसा मुळीच राहिला नाहीं; किंवा मी आजारानें अशक्त होऊन गेलों आहे). |
एकाद्याची पाठ राखणें | त्याला मदत करणें. | उ० ह्या विपत्तींत गंगाधरपंतांनीं माझी पाठ राखली; (म्ह० मला द्रव्यादिकानें मदत केली). |
पाठ सोडणें | (क) एकादा व्यवसाय नेटानें चालविण्याचे सोडून देणें. | उ० तुला पहिल्या पहिल्यानें हिंदी भाषा कठिण वाटेल; पण तूं तिची पाठ सोडूं नको; (म्ह० तुझी मेहनत चालूं ठेव). |
(ख) एकाद्याच्या मागोमाग जावयाचा क्रम सोडून देणें. | उ० त्या मुलीनें साऱ्या दिवसांत माझी पाठ म्हणून अगदीं सोडली नाहीं; (म्ह० ती एकसारखी माझ्या पाठीशी होती). | |
एकाद्याच्या पाठीं | त्यावर अवलंबून; त्याच्या परिवारांत; त्याच्या आश्रितांत; त्याच्या नंतर, किं० मागोमाग. | उ० माझ्या पाठीं, किं० पाठीशीं, चार पोरें आहेत; (म्ह० त्यांना पोसण्याची जबाबदारी मजवर आहे). |
उ० माझ्या पाठीं नेहमीं चार पट्टेवाले असतात; (म्ह० माझ्या खिजमतीला). | ||
उ० नानासाहेबांच्या पाठीं कांहीं थोडीं-थोडकीं माणसें नाहींत; वेळेस पंक्तीला पंचवीस पान जेवतें आहे! (म्ह० त्यांचे आश्रित पंचवीस आहेत!) | ||
उ० चोरांनो, मला मुकाट्यानें जाऊं द्या. माझ्या पाठीं दोन मैलांवर दहा वाटसरू आहेत; (म्ह० ते माझ्या मागोमाग, माझ्याच मार्गानें, येत आहेत). | ||
उ० माझ्या पाठीं हा सावकारीचा धंदा माझा मावसभाऊ पाहणार आहे; (म्ह० मी मेल्यावर). | ||
एकाद्याच्या पाठीचे चकदे काढणें | त्याला खूप मार देणें. | |
एकाद्याच्या पाठीचे चकदे निघणें | त्याला खूप मार बसणें. | |
एकाद्याच्या पाठीचें साल जाणें | त्याला नुकसानी सोसावी लागणें. | उ० ह्या व्यापारांत माझ्या पाठीचें साल जाण्याचा रंग दिसतो, (म्ह० मला नुकसानी सोसावी लागेल). |
पाठीं ना पोटीं | त्याला धाकटें भावंडही नाहीं, आणि स्वताची संततिही नाहीं. | उ० दुष्काळ आला म्हणून त्याला कसली फिकीर ! त्याच्या पाठीं ना पोटीं ! |
पाठीमागें | (क) समक्ष नव्हे अशा रीतीनें. | उ० ते माझ्या पाठीमागें माझा हावी तितकी निंदा करोत ! माझ्या समक्ष बोलण्याची त्यांची छाती नाहीं ! |
(ख) मेल्यानंतर, | ||
पाठीमागें ठेवणें | मेल्यावर मागें ठेवणें, (पैसा किं० माणसें). | उ० त्या म्हाताऱ्यानें पाठीमागें कांहींसुद्धां ठेविलें नाहीं, (म्ह० त्याच्या कुटुंबीयांना कांहीं देखील पैसा मिळाला नाहीं). |
उ० त्यानें पाठीमागें लग्नाच्या पुष्कळ पोरी ठेविल्या आहेत, (म्ह० तो मरून गेला, पण त्याच्या पोरींचीं लग्नें करण्याचें काम दुसऱ्यांच्या अंगावर पडलें आहे). | ||
पाठीमागें देणें | परत करणें; परत देणें. | |
पाठीमागें पडणें | (क) द्यावयाची रक्कम न दिल्याकारणानें तें कर्ज, किं० तो भार, होऊन राहणें. | उ० तुझे चार हप्ते पाठीमागें पडले आहेत; (म्ह० चार हप्ते द्यावयाची मुदत टळून गेली आहे, हल्लीं तितके हप्ते तुझ्या अंगावर आहेत). |
(ख) जुनेंपुराणें होणें; जुनें झाल्याकारणानें महत्त्व कमी होणें, किंवा नाहींसें होणें. | उ० अन्नपूर्णाबाईचा वीस वर्षांचा मुलगा मेला, तिला त्याचें अतोनात दुःख झालें; परंतु मुलाच्या मागून तिचा पतिही निवर्तला; तेव्हां पतिशोकानें पुत्रशोक पाठीमागें पडला. (म्ह० कमी तीव्र झाला). | |
पाठीवर | रक्षण करण्यासाठीं, उपद्रव करण्यासाठीं, उत्तेजन देण्यासाठीं, मदत करण्यासाठीं; शेजारीं. | |
पाठीवर टाकणें | लांबणीवर, दिरंगाईवर, टाकणें. | उ० तुम्ही आपल्या-वरिष्ठाला एकदा भेटावयाला जा; हें काम महत्त्वाचें आहे, तें असें पाठीवर टाकूं नका. |
पाठीला तेल लावून ठेवणें | मार खावयाला सिद्ध होऊन राहाणें. | उ० पाठीला तेल लावून ठेव; मी जेवून उठल्यावर तुझा समाचार घेणार आहें ! |
पाठीवरून हात फिरविणें | प्रेमानें कुरवाळणें. | |
पाठीवर पाय देऊन येणें | मागून जन्मणें, किं० मागून येणें. | उ० श्रीपति माझ्या पाठीवर पाय देऊन आला आहे, (म्ह० माझा भाऊ श्रीपति हा माझ्या पाठचा). |
पाठीस काळीज असणें | धाडसी, साहसी, असणें. | उ० त्याला माडावर चढ म्हटलें कीं तो चढेल ! त्याच्या पाठीस काळीज आहे ! |
पाठीस पोट लागणें | (क) अति रोड असणें. | उ० तुझें मूल भारी वाळलें हो ! पहा याच्या पाठीस पोट लागलें आहे ! |
(ख) उपासामुळें पोट बखाटीस जाणें. | ||
पोट पाठीस लागणें | पोटाला मिळवून खाण्याची जबाबदारी अंगावर असणें. | उ० वरिष्ठानें शिव्या दिल्या, तरी ऐकून घ्याव्या लागतात ! पोट पाठीस लागलें आहेना ! नोकरी सोडतां येत नाहीं ! |
एकाद्याच्या पाठीस लागणें | त्याचा पिच्छा पुरविणें. | उ० बुटासाठीं माझा मुलगा आज महिनाभर माझ्या पाठीस लागला आहे, पण मला बाजारांत जावयास एका मिनिटाची देखील फुरसत सांपडत नाहीं (म्ह० मला बूट घेऊन द्या म्हणून तो मला गळ घालीत आहे). |
पाठीशीं | अंगावर. | उ० माझ्या पाठीशीं शंभर लचांडें आहेत ! तुझें काम केव्हां करूं ? |
एकाद्याला पाठीशीं घालणें | त्याला आश्रय देणें. | उ० औरंगजेबानें संभाजीच्या मुलास पाठीशीं घातलें. |
पाठीशी घेणें | अंगावर घेणें; पथकरणें. | |
झाकल्या पाठीनें | आबरू न गमावून घेतां; प्रतिष्ठितपणानें. | |
तापल्या पाठीनें | अंगांत उमेद, शक्ति, ताकद, आहे तोपर्यंत. | |
पुरता पाठ घेणें किं० पुरविणें | पिच्छेस लागणें; पथकरलेलें काम नेटानें चालविणें; इष्ट वस्तु मिळविण्यासाठीं प्रयत्न सुरू ठेवणें. | उ० मल्लखांबावर मला ताजवा करावयाला येत नसे, पण मी त्या उडीची पुरती पाठ घेतली, तेव्हां आतां ती मला चांगली येऊं लागली. |
%d bloggers like this: